बाबूराव बागूल |
बाबूराव बागूलांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी नाशिक रोडजवळील विहितगाव या खेड्यात झाला. दलित जातीत जन्म घेतल्याने जातीय विषमतेचे चटके खातच त्यांचे बालपण गेले. वयाच्या दहाव्या वषीर् मुंबईच्या माटुंगा लेबर कँपात ते मावशीकडे शिक्षणासाठी आले. मॅट्रिकनंतर छोट्यामोठ्या नोकऱ्या त्यांनी केल्या. तो काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि कम्युनिस्टांच्या चळवळींनी भारलेला होता. बाबूरावांवर या दोन्हींचा मोठा प्रभाव पडला. म. जोतिराव फुले, डॉ. आंबेडकर, मॅक्सिम गॉकीर्, प्रेमचंद यांच्या लेखनातून त्यांना प्रेरणा मिळाली. या काळात नझिम हिकमत यांच्या कष्टकऱ्यांचे गोडवे गाणाऱ्या 'तुमचे हात' या कवितेतून स्फूतीर् घेऊन त्यांनी 'तुमचे प्रज्ञावंत हात' ही कविता लिहिली. माणसाचे सूक्त गाणाऱ्या आणि वेद, धर्म, ईश्वर या संकल्पनांना आव्हान देणाऱ्या 'वेदाआधी तू होतास' या त्यांच्या प्रसिध्द कवितेची बीजे त्यात सापडतात.
बाबूरावांची पहिली कथा 'दौलत' १९५२ साली प्रसिध्द झाली. यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या 'युगांतर' आणि आचार्य अत्र्यांच्या 'नवयुग'मधून त्यांच्या कथा प्रसिध्द होऊ लागल्या. 'जेव्हा मी जात चोरली होती' हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९६३ साली आला आणि थंडगार धारदार सुरी गळ्यावरून फिरवावी तसा अनुभव मराठी वाचकांना आला. वास्तवापासून पळणाऱ्यांची गोठलेली संवेदनशीलता फोडण्याची तीक्ष्णता या सुरीत होती. त्यानंतर जातिग्रस्त माणसांच्या जिवंत मरणयातना मांडणारं 'मरण स्वस्त होत आहे' प्रसिध्द झालं. बाबासाहेबांचा मूकनायक त्याची कहाणी त्याच्या भाषेत त्याच्या जगण्यासह घेऊन वादळासारखा मराठी साहित्यात घुसला.
मग 'सूड' त्यानंतर 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथाकादंबऱ्यांनी मराठी साहित्याला भरभरून देणे दिले. भूमिहीन मजूर, जगण्याला उद्देशच नसलेली बेकार माणसे, गुन्हेगार, वेश्या अशा कंगालांना त्यांनी आपल्या साहित्याचे नायकत्व बहाल केले. त्यामागे स्वप्नाळू आदर्शवाद नव्हता, तर हेच खरे नायक आहेत अशी स्पष्ट ताकीद होती. 'आंबेडकर भारत' मध्ये त्यांची सर्जनशीलता मनस्वीपणे उफाळलेली दिसते. महाभारत एकदाच नव्हे, तर पुन्हा पुन्हा घडत असते आणि एकलव्य नि शंबुक हे त्यांचे नायक ठरतात याची खणखणीत जाणीव करून देण्याची प्रेरणा त्यामागे होती.
जाती आणि वर्णव्यवस्थेने केलेल्या शोषणामुळेच माणसाच्या वाट्याला दु:खाचे भोग येतात हे आपल्या साहित्यातून ठामपणे चितारणाऱ्या बाबूरावांनी अभिव्यक्तीची कोंडी फोडून मराठी साहित्य मोकळे आणि वाहते केले. त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे मराठी साहित्यातले जळते निखारे आहेत. जागतिक दर्जाची साहित्यनिमिर्ती केलेल्या बाबूरावांनी जातीव्यवस्थेच्या खालच्या उतरंडीवर असलेल्या अनेक तरुण लेखकांना लिहिते केले, अशा लेखकांची सशक्त साहित्यिक चळवळ त्यांच्या प्रेरणेने उभी राहिली. मराठी साहित्याच्या कथित मुख्य प्रवाहाने या चळवळीची दखल घेणे टाळले तेव्हा त्याला उत्तर म्हणून आयोजित केल्या गेलेल्या पहिल्या विदोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे अपरिहार्यपणे चालत आले.
.........
बाबूराव बागूल यांची ग्रंथसंपदा
- जेव्हा मी जात चोरली होती
- मरण स्वस्त होत आहे
- सूड
- अघोरी
- कोंडी
- पावशा
- सरदार
- भूमिहीन
- मूकनायक
- अपूर्वा
- आंबेडकर भारत
- दलित साहित्य: आजचे क्रांतिविज्ञान
- वेदाआधी तू होतास.