बाबा रामदेव- बाबा रामदेव- बाबा रामदेव-
फक्त एकच नाव. या नावाशिवाय प्रसारमाध्यमांना एकही बातमी नाही. किंबहूना रामदेव बाबशिवाय इतर बातम्या द्यायच्याच नाहीत असा जणू एकुण मिडीयाने सार्वमताने संमत केलेला ठरावच असावा असे वाटले तर नवल वाटू नये. काहीही असो गेल्या आठवड्याभरापासून या स्वामी रामदेवांनी देशाच्या राजकारणाच्या लाईमलाईट पॉईंट वर ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक स्टेटमेंटमधून नेहमीच काही ना काही तरी संभ्रम निर्माण झालाय. त्यानिमित्ताने केलेला हा उहापोह.
1. नावः- रामदेव किशन यादव,
2. जन्मठिकाणः- हरियाणा
3. कामः- योगी
4. स्थापन केलेल्या संस्थाः- पतंजली योग पीठ
5. संस्थांमार्फत चालणारे कामः- आयुर्वेद आणि योगविद्येचा प्रसार
6. संस्थांचा जगभर असलेला पसाराः- जगातील जवळपास २० देश
7. सध्या प्रकाशझोतात असण्याचे कारणः- भ्रष्टाचार विरोधी आंदोलन
एवढा काय तो बाबा रामदेव यांचा बायोडेटा. संन्यासी असलेल्या बाबा रामदेव यांनी आपल्या धार्मिक कारकिर्दीची सुरूवातच मुळातच एक योग गुरू म्हणून केली. त्यांचा हरीयाणा ते पतंजली आणि पतंजली ते दिल्ली पर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच ठावूक आहे. आजमितीला या संपूर्ण भारत देशात बाबा रामदेव माहीत नाही असे म्हणणारा एक शेंबडं पोरगं नावाला देखील मिळायचे नाही. त्यांच्या योग शि्बीराला मुख्यमंत्र्यांपासून, केंद्रिय मंत्री ते राज्यपालांची उपस्थिती असायची. कोणत्याही प्रकारचा जादूटोणा नाही, बुवाबाजी नाही, अंगारे-धुपारे नाही म्हणून सुशिक्षितांमध्ये लोकप्रिय व्हायाला त्यांना फारसे कष्ट घ्यायला लागले नाही. सत्य साई बाबा नंतर राजकारण्यांवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे बाबा म्हणून रामदेव बाबांचा उल्लेख केला तर ती अतिशयोक्ती ठरू नये. संपूर्ण देशभरात त्यांचे योगासन शिबीरे चालू असतात. त्यांच्या पतंजली पीठाला मिळणार्या देणग्याही डोळे दिपवणार्या आहेत. याच पतंजली पीठाची संप्पत्ती अब्जावधींच्या घरात असल्याचे बोलले जाते. या मिळणार्या देणग्यांचा हिशोब त्यांनी आजवर दाखवलेला नाही हा भाग वेगळा. स्वतः हे माया ते माया म्हणत लोकांना वैराग्याचे महत्त्व पटवून द्यायचे आणि स्वतः मात्र एसी गाड्यांतून फिरायचे, असा दुटप्पीपणा ते आजतागायत करत आले आहेत. पण आज अध्यात्म आणि योगासने सोडून त्यांनी राजकारणाचे दार ठोठावलेय, सरकारसाठी अँटी हिरो बनून प्रचंड प्रसिद्धी देखील मिळवली. भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करून रातोरात नॅशनल स्टार देखील झाले. पण ज्या आंदोलनाची सुरूवात त्यांनी केलीये त्याची सत्यता पडताळून पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण क्रांती ही कधी एका रात्रीत घडून येत नाही. त्याची एक प्रोसेस असते. जेव्हा देशातील अकुण व्यवस्था ही लोकमताच्या विरोधात जाते तेव्हा क्रांतीची खरी गरज वाटू लागते. प्रत्येक क्रांतीचा एक नायक असतो. त्याचे स्वतःचे असे नेतृत्व आणि व्हिजन असते. क्रांतीचा लढा उभारताना लढ्याची ध्येय्य, उद्दीष्टये, परिणाम यांचे जनतेवर होणारे दुरगामी परिणाम यांची सखोल चर्चा होउनच लढ्याची दशा आणि दिशा ठरविणे योग्य, नाहीतर जो क्रांती घडवून आणण्यासाठी असंवैधानिक मार्गांचा वापर करतो तोच मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचारासारखा वापर करून हुकूमशाहीला दारे मोकळी करून देतो. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने उपोषण करण्याचा जो एक ट्रेंड सुरू झालाय तो आपल्या एकुण समाजाला उपरोल्लिखित परिस्थिताकडे नेणारा आहे.
वास्तविक पाहता बाबा रामदेव यांचे उपोषण हे भ्रष्टाचार मुक्त भारत साकारण्यासाठी आहे आपण त्याचे स्वागत करायलाच पाहीजे. पण त्याची पार्श्वभूमी समजावून घेतल्याशिवाय खरे मुद्दे कळणार नाहीत. जवळपास दोन वर्षांपूर्वी स्विस बँकेत असलेला काळा पैसा हा सर्वात जास्त भारतातूनच येत असल्याच्या बातम्या पुढे आल्या. त्यातूनच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया अगेंस्ट करप्शन च्या माध्यमातून देशातल्या बड्या नॉन पॉलिटिकल पण प्रभावी व्यक्तिमत्त्वांना एकत्र करून भ्रष्टाचार विरोढी आंदोलन उभारले. सुरूवातीला आंदोलनाला काहीच यश मिळाले नाही. जवळपास पावणे दोन वर्षांच्या कालावधीत या आंदोलनाला कुणी मुंगीएवढा पण स्पेस दिला नाही आणि आत्ता हे अकुण डब्ब्यात जाणार असे चित्र असताना अचानक चक्रे फिरली कालपरवापर्यंत गल्ली बोळातलं आंदोलन म्हणवून हिणवल्या गेलेल्या आंदोलनाला एकदम प्राईम टाईम ची स्पेस मिळायला लागली. इंडिया अगेंस्ट करप्शन च्या प्रत्येक हालचालींना हेडलाईन मिळू लागली. असे नेमके का झाले असावे ? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या आंदोलनाचा एकुण चेहरा लपलेला आहे, आणि तो एकुणच खुप मजेशीर देखील आहे.
२०११ सालाचा अंत आणि सुरूवातच मुळात एका नव्या क्रांतीच्या पर्वाला जन्माला घेऊनच झाली. ट्युनिशिया, इजिप्त आणि नंतर लिबीया सारख्या हुकूमशाही राष्ट्रांत बोकाळलेला भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकण्यासाठी तेथील जनतेने केलेला उत्फुर्त उद्रेक जगभरातल्या मिडियाने टिपला. त्या उद्रेकाला यश देखील मिळाले, अर्थात ते मिळण्यामागे तेलाच्या राजकारणाचा कसा सहभाग होता हा मुद्दा वेगळा. भारतात २०१० साली सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली होती. जनमताने भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्यांविरोधातल्या रागाचा परमोच्च बिंदू एव्हाना गाठला होत. वास्तविक पाहता आखाती देशांमध्ये घडलेल्या प्रकार हा जरी क्रांतीत मोडत असला तरी त्याचे इप्सित ध्येय्य अजूनदेखील साधले गेलेले नाहीये. आखाती देशातील विद्रोह भारतीय मिडीयाने अत्यंत चवीने चघळला होता. त्या निमित्ताने भारतातील पत्रकारांनी आपल्याकडे अशा प्रकारची क्रांतीची कशी गरज आहे या विषयाला तोंड फोडले. आणि मग काय भारतात देखील लोकपाल चा लढा सुरू झाला. लोकपाल चा लढा कसा फसवा होता हे मी याआधीच सविस्तरपणे मांडले आहे.
अण्णांचे उपोषण सुरू झाले, बराच काळ लांबले. आंदोलनाचे लोण देशभर पसरले. लोकांनी रस्त्यावर उतरून, जंतर मंतर सारख्या ठिकाणांना तहरीर चौकाचं स्वरूप प्रदान करून देउन हा लढा उभारला तो तात्पुरता जिंकला. तो जिंकण्यासाठी जंतर मंतर च्या आंदोलनाला स्वांतत्र्यलढ्याची आभासी प्रतिमा निर्माण केली गेली. (नेमके हेच चित्र रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या वेळी देखील उभारण्यात येतंय.) शेवटी सरकार झुकलं अण्णांच्या मागण्या झाल्या. राळेगणसिद्धीचे अण्णा रातोरात गांधी बाबा बनले. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, श्री श्री रविशंकर, किरण बेदी, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश यांनी एकत्रितरित्या सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले, पण यात भाव खावून गेले ते फक्त अण्णा. बाकी कुणालाच म्हणावे तसे एक्सपोझर मिळाले नाही. सारे यश अण्णांच्या नावावर लिहीले गेले. आणि येथूनच बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या कहाणीचा जन्म झाला.
अण्णांचे उपोषण सुरू झाले, बराच काळ लांबले. आंदोलनाचे लोण देशभर पसरले. लोकांनी रस्त्यावर उतरून, जंतर मंतर सारख्या ठिकाणांना तहरीर चौकाचं स्वरूप प्रदान करून देउन हा लढा उभारला तो तात्पुरता जिंकला. तो जिंकण्यासाठी जंतर मंतर च्या आंदोलनाला स्वांतत्र्यलढ्याची आभासी प्रतिमा निर्माण केली गेली. (नेमके हेच चित्र रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या वेळी देखील उभारण्यात येतंय.) शेवटी सरकार झुकलं अण्णांच्या मागण्या झाल्या. राळेगणसिद्धीचे अण्णा रातोरात गांधी बाबा बनले. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, श्री श्री रविशंकर, किरण बेदी, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश यांनी एकत्रितरित्या सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले, पण यात भाव खावून गेले ते फक्त अण्णा. बाकी कुणालाच म्हणावे तसे एक्सपोझर मिळाले नाही. सारे यश अण्णांच्या नावावर लिहीले गेले. आणि येथूनच बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या कहाणीचा जन्म झाला.
क्रमशः