Tuesday, October 25, 2011

बाबूराव बागूल यांचे अध्यक्षीय भाषण


पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन  --  बाबूराव बागूल यांचे अध्यक्षीय भाषण
७ फेब्रुवारी १९९९,  लोकशाहीर विलास घोगरे नगर, धारावी, मुंबई-१७

म. फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनूनिर्मित दु:खाचा विनाश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. म्हणून त्यांना या विचारमंचावरून अभिवादन करतो. त्याचप्रमाणे महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी आगरकर यांना म. फुल्यांची प्रभावळ, शाहू महाराज आणि त्यांची प्रभावळ, डॉ. आंबेडकर व त्यांची प्रभावळ, ज्ञानमहर्षि विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांची प्रभावळ, कार्ल मार्क्स आणि त्याची जगभरातील प्रभावळ या सर्वांना मी अभिवादन करतो. जे लेखक-कवी व विचारवंत वर्ग-जाती व्यवस्थेने निर्माण केलेली दु:खे पाहून, पुरुषसत्तेने निर्माण केलेली दु:खे पाहून खवळून उठले, त्या बहादुरांनाही मी अभिवादन करतो.
बंधू भगिनींनो, हे विद्रोही साहित्य संमेलन धारावी येथे भरत आहे ही फार आनंददायी घटना आहे. कारण ज्ञान, शिक्षण कोठे जावे, साहित्य कोठे निर्माण व्हावे असे महात्मा फुल्यांना, डॉ. आंबेडकरांना, कार्ल मार्क्सला वाटत होते, तोच हा परिसर आहे. त्याच कष्टकरी जनविभागाच्या सहकार्याने हे साहित्य संमेलन भरत आहे. शिक्षण जिथे जाऊ नये, ज्या जनविभागांना ज्ञान मिळू नये, सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठा ज्यांना मिळू नये असे ऋग्वेदातील पुरूष सुक्तकारांना, मनुस्मृतीच्या सारख्या विषमतावादी स्मृतीकारांना वाटत होते. तेथेच त्या विषमतेविरुद्ध बंड करणारे हे साहित्य संमेलन होत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
विद्रोही जेथे जन्म पावेल आणि वाढेल त्या कामगार वर्गाच्या लेबर कॅम्प, धारावी परिसरात हे संमेलन भरत आहे. जो जनविभाग मनूस्मृतीने व पुरूषसुक्ताने बहिष्कृत व निषेधार्ह ठरला होता, त्याच शूद्रातिशूद्र जनतेला फुल्यांनी नायक ठरविले, त्यालाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे मालक ठरविले. कार्ल मार्क्सने क्रांतीचा अग्रदूत ठरविले, त्या जनतेच्या साक्षीने हे साहित्य संमेलन भरत आहे.....
मित्रांनो, भारतामध्ये वर्णवर्चस्ववादाच्या ऐवजी बुद्धाचा विचार अथवा भगवान महाविराचा विचार अथवा चार्वाकाचा विचार जर स्थायी झाला असता तर आजचे विषमतापूर्ण वास्तव अस्तित्वात राहिले नसते. तसेच अनेक श्रद्धा, अंधश्रद्धांचे जंजाळही उरले नसते. याचा अर्थ असा की, कष्टकर्‍यांचे शूद्रत्व, अस्पृश्यत्व व स्त्रियांचे दुय्यमत्त्व राहिले नसते. कोणीही आदिवासी वा भटकाविमुक्त राहिला नसता. सर्व जनविभाग हे जातीऐवजी वर्गात सामावलेले आपल्याला दिसले असते. त्यामुळे हा आपला स्वर्गाहून सुंदर असलेला सुजल, सफल आणि सकस असलेला देश हा आपला नाना रंगाचा, नाना रसांचा, नाना आकार प्रकारांचा देश जगाचा नेता आणि नियंता झालेला दिसला असता, परंतु ऋग्वेदाने मांडलेल्या पुरुषसुक्ताने या देशाचे वाटोळे केले...

पाय कधी डोक्याच्या जागी जाऊ शकत नाहीत, मांड्या कधी बाहू होऊ शकत नाहीत आणि डोळे हे पायाचे काम करू शकत नाही. मानवी शरीराची रचना अपरिवर्तनीय करण्याचा प्रयत्न केला. म्हणून भारतीय वाङ्मयामध्ये काव्य, नाटकांमध्ये कथा, दंतकथेमध्ये शूद्र अतिशूद्र नायक झाल्याचे उदाहरण नाही. फक्त रामायणात शंबूक हा लहानसा कथानायक म्हणून विचित्र आहे. त्याचप्रमाणे एकलव्य हाही कथानायक आहे. त्यांनी माणसांच्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे सफल, समृद्ध आणि पारंगत होण्याचा प्रयत्न केला. एकलव्याचे क्षत्रिय होणे वा निष्णात होणे हे देखील अनैसर्गिक आहे, असे वाटल्याने महाभारतात एकलव्य हा पराभूत दाखवलेला आहे. तसाच शंबूकही मारला गेलेला आहे. याचा मतलब असा आहे की पायाने डोकं अथवा बाहू होण्याचा प्रयत्न करू नये, अथवा केल्याने शेवट शोकात्मक व दु:खात्मक होतो. शंबूक आणि एकलव्याची चित्रणे ही माणसाच्या सहज प्रवृत्तीला धोक्याचा इशारा देण्यासाठीच महाकाव्यात आणलेली आहेत. वर्गांतर, वर्णांतर, जात्यांतर अथवा स्थित्यंतर करून घेण्याचा जो प्रयत्न करतो त्याचा शेवट शंबूकासारखा वा एकलव्यासारखा शोकात्मक होतो. म्हणून कोणी आपली पायरी चढू नये असा इशारा ऋग्वेद देतो. स्मृत्या देतात तशीच महाकाव्येही देतात....

मित्रहो, संतही निर्माण झाले याचे कारण हिंदू वर्णव्यवस्थेची उदारता आहे असे नाही तर हिंदू दमनसत्ता ही जेव्हा अडचणीत सापडली होती व परकीय मुस्लिम सत्ता प्रस्थापित होत होती. त्या संक्रमण काळात संत आणि शिवाजी महाराजांचे सेनापती मंडळ नावारूपाला आलेले आहे. तसेच ब्रिटिश सत्ता असताना म. फुले व शुद अतिशूद्रातील अनेक विद्वान ब्रिटिश काळात उदयाला आलेले आहेत. डॉ. आंबेडकर व अनेक ती हिंदू वर्णवर्चस्ववादी दमनसत्ता अस्तित्वात नसल्यामुळे आलेली आहेत. हे कधी विसरू नये. वर्ग समाजात मात्र असे झालेले नाही. हे त्यांच्या लोककथा वाचून म्हणून शकतो कारण त्यांच्या लोककथांमध्ये राजकन्येशी धनगराच्या पोराचा विवाह झाल्याचे आपण वाचतो. तसेच शेतक-यांच्या पोराशी पुरोहिताच्या पोरीने विवाह केल्याचेही आपण वाचलेले आहे. किंवा शेतकरी राजा झाल्याचे व पुरोहित झाल्याचेही आपण वाचलेले आहे. याचे कारण येथे वर्गसमाज आहे व आपल्याकडे जातीसमाज आहे. त्यामुळे आपल्या आणि त्यांच्या लोक वाङ्मयामध्ये खूप फरक दिसतो... यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, वर्ण जातिव्यवस्था ही शासक-शोषक वर्गाच्या हिताची होती, लाभाची होती आणि शूद्र-अतिशूद्र समाजाच्या हिताची नव्हती.

जातीव्यवस्था ही शूद्र-अतिशूद्रांना दु:ख, दैन्य, दास्य देण्यासाठीच चिरस्थानी करण्यासाठी जन्माला आलेली आहे. म्हणून या शेकडो वर्षांच्या इतिहासात तिच्या विरोधात उठलेला आवाज म्हणजे चक्रधरांचा महानुभाव पंथ आणि बसवेश्वरांचा लिंगायत पंथ किंवा वारकरी पंथ हे जातिनिर्मूलन करू शकले नाही व वर्गसमाज निर्माण करू शकले नाही. उलट या प्रथातच व्यवहारिक पातळीवर जातिभेद राहिले. मिथक समाजात जिकडे तिकडे जातीच जाती असल्यामुळे या तीनही चारही पंथात जातिभेद राहिले. डॉ. आंबेडकरांनी जसा अस्पृश्यतेच्या विरोधात उठाव केला. त्यांनी महाड सत्याग्रह करून एक पाठवठ्याच्या चळवळीचा आरंभ केला. सर्व जातींना एक पाणवठा ते निर्माण करू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे काळाराम मंदिर नाशिक येथे पाच वर्ष सतत सत्याग्रह करूनही ते काळाराम मंदिर उघडू शकले नाहीत. परंतु या दोन गोष्टींवर त्यांनी आपली चळवळ व विचार मर्यादित केले नाहीत. त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला व शिक्षण आणि नोक-यांमध्ये आरक्षण निर्माण करून जातिउच्चाटणाचे कार्य एका वेगळ्या पातळीवर केले. त्यांनी आत्मभिमान, जातीचा धंदा टाकून देण्याच्या प्रेरणा, वरिष्ठ जातींचे धंदे व्यवसाय पत्करण्याच्या प्रेरणा दिल्या. म्हणजे मनूने जेवढ्या पातळींवर जावून विषमता दृढ करण्याचा प्रयत्न केला तेवढ्या पातळ्यांवर जावून डॉ. आंबेडकरांनी समता, बंधूता स्थापण्याचा प्रयत्न केला. आजचा आधुनिक भारत घडविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तरीही अजून हिंदू समाजात एकात्म असा कामगार वर्ग जसा निर्माण झालेला नाही तसाच समाजात एकात्म असा कामगार वर्ग असा निर्माण झालेला नाही तसाच एकजिनसी मध्यम वर्ग व बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला नाही. त्यामुळे भारतात दोन समांतर वास्तव आहे. एक वर्ण, वर्ग वर्चस्ववादी, हिंदू वास्तव व दुसरा वर्ण वर्ग विरोधी लोकशाही वास्तव. वर्ण वर्ग वर्चस्ववादी हिंदू वास्तव टिकेल तर या दोन्ही वास्तवांमध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. हा संघर्ष मिटविण्याची जरूरी आहे. ही जबाबदारी बहुजन वर्गावर येऊन पडते. हिंदू सामाजिक रचनाही विषमतापूर्ण असल्यामुळे व हिंदू बुद्धिजीवी वर्ग त्या संबंधात कार्य करण्यास इच्छुक नसल्यामुळे हे जाती उच्चाटणाचे व विषमता नष्ट करण्याचे काम बहुजनांवर येऊन पडलेले आहे. म्हणून बहुजन समाजाने सामाजिक-आर्थिक व राजकीय परिस्थितीचा विचार करणे अगत्याचे झालेले आहे.  कारण आपला बुद्धिजीवी वर्ग वर्गनिष्ठ जातीतून आलेला आहे. एका मर्यादेपर्यंत तो पुढे जातो व सामाजिक सुधारणेला मान्यता देतो. हिंदू जातिभेद हे नुसते स्पर्शस्पर्शावर, स्वच्छता अस्वच्छतेवर, पवित्र अपवित्र्यावर जसे अवलंबून आहेत तसेच ते कनिष्ठ जातींना त्रृणकर्तृत्व व साधनसंपत्ती न मिळावी या धोरणावरही अवलंबून आहेत. त्यामुळे कनिष्ठ जाती ह्या दारिद्र्यात दिसतात. तशाच त्या अडीणीही दिसतात. ही दुरवस्था धर्मसंस्कृतीने व तिच्या ग्रंथांनी निर्माण केलेली आहे....

माणूस प्रेम आणि द्वेष या दोन्हीवर उभा असतो. चळवळीही प्रेम आणि द्वेषावरच उभ्या असतात. विजयसुद्धा प्रेम, द्वेष यानेच मिळवले जातात. जर्मनीमध्ये फॅसिस्टांनी द्वेषाच्या आधारे सत्ता मिळवली तर कम्युनिस्टांनी जगभर कामगार वर्गाचे प्रेम संपादित करून सत्तेकडे आगेकूच केली होती. आज भारतात ख्रिस्ती, मुस्लिम, बौद्ध यांच्या द्वेषाची लाटच आलेली दिसते. रमाबाई नगरमध्ये झालेली दलितांची हत्या याच द्वेषभावनेचा परिपाक होती. पण बंधुंनो, भगिनींनो हे लक्षात ठेवा की द्वेषावर आधारलेली गोष्ट अल्पजीवी असते आणि प्रेम टिकवणारी चळवळ दीर्घायुषी ठरते. मराठी साहित्यासंबंधी तर बोलण्यासारखे खूप आहे. इतर वाङ्मयात लैला-मजनू, रोमियो-ज्युलियेट या दोन वर्गाच्या प्रेमकहाण्या आहेत. अशी आंतरजातीय प्रेमकहाणी भारतीय प्राचीन दंतकथांमध्येही आढळणार नाही. कारण वर्णव्यवस्थेने प्रेमावरही बंधने घातली होती.....

आविष्कार स्वातंत्र्यावर आज चर्चा होत आहेत. फॅसिस्ट प्रवृत्तींनी अविष्कार स्वातंत्र्यावर जे हल्ले केले त्याचा मी निषेध करतो. पण त्याचबरोबर इकडेही लक्ष वेधू इच्छितो की, या देशात अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी हजारो वर्ष वर्ण जातीव्यवस्थेने केलेली आहे त्याचाही समाचार आपल्याला घ्यावा लागेल. वर्ण-जातीव्यवस्थेला दुर्लक्षून केलेली अविष्कार स्वातंत्र्याची लढाई पूर्णत्वास जाऊ शकणार नाही. शूद्रांवर लादलेली ज्ञानबंदी, वेद पठणास मनाई ही अविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीचीच उदाहरणे आहेत.  फायर  चित्रपटावर बंदी घालण्यासाठी जी प्रवृत्ती धुमाकूळ घालते आहे, त्या प्रवृत्तीला भारतात खोलवर ऐतिहासिक मूळे आहेत. हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. उच्चजातीय लेखक दलित कष्टक-यांचे चित्रण आपल्या साहित्यात करताना दिसत नाहीत. (केशवसूतांची एखादी कविता ही अपवाद) कारण मराठी साहित्य ही मूठभर उच्चजातीयांची मक्तेदारी बनली आहे... यामुळेच दलित-आदिवासी साहित्यिकांना उठाव करावा लागतो.

सदाशिवपेठ लेख व आपल्यासारखे विद्रोही लेखक यांच्यात मुलभूत फरक आहे. त्यांच्या वाङ्मयात त्याच प्रतिमा, तीच प्रतिके, सारख्या रंग-रूप -उंचीचे नाक आणि नायिका यांचा पुन्हा तोच खेळ चालू आहे. आम्ही मात्र मराठीत नवे जीवन आणले. नवे नायक आणि बंडखोर नायिका आणल्या. जीवनातील दु:ख, दारिद्र्य, दैन्य, लैंगिकता, आनंद या सर्वच बाजूंना आम्ही न्याय दिला. ताठ मानाने उभी राहून प्रश्न विचारणरी स्त्री अण्णाभाऊ, मी आणि माझ्यासारख्याच जातीवर्गातून आलेल्या लेखकांनी मराठीत आणली. नकार आणि विद्रोह ही मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला जोरदार संघर्ष द्यावा लागला. बंडखोरीशिवाय दुसरा उपायच नव्हता. नाहीतर त्यांचे वर्णवर्चस्वादी-सदाशिवपेठी साहित्य वाचत जिंदगी घालवावी लागली असती.

शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील इ. बहुजनांनी केलेला शिक्षण प्रसार, फुले व डॉ. आंबेडकरांचे क्रांतिकार्य आणि ४५ च्या सुमारास कम्युनिस्ट चळवळीत आल्यानंतर मिळालेली कामगारवर्गीय दृष्टी यामुळे माझ्या विद्रोहाचा पाया पक्का होता. शंकरराव पगारे, के. एम. साळवी, आर. बी. मोरे यांसारख्या दलित-कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या सहवासाने या विद्रोहाची मशागत केली होती......

जर इंग्रजी वाङ्मय आलेच नसते तर स्त्रियांच्या दुःखासंबंधी एकही कथा-कादंबरी निर्माण झाली नसती. तर मुद्दा जातिव्यवस्थेच्या आणि स्त्रियांच्या दुःखासंबंधी लिहिणा-या साहित्य चळवळी भारतातच का उभ्या राहतात हा आहे. मी सुमारे ४० वर्षांपूर्वी दलित साहित्याच्या चळवळीची सुरुवात केली. ही चळवळ आता भारताच्या सर्व भाषांमध्ये जाऊन पोहोचली आहे. त्याचे कारण या साहित्य चळवळीच्या आधी भारतातील सर्व भाषांमध्ये फुले-आंबेडकरांचे वाङ्मय पोहोचले आहे. मी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली त्या या दोन महापुरूषांपासून प्रेरणा घेतल्यानेच सर्व भारतीय भाषांतील दलित लेखकही आता साहित्य निर्मितीच्या मैदानात उतरले आहेत. डॉ. आंबेडकरांचे वैशिष्ट्यच हे आहे. माझ्या पिढीसमोर त्यांचा आदर्श होता जो माझ्या बापाच्या किंवा त्याच्या आधीच्या पिढीसमोर नव्हता. एकलव्य, कर्ण, शंबूक हे आदर्श तर हजारो वर्षापूर्वीच मारले गेले होते. पण डॉ. आंबेडकरांनी ज्ञान व सत्तेच्या संघर्षाचा जो आदर्श उभा केला त्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली म्हणून दलित साहित्याची चळवळ महाराष्ट्रात आकाराला आली.
तेव्हा आता मराठी भाषेची चिंता वाहणा-या काही उच्चभ्रूंना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही ती चिंता सोडा. मराठी भाषा आमच्या मौखिक परंपरांनीच टिकली. आम्हीही आमच्या जगण्यातली भाषा मराठी साहित्यात आणून मराठी भाषा समृद्धच केली. तेव्हा जागतिकीकरणच्या नादी लागलेल्यांनी मराठी भाषेच्या जगण्यामरण्याची काळजी आता तरी सोडून द्यावी. तर आता आपल्या देशामध्ये दलित-कष्टकरी समाजातल्या लेखकांनी एक तर जातीअंताची भूमिका घेतली पाहिजे. माणसाचे महात्म्य मान्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे जाती, लिंग, वर्ग, वर्ण हा भेद विसरून त्याने विकासाचा आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रसार केला पाहिजे... म्हणजे प्रगतीशील लेखक, कधी हा करुणामय कोमल क्रांतीचा जसा पुरस्कार करेल, तसा शोषक वर्गाचा संपूर्ण नि:पात करण्याचीही सर्रास पुरस्कार करील. तो कधीही विषमतेतून आलेल्या स्त्रियांच्या दुय्यमत्त्वाचा पुरस्कार करणार नाही. कारण स्त्रियांचे दुय्ययमत्त्व त्यांच्या शारीरिक सौंदर्यातून, नाजुकपणातून आलेले नाही. तर विषमता टिकविण्यासाठी व समता, भ्रातृभाव निर्माण होऊ नये यासाठी हे दुय्यमत्त्व लादलेले आहे. स्त्री वर्ग, वर्ण, जातिभेद तोडून जाऊ शकेल. हे वैदिक विजेत्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी स्त्रियांवर अनेक बंधने घातली. भारतीय स्त्रियांचा पोषाख हा सुद्धा हे दुय्यमत्त्व सिद्ध करण्याच्या हेतूनेच निर्माण झालेले आहे. परिवर्तनवादी लेखक आजची नायिका रचताना ती सीता-सावित्रीसारखी व कुंती, गांधारीसारखी असणार नाही तर ती पूर्णपणे स्वतंत्र व पुरुषापेक्षाही जास्त क्रांतिकारक माणूस असेल. अनेक अन्याय-अत्याचार जिने सहन केले आहेत अशा दबलेल्या स्त्री समाजातील आधुनिक नायिका ही बंडखोरच असेल आणि ती पुरुषत्ताक रूढीरिती, श्रद्धा, उधळून लावणारीच असेल.

आपला समाज जाती समाज नसता तर ग्रामीण साहित्य, भटक्यांचे साहित्य, आदिवासींचे साहित्य, ख्रिस्तींचे, स्त्रीचे साहित्य हेही हात उभारून म्हटले असते की, आमचे साहित्य दलित साहित्य आहे. परंतु येथे जातीसमाज असल्यामुळे दलित या शब्दाला अस्पृश्यतेचा अर्थ प्राप्त झालेला आहे. दलित समाज म्हणजे क्रांतीचे अग्रदल असा अर्थ हिंदू मानसिकतेने अजून होऊ दिलेला नाही. येथे कष्टकरी वर्ग हा देशाचा आणि समाजाचा अग्रणी नाही तर उपेक्षित आणि टिंगलटवाळीचा आहे. म्हणून मराठी नाटकात विनोद निर्माण करण्यासाठी अशुद्ध बोलणारा कुणबी किंवा दूधवाला किंवा अशुद्ध बोलणारी मोलकरीण दाखविली जाते.
कम्युनिस्ट, सोशॅलिस्ट आणि आंबेडकरवादी विचारसरणीच्या कालखंडाशिवाय कामगारांचं महात्म्य प्रगट करणारं साहित्य अजूनही सर्व भारतीय भाषांमध्ये मध्यमवर्गीय कवी-लेखक-समीक्षकांकडून उपेक्षिले जाते. म्हणून अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, शाहीर अमरशेख यांना मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित केले गेलेले नाही. शंकरराव खरात आणि नारायण सुर्वे या दोन प्रतिभावंतांचा अपवाद सोडला तर अजूनही दलित, ग्रामीण थोर थोर लेखकांची मराठी मूठभर, नखभर प्रतिभेचे लेखक आणि त्यांच्या संस्था बिनदिक्कत उपेक्षा करतात. हे आपले आजचे सामाजिक वास्तव आहे.
आज नवीन आर्थिक धोरण, जागतिकीकरणाने कष्टकरी दलित बहुजनांवर मोठ्या संख्येने अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. जातिव्यवस्थेने जातीचा व्यवसाय बंद केला होता. तो व्यवसाय बदलण्याची संधी देणा-या नोक-यांतील राखीव जागा कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुंबईचा निर्माता गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला आहे. कोळ्यांवरही तीच वेळ आली आहे. या विरोधात सशक्त राजकीय चळवळ आकाराला येताना दिसत नाही. चळवळ म्हणजे वैचारिक चळवळही असते, सांस्कृतिक चळवळही असते आणि दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर झगण्याची चळवळही असते. परंतु ब्राह्मणीकरणाने या चळवळीमध्ये गतिरोध निर्माण केला आहे. कामगार वर्गाने जगात इतिहास घडवला. युरोपात एकामागून एक सरंजामशाह्या, भांडवलशाह्या त्यांनी उद्ध्वस्त केलंय. पण भारतात मात्र कामगार वर्ग क्रांतीच्या नायकत्वाची इतिहासदत्त भूमिका निभावण्याला कमी पडताना दिसतो. मीही याच कामगारवर्गाचा अविभाज्य घटक आहे. माटुंगा लेबर कॅम्पातच वाढलेलो आहे. आज जेव्हा हाच कामगार वर्ग हिंदूत्ववादाच्या प्रवाहाखाली गेलेला पाहतो, वर्तमानात हा धारावी, लालबाग, परळमधलाच नव्हे तर देशातला कामगार वर्ग त्याच्या वर्गचरित्राप्रमाणे रहिला असता तर वेगळेच चित्र दिसले असते. पण त्यावर भांडवलशाही मनूवाद यांनी संस्कार केलेले पाहतो तेव्हा मनाला वेदना होतात. हा हिंदुत्ववाद्यांच्या प्रवाहाखालून का गेला, याची कारणे शोधणे गरजेचे आहे. याचे एक कारण असे की, कम्युनिस्ट, सोशॅलिस्टांनी डॉ. आंबेडकरांचा स्वीकार करायला पाहिजे होता आणि दुसरे असे की, ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दोन्ही कामगारवर्गाचे शत्रू आहेत असं स्पष्टपणे सांगणा-या डॉ. आंबेडकरांच्या आजच्या अनुयायांनी मार्क्सला बरोबर घ्यायला हवे होते. अमर्त्य सेनासारखा अर्थतज्ञ कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा करतो आहे. डॉ आंबेडकर तर ५० वर्षांपूर्वी राज्य समाजवादाचा पुरस्कार करीत होते. लोकशाही आणि समाजवादे हे त्यांचे साध्य होते. हे सर्वांनीच आज ओळखले पाहिजे. म्हणूनच डाव्यांनी फुले-आंबेडकरवाद व फुले-आंबेडकरवाद्यांनी मार्क्सवाद समजून घेणे गरजेचे आहे.

 हे कामगारा तू नाहीस रथसारथी म्हणून
 नाही क्रांती अजून या भारती, तू व्हावेस
 रथसारथी म्हणजे येईल सुबत्ता आणि प्रगती 

अशा आशयाची मी कविता केल्याचे मला स्मरते. हा कामगार वर्ग प्रगतीचा, क्रांतीचा पुढारी व्हावा. मनुवादाला नकार देणारा व्हावा अशीच आपली सर्वांची इच्छा आहे. मराठी वर्गाचे वर्गशील हे क्रातीकारीच आहे. कारण महाडचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिराचा सत्याग्रह, हाच कष्टकरी-दलित वर्ग यात पुढाकारावर होता. महात्मा फुल्यांबरोबर हाच बहुजन-कष्टकरी होता. प्राचीन काळातील चार्वाक-बुद्ध-जैनांबरोबरही तोच होता. त्याचे वर्गचरित्र क्रांतीकारीच आहे. फक्त आता अज्ञानापोटी तो सांप्रदायिक शक्तींच्या प्रभावाखाली गेला आहे. तेव्हा आपल्या वर्गशीलाची, वर्तमानाची आठवण करून देणे गरजेचे आहे. विद्रोही मराठई साहित्य संमेलनाला हे प्रबोधन कार्यही करावेच लागेल. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या शेतकरी वर्गापर्यंत हे क्रांतिकारी प्रबोधन भिडवावे लागेल.

अस्तित्त्वात असलेल्या ब्राह्मणी-भांडवली सत्तेला व येऊ घातलेल्या फॅसिस्ट अंधःकाराला भेदण्यासाठी फुले-आंबेडकर-मार्क्स यांचेच विचार आणि आदर्श आपल्याला मार्ग दाखवतील. त्याच प्रकाशात वाड्.मय व्यवहार करण्यासाठी कटिबद्ध होऊयात.
जय ज्योती, जय भीम  !
जय महाराष्ट्र !

27 Mar 2008, रोजी महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेले हे भाषण एक माईलस्टोन आहे..   



बाबूराव बागुलांच्या साहित्याविषयी...



मराठी वाड्मयकोशात बाबूराव बागुलांच्या साहित्याविषयी असलेली माहिती अशीः

ग्रामीण भागातील अस्पृश्यतेचे दाहक चटके आणि मुंबईतील झोपडपट्टीच्या जीवनाचा विदारक अनुभव घेतलेल्या बाबूराव बागुलांचे लेखन १९५२ च्या सुमाराला प्रकाशित होऊ लागले. युगांतर, नवयुग, अस्मितादर्श इत्यादी नियतकालिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. जेव्हा मी जात चोरली होती (१९६३) व मरण स्वस्त होत आहे (१९६९) या दोन कथासंग्रहांतील कथांतून बागुलांच्या लेखणीचे सामर्थ्य लक्षात येते. जेव्हा मी जात चोरली होती, दस-याचा रेडा, मरण स्वस्त होत आहे, कवितेचा जन्म, गुंड, विद्रोह, प्रेसूक इत्यादी त्यांच्या कथा वाचकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणा-या आहेत.
मानवी मनातील क्रोध, हिंसा, सूड, वासना, स्वार्थ यांना बळी पडणारी माणसे आणि त्यांच्या जीवनाची अवकळा बागुलांच्या कथांचा विषय बनतात. मरण स्वस्त होत आहेसारखी कथा मुंबई महानगरीचे बकालपण चित्रित करते. त्यांच्या अनेक कथांमधून पुरुषसत्तेने केलेले स्त्रीचे अनेक पातळ्यांवरील शोषण मांडले जाते. मुरळी, वेश्या, पुरुषांच्या वासनेला बळी पडणा-या स्त्रिया त्यांच्या कथांत येतात. दलितांबरोबरच ख्रिश्चन, मुस्लिम, झोपडपट्टीत जीवन कंठणारी, वर्गसत्तेचे बळी होऊन जीवन कंठणारी भुकेली माणसेदेखील बागुलांच्या कथेत प्रामुख्याने येतात. दुःख हे शोषणातून निर्माण होते, ही त्यांची भूमिका आहे.
सूड (१९७०) या दीर्घकथेतील जानकी हीही लैंगिक शोषणाच्या चक्रातून पिळवटून निघते. नाट्यमय घटना, आवेगपूर्ण निवेदन, उत्कट, काव्यात्म भाषाशैली यामुळे बागुलांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अघोरी (१९८०) ही ग्रामीण समाजाचे दाहक वास्तव चित्रिणारी कादंबरी. दलित साहित्य ः आजचे मानवी विज्ञान (१९८१) हे पुस्तक, आंबेडकर भारत (१९८१) हे जातककथांच्या धर्तीवरचे चरित्रात्मक कथाग्रंथही त्यांच्या नावावर आहेत. वैचारिक बांधिलकी ठेवून लिहिणारे लेखक म्हणून बाबूराव बागूल वेगळे ठरतात.

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons