Saturday, October 22, 2011

चांदण्याची छाया कापराची काया


चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया....

चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया....

बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया....

झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया.....

जरी संकटाची काळरात होती....



जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती.

पालवीत होते प्रकाशाचे गोळे,
चालवीत होते तुझे दोन डोळे,
प्रकाशाचे गाणे मनी गात होती....
अशी फौज माझी पुढे जात होती.

काळ्या काळजाची काळी काळदाती,
दात खात होती, पुढे येत होती,
तिचे काळे काळे, सुळे पाडण्याची
तुझी रग माझ्या मनगटात होती....

गणतीच माझी गुलामात होती
जिँदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती.

मला दावलेली तुझी पायवाट
झाली अता ती विकासाची वाट
वदे आज "वामन" कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती.

वेदाआधी तू होतास


वेदाआधी तू होतास 
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून
विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे    ऋचा 
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव,
तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस
आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले
हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही.
-          बाबूराव बागूल ---

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons