Monday, June 6, 2011

बाबा रामदेव की जय ! भाग- ३


 
      भगव्या वस्त्रांकित व्यक्तिंना आपल्या देशात कायम वेगळ्या चष्म्यातून पाहीले गेले आहे. भगवे वस्त्रे परिधान करणारे बाबा लोक म्हणजे साधू, महात्मा हा पूर्वापार रुढ असलेला एक भोळा समज. त्यामुळे धार्मिक व्यक्तिंनी लबाडी केल्या जाणार्‍या राजकारणासारख्या धूर्त आणि फसव्या लोकांच्या क्षेत्रात पाऊल ठेवू नये असा जनमताचा प्रवाह संपूर्ण देशभर दिसतो. पण बाबा रामदेव यांपेक्षा निश्चितच वेगळे आहे. त्याची कारणे देखील तशीच रोचक आहेत.
 
1.       बाबा रामदेव यांना योगविद्येच्या प्रसाराच्या माध्यमातून जगभर नाव कमाविले.
2.       कधीच कोणत्याही पद्धतीच्या चमत्काराची, जादूची बतावणी केली नाही.
3.       योगविद्येचा ब्रँड या ग्लोबलाईज्ड जगात एका मल्टीनॅशनल फर्म सारखा नावारुपाला आणला.
4.       कधीही कोणत्याही शिबीरात कधीही कोणत्याही प्रकारचे बिभत्स वतर्न नाही किंवा कुठेही कोणाच्या भावना भडकावणे अथवा दुखावण्याचे कृत्य केले नाही.
5.       कधीही धर्माच्या नावाचा किंवा त्याद्वारे प्राप्त झालेल्या अधिष्ठानाचा चुकीचा वापर केला नाही. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची शालीनता कायम टिकवून ठेवलीये.
6.       त्यांना त्यांच्या या अध्यात्मिक आयुष्यात लाखोंवर भक्त लाभले. त्यांचे त्याच प्रमाणात अनुयायी देखील बनले. साहजिकच शेवटी ते सुद्धा मानवप्राणीच आहेत. एवढे सगळे सोबतीला असताना राजकीय महत्त्वाकांक्षा न बळावल्या तर नवलच!
7.       सगळ्यात  महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात होउन गेलेल्या आणि सध्या असलेल्या इतर बाबांना देखील लाखोंनी अनुयायी होते पण त्यांनी कधी त्यांच्या राजकीय अनुयायांना भ्रष्टाचाराविरोधात ना लढण्यास प्रवृत्त केले ना ते स्वतः कधी या लढाईत उतरले. मात्र रामदेव बाबा या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले. ते स्वतः दंड थोपटून मैदानात उतरले.
वरील ७ मुद्दे वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बाबांचे शालीन चरित्र. या शालीनतेमुळेच त्यांना आज संपूर्ण देशात मान आणि स्वीकृती मिळतेय. त्यांच्या आंदोलनाला आत्ता अण्णांच्या आंदोलनापेक्षाही जास्त यश मिळालयं. ३ जून २०११ ला सरकारचं शिष्टमंडळ आणि बाबा रामदेव यांच्यात पाच तासांची मॅरेथॉन चर्चा होउन देखील काही निष्पण्ण झाले नाही. ४ जून ला मोठ्या दिमाखात आंदोलन सुरू झाले. आंदोलनाचे लोण आत्ता तर सार्‍या देशभर पसरले आणि ज्याची भीती होती तेच झाले. बाबांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून सरकारने दडपशाही करून रात्री दोन वाजता जबर लाठीमार करून आंदोलन चिरडून टाकले. बाबांची रवानगी जबरदस्तीने दिल्ली रामलीला मैदानातून हरिद्वारला केली गेली. सर्वत्र सरकारच्या नावाचा निषेध केला गेलाय. आत्ताही तो निषेध होतोय. आणि तो व्हायलाच हवा. ज्या पद्धतीने आंदोलन चिरडण्यात आले तो प्रकारच मुळात चुकीचा होता. पोलिसांनी आपल्या या कृष्णकृत्याच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस कारण सादर केलेले नाही. आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नव्हता मग एवढा अमानुष लाठीमार करण्याची गरजच काय होती ? त्यानिमित्ताने आंदोलनाचा एकुण घटनाक्रम पाहणे निश्चितच योग्य ठरेल.
1.       १ जून : बाबा रामदेव यांचे उज्जैन येथून दिल्ली विमानतळावर आगमन. प्रणव मुखर्जी, पवनकुमार बन्सल, कपिल सिबल आणि सुबोधकांत सहाय यांच्याशी काळा पैसा व भ्रष्टाचार निर्मूलन या मुद्द्यांवर बाबांची चर्चा
2.       २ जून : दोन्ही बाजूंमध्ये बंद दाराआड चर्चा
3.       ३ जून : बाबा रामदेव व कपिल सिबल-सुबोधकांत सहाय यांच्यात चर्चा. बहुतांश मुद्द्यांवर सहमती झाल्याचा उभय बाजूने दावा. उपोषणाला बसण्याच्या निर्धाराचा बाबा रामदेवांकडून सायंकाळी पुनरुच्चार. रामदेवांच्या मागण्यांना केंद सरकारचे टप्प्याटप्यात उत्तर.
4.       ४ जून : रामलीला मैदानावर बाबा रामदेवांचे उपोषण सुरू. सरकारने मागण्या मान्य केल्यास दुपारपर्यंत उपोषण सोडण्याचे बाबा रामदेवांचे पत्र केंद सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, असे पत्र लिहिलेच नसल्याचा बाबांचा दावा. केंदाचा प्रतिदावा. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम. केंद सरकारकडून रात्री उशिरा बाबांना पत्र.
5.       ४-५ जूनची मध्यरात्र १.०० : मध्यरात्र उलटल्यानंतर दिल्ली पोलीस दबक्या पावलांनी रामलीला मैदानाच्या परिसरात जमा होऊ लागले. स्वत: बाबा आणि त्यांच्या समर्थकांना याची आणि पुढे घडणाऱ्या रामायणाची पुसटशीही कल्पना नव्हती. हळूहळू पोलिसांची संख्या वाढू लागली. सोबतीला राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
6.       १.१५ : पोलिसांनी बाबांच्या समर्थकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. इथे बॉम्ब ठेवला आहे, अशी खोटीच बतावणी करून पोलिसांनी समर्थकांना मानगुटीला धरून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस आणि समर्थकांत वादाच्या फैरी झडल्या.
7.       १.३० : समर्थक बधत नाही म्हटल्यानंतर पोलिसांकडून जोरदार लाठीमार सुरू. महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकही पोलिसांच्या हल्ल्यातून सुटले नाही. पाठीवर, पोटावर वळ उठेपर्यंत लाठ्या हाणल्या. हे कमी होते म्हणून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. खुद्द बाबांच्या म्हणण्यानुसार, गोळीबारही झाला. लाठीहल्ल्यात पन्नासहून अधिक जखमी झाले. त्यातील एका महिलेची स्थिती गंभीर.
8.       २.१० : पोलिसांशी हुज्जत न घालण्याचे आणि शांतता राखण्याचे बाबांचे आवाहन
9.       २.३० : दिल्ली पोलीस बाबांना अटक करणार, हे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष समर्थकांनी बाबांभोवती मानवी साखळी करण्यास सुरुवात केली.
10.   २.४५ : मानवी कडे करूनही पोलिसांची जबदरस्ती थांबत नव्हती. पोलीस अटक करणार आणि उपोषण सोडायला भाग पाडणार, हे लक्षात येताच बाबांनी आपले सामान गोळा करण्यासाठी पोलिसांकडे पाच मिनिटांची मुदत मागितली. पोलिसांना चकवा देऊन बाबांनी तीन मीटर उंच व्यासपीठावरून जमिनीवर उडी मारली. कोणालाही काहीही कळण्याच्या आत बाबा समर्थकांच्या घोळक्यात मिसळून गेले. मध्येच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्याचे दिसले. थोड्या वेळानंतर ते दिसेनासे झाले आणि बाबा कुठे गेले? कुठे गेले? याची शोधाशोध सुरू झाली.
11.   ३.०० : पोलिसांना हुलकावणी देऊन बाबांनी एका महिलेचा वेष परिधान केला आणि पुढचा एक तास ते पोलिसांना गुंगारा देत होते.
12.   ४.०० : अखेरीस चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रामदेव बाबांना हुडकून काढले. दोन महिलांच्या खांद्यावर हात ठेवून चालणाऱ्या 'पांढऱ्या सलवार- कमीझमधील अतिशय जखमी महिले'ने अॅम्ब्युलन्समध्ये चढण्यास नकार दिल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची रवानगी सफदरजंग पोलीस ठाण्यात करण्यात आली.
13.   ४.३० : उपोषणासाठी उभारलेल्या मंडपातून सर्व समर्थकांना बाहेर हुसकावून लावले. त्यानंतर आबालवृद्ध, महिला आणि सर्व नागरिकांनी रस्त्यावर उर्वरित रात्र काढली.
14.   रविवारी सकाळी ९.०० : पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर दिल्ली पोलीस त्यांना घेऊन पालम विमानतळावर पोहोचले. तेथून बाबांना विमानाने डेहराडून येथे पाठविण्यात आले.
15.   ११.४५ : डेहराडूनहून बाबा गाडीने हरिद्वार येथील त्यांच्या पतंजली आश्रमात पोहोचले आणि त्यानंतर ज्येष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर बाबांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर तोफ डागली. उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार.

क्रमशः

(प्रस्तूत घटनाक्रम हा महाराष्ट्र टाईम्स च्या वेबसाईटवरून घेण्यात आला आहे. यात केवळ घटनाक्रमच केवळ बाहेरून घेण्यात आला आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

बाबा रामदेव की जय ! भाग- २

       मुळातच महत्त्वाकांक्षी असलेल्या रामदेव बाबांनी भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेला लढा खरचं धाडसी पाऊल आहे. महत्त्वाकांक्षी कोणी असावं आणि कोणी असू नये या तर्काचा तर मी मुळीच नाही. आधी सर्न संमतीने लढा उभारायचा ठरलेला असताना मधल्या मध्ये इंडीया अगेंस्ट करप्शन आणि अण्णा हजारे लोकपालच्या लढाईत भाव खाउून जातात. आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून टोटल रिफॉर्म वर बोलणार्‍या रामदेव बाबांनी जंतर मंतरच्या लढाईची सुत्रे पडद्यामागून अगदी चतुराईने सांभाळली होती. तेव्हा त्यांच्या सोबतीला होते त्यांच्याच गोतवळ्यातले दोनवेळा श्री श्री म्हणवून घेणारे साधूबाबा रविशंकरजी.
       श्री.श्री रविशंकर भारतीय समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण अशा तिन्ही आघाड्यांवर लिलया घेतलं जाणारं एकमेव नाव. कोणतीही कॉन्ट्रवर्सी नावाला अजूनपर्यंत लागलेली नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी हवा तसा मानमरातब. बाबा रामदेव आणि श्री.श्री रविशंकर यांनी जंतर मंजर च्या आंदोलनाची सुत्रे पडद्यामागून चालवली नव्हे तर पळवली. बाबा रामदेव यांच्याकडे देशातला ६० %  मध्यमवर्गाचं पाठबळ, पतंजली योगपीठाच्या माध्यमातून आलेला प्रचंड पैसा, एकुण भारतीय समाजमनामध्ये असलेली स्ंस्कृतीरक्षक, राष्ट्राभिमानी, योगी अशी प्रतिमा, भाषेचं उत्कृष्ट सामर्थ्य, लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि कार्यकर्त्यांकरवी पोहोचवण्याची हातोटी यात ते माहीर. तर दुसर्‍या बाजूला देशातल्या जवळपास व्हाईट कॉलर जॉब करणार्‍यांपैकी ८०% लोकांच्या गळ्यातला ताईत असलेले श्री.श्री रविशंकर, यांच्याकडेही आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून आलेली कोट्यावधींची गंगाजळी, देशातल्या नामवंत उद्योगपती, प्रभावी राजकारणी, पॉलिसीमेकर, टेक्नोक्रॅट, एकुण संपूर्ण मिडीया यांच्यामध्ये असलेला वावर त्यांचे महत्त्व द्विगुणीत करत होता. म्हणूनच या दोघांनीही अण्णांच्या उपोषणाला पाठींबा दिला पण त्यावेळेस स्वतः मात्र उपोषणाला बसले नव्हते. या दोन्ही बाबांनी केजरीवाल अँड हजारे कंपनीने प्रसारमाध्यमांना हाताशी धरून देशातील संपूर्ण अवस्थाच ढासळली  गेलीय आणि ती नीट करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, त्यावर लोकपाल नावाचं जालीम इंजेक्शन आम्ही शोधून काढलंय. ते देण्याचा अधिकार देखील फक्त आम्हालाच मिळायला हवा. आणि एकदा का हे इंजेक्शन दिले की मग बघा कसे सुतासारखे सरळ होतात! हा विचार रुजवून तसे जनमत तयार करण्यात ते १००% यशस्वी देखील झाले. मग काय गल्ली ते दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त श्रींमतांच्या पोरींना न्याय मिळावा किंवा ताजमध्यला उच्चभ्रूंवर हल्ला झाल्यावर मेणबत्या घेऊन रस्त्यांवर उतरणार्‍या पोरांनी ऐन उन्हाळ्यात दिवाळी साजरी केली. मग लोकपालाच्या बैठकांची रुपरेषा ठरली. समिती बनली. पण बाबा रामदेवांना मात्र कुठेच स्थान नाही. भूषण पिता-पुत्र दोघांचीही वर्णी लागली. केजरीवाल आणि अगदी अण्णा देखील आले. आंदोलनाच्या यशानंतर सेल्फ मेड सिवील सोसायटीच्या सदस्यांनी श्री.श्री रविशंकर यांच्याशी सलगी वाढवली आणि बाबा रामदेव यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि येथेच आंदोलनाचे खरे दोन तुकडे झाले. एक गट निर्माण झाला अण्णांचा तर दुसरा गट विरोधातला तयार झाला तो बाबा रामदेव यांचा.
       दुसर्‍या टोकाला अशा सगळ्या प्रकारच्या हालचाली घडत असताना महाभ्रष्ट कॉंग्रेस कार्यकारीणीने डाव साधला. हरिद्वार वरून उपोषणाचं हत्यार खांद्याला लटकावून निघालेल्या रामदेव बाबांना अवास्तव महत्त्व द्यायला सुरुवात केली. अगदी त्यांच्या दिल्लीतील आगमनापासून केंद्रतील बड्या राजकारण्यांनी बाबांना रेड कार्पेट ट्रिटमेंट कशी मिळेल याकडे साकल्याने लक्ष पुरविले. मग व्हायचा तोच परिणाम झाला. सोबतीला आरएसएस, भाजप आणि मित्रपक्षांचा  पाठिंबा असताना देखील जनलोकपालाच्या कक्षेतून पंतप्रधान व न्यायव्यवस्थेला वगळण्याची मागणी केली. सरकार एकदमच आपल्याला रेड कार्पेट ट्रिटमेंट देतेय हे पाहून रामदेव बाबा पण नरमले आणि वरील मागणी करून मोकळे झाले. वास्तविक पाहता आपण बाबांपुढे नमलो आहोत हे दाखवून बाबांना मोठे करताना त्यांच्या मागण्यांची धार कमी करणे आणि अण्णांच्या गटाचा प्रभाव कमी करणे असे दोन डाव एकाच खेळात या कॉंग्रेसच्या का्र्यकारिणीने साधले.
       भारत देश  भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहीजे. इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला वठणीवर आणलेच पाहीजे. यात कोणाचेही दुमत असता कामा नये.  बाबा रामदेवांनी हे पाउल उचलले ते निश्चितच धाडसी आहे पण योग्य नाही. ते जरी स्वागतार्ह असले तरी स्विकारार्य नाही. कारण या सर्व प्रकारामागे कुठे ना कुठे तरी व्यक्तिगत द्वेष, स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आकांक्षा, समोरच्या गटाला नीच दाखवण्याची इर्ष्या होती. त्यामागचा त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या एका रात्रीत मान्य होणे निश्चितच शक्य नाही. याउलट त्यांनी संपूर्ण परिस्थितीला अनुसरून एखादा सुवर्णमध्य सुचवायला हवा होता पण त्यांनी तसे केले नाही. आम्ही तेवढे सोवळे बाकीचे ते भ्रष्ट, देशातली राजकीय व्यवस्था म्हणजे भ्रष्ट लोकांची संस्था असा समज पसरवून देऊन लोकशाहीबद्दल अनास्था निर्माण करण्याची गरजच काय? जर आंदोलन सगळ्यांनी मिळून एकत्र सुरू केले होते तर आत्ता स्वतःने वेगळे होऊन वाट चोखाळण्याची गरजच काय? अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या पावसाळी आधिवेशानात सत्यात उतरतायेत की नाही हे पाहण्याइतका संयम बाबा रामदेव बाळगू शकले नाहीत? मग ते कसले योगी ? देशाला संसदीय लोकशाही आहे. भावनेच्या भरात आपण संसदीय लोकशाहीपेक्षा व्यक्तिच्या निर्णयाला जास्त महत्त्व देऊ लागलो तर आपल्या देशात देखील भगव्या पडद्याआडून चालणारी हुकूनशाही अवतरायला वेळ लागणार नाही ..
क्रमशः  

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons