शाळेत असताना निबंधात एक विषय हमखास असायचा. सूर्य उगवलाच नाही तर ? आई संपावर गेली तर? बुद्धीच नष्ट झाली तर ? फारसा न हातळला जाणारा हा निबंधप्रकार. पण जर असं म्हटलं की, इंटरनेटच बंद झालं तर? अहो थोडासा विचार तर करून पहा. इंटरनेटविरहीत जगाची कल्पना करणं देखील किती अशक्य कोटीतला विचार आहे ना ! पण खरंच इंटरनेट संपावर जातंय. येत्या ८ मार्च २०१२ ला ते संपावर जाण्याची तयारी करतंय. सध्या डिएनएसचेंजर ट्रोजन या शक्तिशाली व्हायरसने जगभरातील अनेक संगणकप्रणालींवर ताबा मिळवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने ८ मार्च रोजी १०० पेक्षा अधिक देशांतील इंटरनेट सेवा बंद करण्याचे सुतोवाच केले असून संपूर्ण सर्व्हर व्हायरसफ्री करण्यासाठी काही कडक पावले उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे. संबंध मानवी समाजसमुहाचे आयुष्य सुखमय करणारं आंतरजालावर डिएनएसचेंजर ट्रोजनमुळे ही वेळ ओढावलीये.
आपण आत्तापर्यंत साईन इन ह्या सदरात सोशल नेटवर्किंग साईट्सवर चर्चा करत आलो आहोत. सध्याच्या सार्या सोनेसा ह्या इंटरनेटमुळेच आपल्यापर्यंत पोहोचतात. जर इंटरनेट हीच सर्वात विशाल व आद्य सोशल नेटवर्किंग असल्याचे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही. माणूस ज्या समुहात राहतो त्याठिकाणच्या वास्तविकतेनुसार त्याच्या जाणिवा आणि गरजा निर्माण होत असतात. गरज हीच शोधाची जननी आहे. दळणवळण, संदेशवहनाच्या वेगवान सोयीसुविधांमुळे जगाच्या पाठीवरिल विविध मानवी समुह एकमेकांच्या संपर्कात किंवा नेटवर्कमध्ये बांधले गेले. चौफेर विखूरलेले जग इंटरनेटच्या संपर्क क्रांतीमुळे अगदी जवळ आले. हीच सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग. पण ह्यावर सुद्धा व्हायरसचे ग्रहण लागले आहे. नेमका हा डिएनएसचेंजर ट्रोजन आहे तरी काय हे समजून घेताना त्याच्या दृश्य व अदृश्य परिणामांची चर्चा होणे देखील तितकेच गरजेचे आहे.
डॉटकॉम प्रणाली ही संकेतस्थळाची जन्मदाती. प्रत्येक संकेतस्थळाला स्वतःचे डोमेन म्हणजे नाव-वजा-पत्ता असतो. हे डोमेन-नेम ज्या सर्व्हरमधून वितरीत होते त्या सर्व्हरला निकामी करण्याची करामत डिएनएसचेंजर ट्रोजन करू पाहत आहे. त्यामुळे डोमेन एक आणि आतले कंटेट भलतेच असा विचित्र गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जर सर्व्हरमध्येच तांत्रिक बिघाड झाला तर संकेतस्थळावर उपलब्ध असणार्या माहीतीची कोणत्याही प्रकारे सुरक्षाहमी दिली जाऊ शकणार नाही. यामुळे संपूर्ण जगाला फार मोठ्या आर्थिक व सुरक्षाविषयक संकटांना तोंड द्यावे लागू शकते. सारी बॅंकिंग सिस्टिम, गुप्त दस्तावेज, संपर्कप्रणाली, सारे ब्लॉग्ज, सोशन नेटवर्किंग साईट्स, उपग्रहे, दळवळणाच्या सार्या सुविधा ठप्प होतील. एकुणतःच इंटरनेट बंद होणार्या त्या १०० देशांतील एकुण कार्यप्रणालीला जबर नुकसान पोहोचेल. ह्या व्हायरसला ८ मार्च पूर्वीच नष्ट करण्यासाठी अनेक तज्ञ प्रयत्नशील आहेत. परंतू एक दिवस जरी इंटरनेट बंद राहीले तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त होतेय. गेल्या वर्षी इजिप्तमध्ये झालेल्या राजकीय क्रांतिच्या काळात इंटरनेट सेवा बंद केली गेली होती. पहिल्या दोन दिवसातच ४१० कोटीं रुपयांचे नुकसान इजिप्तला सोसावे लागले होते.
सदर संकटाला टाळण्यासाठी एफबीआयने गेल्या वर्षीच एका पर्यायी डिएनएस सर्व्हरची उभारणी केली होती. अतिशय गुप्तपणे क्लिनींगची प्रक्रिया सुरू होती. ६ नोव्हेंबर २०११ रोजी डिएनएसचेंजर ट्रोजन वायरस बनविण्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील एस्टोनिया प्रांतातून सहा जणांना अटक करण्यात आली होती. हा वायरस ज्या सिस्टिममध्ये शिरतो त्या सिस्टिम आणि नेटवर्कला करप्ट करतो. त्यावर नको असलेले सॉफ्टवेअर आपोआप डाउनलोड होत जातात. गंम्मत म्हणजे तुमची सिस्टिम ही वायरस अफेक्टेड आहे ती क्लिन करण्यासाठी इथे क्लिक करा असा संदेश हा वायरस प्रोग्रामकडून कंम्प्यूटर स्क्रिनवर पाठवला जातो. त्याला क्लिक करताक्षणी वायरस संपूर्ण सिस्टिमचा ताबा घेतो.
आत्तापर्यंत एकट्या अमेरिकेतच साडे पाच लाखांहून अधिक संगणक ट्रोजनला बळी पडले आहेत. एफबीआयने लावलेले पर्यायी सर्व्हर सुद्धा कूचकामी ठरले. फॉर्चून च्या जवळपास तीनशे कंपन्या, जगातील प्रमुख ७० संस्थांपैकी २७ संस्थांचे सर्व्हर्सचे ह्या वायरसमुळे नुकसान झाले आहे. ह्या कंपन्या व संस्थांसाठी वापरले जाणारे सर्व्हर हे एफबीआयच्या डीएनएस सर्व्हरवर काम करतात. कोर्टाने दिलेल्या मुदतीत जर कोणतीही उकल काढली गेली नाही तर इंटरनेट सुविधा बंद होण्याची शक्यता ही १०० % आहे. एकट्या भारतातच गेल्या डिसेंबर अखेरपर्यंत १२ कोटी इंटरनेट युजर्स असल्याचे आय-क्यूबने जाहीर केले होते. अमेरिकेपाठोपाठ भारत हा इंटरनेट जगतातील क्रमांक दोनची सर्वात मोठी बाजारपेठ असून ह्या व्हायरसचा अमेरिकेनंतर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच सहन करावा लागेल.
संगणक, आंतरजालप्रणाली ही मानवाने स्वतःच्या उत्कर्षासाठी विकसित केलेली आहे. स्वतः जन्माला घालणार्या अनेक नवीन शोधांवर प्रमाणापेक्षा अधिक विसंबून राहण्याची सवय मानवी मनाने सोडायला हवी. यापूर्वी वायटूके या सुपर बग मुळे सारी संपर्कप्रणाली नष्ट होण्याची भीती व्यक्त केली होती. पण ती भीती तज्ञांनी फोल ठरवली. प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये ट्रोजन-हॉर्सला ढाल बनवून अख्खे ट्रॉय शहर उद्धवस्त केले गेले होते. आत्ता हाच डीएनएसचेंजर ट्रोजन नव्या युगातील सायबर वर्ल्डला लगाम घालू पाहतोय. परंतू मानवी मनाच्या व बु्द्धीच्या उच्चतम कौशल्य असलेले इंटरनेट व त्याचे निर्माणकर्ते हे संकट कसे थोपवतात ते पाहणे निश्चितच औत्स्यूक्याचे ठरेल.
(पुढील भागासाठी येथे क्लिक करा )