वैभव छाया
सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकणारा एक ताकदवर विरोधी राजकीय पक्ष असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. परंतू सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे. सर्वाना सामावून घेण्यासाठी निर्मिलेल्या पक्षाचेच आज ४४ गट पडलेले आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एका दशकभरानंतर उदयाला आलेला रिपब्लिकन पक्ष मात्र आजच्या घडीला राजकारणातील आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते स्थान किंवा अस्तित्व त्यांना परत मिळेलच याची आशा फार धूसर होत चालली आहे. सध्या रिपब्लिकन चळवळींवर विचारांची घुसळण जोरदारपणे चालू आहे. काही अतिहुशार स्वघोषित विचारवंत सोशल नेटवìकग वेबसाइट्सवर रिपब्लिकन पक्षांवर वाटेल ती टीका करण्यात धन्यता मानत आहेत. वेगवेगळ्या ग्रुप्सवर टाकलेल्या पोस्टवर हजारो कमेंट्सने फेसबुकचे रकानेच्या रकाने भरून निघत आहेत. त्या साऱ्या चर्चेवरून रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन चळवळ आजच्या पिढीला नीटसा कळला नसल्याचेच दिसून येते आहे. या साऱ्या चर्चामध्ये पक्षाची उत्पत्ती व व्यूत्पत्ती, त्याची संकल्पना, तत्त्वज्ञान, बाबासाहेबांनी जनतेस उद्देशून लिहिलेले खुले पत्र याबद्दल नेहमीच उदासीनता बाळगलेली दिसते. अध्र्या हळकुंडात पिवळे होउन फेसबुकचा वेबस्पेस वाढविणाऱ्या त्या साऱ्या बोरूबहाद्दरांसाठी खास रिपब्लिकन पक्षाच्या तत्वप्रणालीवर टाकलेली ही नजर. .
संसदीय राजकारणावर व समताधिष्ठित राजकीय तत्वज्ञानावर उच्चतम विश्वास असणारा रिपब्लिकन पक्ष सध्या राजकीय अडचणीतून बाहेर येण्याचा जोरदार प्रयत्न करतोय. तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रखर विरोधी पक्ष असावा म्हणून आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे, डॉ. लोहीयांसारख्या समाजवादी नेत्यांना सोबत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. बाबासाहेबांनी याकरिता भारतीय जनतेला एक खुले पत्र देखील लिहिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. या लोकसत्ताक विचारसरणीवर उभ्या राहिलेल्या पक्षाच्या निर्मितीमागील बाबासाहेबांची व्यापक भूमिका व इतिहास समजून घेतल्याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे खरे महत्त्व कळणे अशक्य आहे.
भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ साली प्रथमच घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेस पक्षाने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ४८९ जागांपकी ३६४ जागांवर विजय संपादन करत बहुमताचे सरकार स्थापन केले. १८८५ साली काँग्रेस पक्ष हा परकिय सत्तेविरोधात यल्गार पुकारून देशात स्वातंत्र्य निर्मितीचे ध्येय घेउन स्थापन झाला होता. १९४७ साली साध्य प्रत्यक्षात सिद्ध होताच गांधीजीनी काँग्रेसला बरखास्त करण्याचा सल्ला देखील दिला होता. पण तो सल्ला मानला गेला नाही. अशा वेळी लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकणारा एक ताकदवर विरोधी राजकीय पक्ष असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना सर्वासमोर मांडली. ही संकल्पना मांडताना १९५४ पर्यंतच्या राजकारणाचा र्सवकष अभ्यास, शेल्ड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा इतिहास व भविष्यातील आव्हानांचा आढावा घेऊनच रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती.
बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची आखणी करताना फार मोठी दूरदृष्टी ठेवली होती. सर्वसमावेशक राजकारणासाठी सर्वाना सामावून घेता येणारा एक प्रबळ राजकीय विचारमंच त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यामातून लोकांना द्यायचा होता. परंतु, सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे.
१९५१-१९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकात देशभरातील एकूण ५४ विविध प्रांतीय व राष्ट्रीय पक्षांनी सहभाग घेतला होता. त्यात काँग्रेसव्यतिरिक्त कोणालाही वाखाणण्याजोगे यश मिळाले नव्हते. दरम्यानच्या काळात बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते. सोबत सर्वसमावेशक अशा नव्या राजकीय पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. यासंदर्भात १० डिसेंबर १९५५ रोजी जनता पाक्षिकात बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक होती. ते म्हणाले की,
‘‘माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढण्याचा विचार आहे. भारतीय राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबविण्यासाठी हा पक्ष काढण्यात येणार असून पक्षाचे मुख्य ध्येय समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव असे राहणार आहे. भारतातील सत्ताधारी काँग्रेसला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान पक्षांचे या नवीन पक्षांत एकत्रीकरण करण्यात येईल आणि अमेरिकन धर्तीवर हा पक्ष कार्य करीत राहील. भारतातील व्यापारी वर्गाने अमेरिकेतील व्यापारी वर्गाप्रमाणे सत्ताधारी व विरोधी पक्षास सहकार्य केल्यास दोन्ही पक्ष मजबूत पायांवर काम करू शकतील व त्यामुळे लोकशाहीच्या निरोगी वाढीस मोठा हातभार लागू शकेल.लहानसहान पक्षांजवळचे मामुली निधी, कार्यकर्त्यांची वानवा, या गोष्टी लक्षात घेता सध्याच्या राजकीय वातावरणात अशा पक्षांना बिलकूल भविष्यकाळ नाही. सरकारने व देशभक्तांनी अमेरिकेप्रमाणेच काँग्रेस व रिपब्लिकन पक्षांच्या वाढीस प्रोत्साहन द्यावे. उदाहरणादखल घ्यायचे झाल्यास, गेल्या निवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला काही हजार रुपये ही खर्च करता आले नाही. या उलट काँग्रेस पक्षाने कास्ट फेडरेशनचा पराभव करण्यासाठी अमाप पसा खर्च केला. ’’
वरील प्रतिक्रियेतून सहज लक्षात येण्यासारखी एक गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची आखणी करताना फार मोठी दूरदृष्टी ठेवली होती. सर्वसमावेशक राजकारणासाठी सर्वाना सामावून घेता येणारा एक प्रबळ राजकीय विचारमंच त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यामातून लोकांना द्यायचा होता. परंतु, सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे. किंबहुना ते त्याचे सोंग घेत असावे. सर्वाना सामावून घेण्यासाठी निर्मिलेल्या पक्षाचेच आज ४४ गट पडलेले आहेत. एकेकाळी स्वाभिमानी रिपब्लिकन जनता अशी ओळख असणाऱ्या वर्गाला स्वार्थलोलुप नेतृत्वाने व त्यांच्या स्वसंस्थापित नेतृत्वगटाने व्होट बँकचा दर्जा मिळवून दिला. आणि एका प्रकारे राजकीय अध:पतानाला सुरूवात करून दिली.
बाबासाहेबांनी १३ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते की, धर्मातरानंतर कदाचित शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष अस्तित्वात राहणार नाही. मात्र धर्मातरानंतर मी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा सदस्य राहणार नसून लवकरच रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात येईल. मी त्या पक्षाची घटनाही तयार केली आहे. त्याच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन प्रमुख तत्वांवर हा पक्ष आधारलेला राहील. पार्लमेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची कसोटी या तीन निकषांवर पाहिली जाईल. या पक्षाला स्वत:चे असे तत्वज्ञान असेल.
कोणत्याही राजकीय पक्षाला तत्वज्ञानाएवढेच एखाद्या कणखर नेत्याची आवश्यकता असते, हे बाबासाहेबांनी निक्षून संगितले होते. एका प्रबळ राजकीय पक्षाच्या निर्मितासाठी आणि त्याच्या सशक्त वाढीसाठी लागणारे सारे आवश्यक घटक भारतीय जनतेस रिपब्लिकन पक्षात सामील होण्यासाठी लिहिलेल्या खुल्या पत्रात उद्धृत केले आहेत. खुले पत्र केवळ एक पत्र नसून एक भक्कम विचारसरणी आहे. रिपब्लिकन पक्षाची मुहूर्तमेढ याच विचारसरणीवर व त्यातील तत्वज्ञानावर आधारित आहे. हे तत्वज्ञान काळानुरूप स्वत:मध्ये बदल घडवणारे असून जगातील कोणत्याही राष्ट्रात लोकशाहीची स्थापना व तिच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. जगातील वैफल्यग्रस्त राष्ट्रांत रक्तहीन क्रांती घडवून आणण्यासाठी तिची क्षमता अत्यंत प्रभावी आहे. त्यांचे विश्लेषण पुढील काही मुद्दयांच्या आधारे करता येऊ शकेल.
विसाव्या शतकात जातीव्यवस्थेने हळूहळू आíथक व्यवस्थेचे स्वरूप प्राप्त केले होते ज्यात लोकशाहीवादी राष्ट्र असूनही मूठभरांनी बहुसंख्यांकांवर आजन्म वर्चस्व गाजविण्याचे जन्मसिद्ध अधिकार मिळविल्याचे प्रतीत होत होते.
१. ही विचारधारा केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा पुरस्कार करून थांबत नाही तर कोणत्याही चळवळीचे राजकीय चळवळीत रुपांतर होताना कोणती स्थित्यंतरे होतात याची शास्त्रशुद्ध मांडणी करते.
२. लोकशाहीचा पुरस्कार करताना अधिकाअधिक संसदीय लोकशाहीचे महत्त्व व तीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पटवून देते.
३. लोकशाहीचे भविष्यातील बदलणारे स्वरूप, तिच्या उद्दिष्टांवर भाष्य करताना आधुनिक लोकशाहीचा पर्याय सुचविते. सोबत आधुनिक लोकशाही तिचे नेमके उद्दिष्ट आणि त्यांची योग्य व्याख्या हे खुले पत्र अतिशय नेटकेपणाने करते.
४. लोकशाहीच्या यशस्वी सिद्धीसाठी आवश्यक असणारे घटक :-
विषमतारहित समाज
विवेकबुद्धी बाळगणारा प्रखर संसदीय विरोधी पक्ष
वैधानिक व कारभार विषयक क्षेत्रांत पाळावयाची समता
संविधानात्मक नीतींचे कसोशीने व नतिकतेने करावयाचे पालन
अल्पसंख्यकांची सुरक्षा
राज्यशास्त्राधिष्ठित नीतीमान समाजव्यवस्थेची आवश्यकता
विचारी, जागरूक, विवेकी जनमत
इतकी प्रभावी विचारप्रणाली आजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या घटनेमध्ये अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही. या खुल्या पत्रांचे विवेचन करताना तत्कालिन रिपब्लिकन नेते अॅ ड. बी. सी. कांबळे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्राचा संदेश भारताच्या कानाकोपऱ्यात आणि भारतीय लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत निकडीचे आहे. त्याचप्रमाणे, जणू हे खुले पत्र जगातील लोकांस उद्देशून आहे असे समजून, खुल्या पत्राचा संदेश राष्ट्रसंघापर्यंत व शक्यतो जगातील लोकांपर्यंत पोहोचवणे तितकेच निकडीचे आहे. कोणी हे कार्य करील तर ते जगाच्या धन्यवादाला पात्र होतील. कोणी हे करो वा न करो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणाऱ्या तमाम लोकांनी हे कार्य करण्यास पुढे यावे जगाचा व भारताचा बचाव रक्तपातापासून करावा.
बाबासाहेबांनी आपल्या भाषणात संदेश दिला होता, जा आपल्या घरातील भिंतीवर लिहून ठेवा की, मला या देशातील शासनकर्ती जमात व्हायचे आहे. बाबासाहेबांचा हा संदेश तर सर्वानी ऐकला. पण त्यासाठी करावी लागणी तपस्या, ती तपस्या यशोसिद्धीस नेण्यास करावी लागणारी प्रयत्नांची पराकाष्ठा, या सर्वावर ज्या र्सवकष विवेकबुद्धीने, वस्तूनिष्ठ दृष्टिकोनातून जे सखोल चिंतन व्हावयास हवे होते ते आजवर झालेले नाही. यासाठी सांप्रत ४४ गटां-तटांत विखुरला गेलेल्या व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जबाबदार धरावे का? की त्यांना कोणत्याही प्रकारचा जाब न विचारणाऱ्या अविवेकी जनमत बाळगणाऱ्या मतदारांना जबाबदार धरावे? या दोन प्रमुख प्रश्नांची कारणे आपणच शोधायला हवीत.
विसाव्या शतकात जातीव्यवस्थेने हळूहळू आíथक व्यवस्थेचे स्वरूप प्राप्त केले होते ज्यात लोकशाहीवादी राष्ट्र असूनही मूठभरांनी बहुसंख्यांकांवर आजन्म वर्चस्व गाजविण्याचे जन्मसिद्ध अधिकार मिळविल्याचे प्रतीत होत होते. बाबासाहेब कोणतेही सुधारणावादी आंदोलन उभारून त्याचा रेटा पुढे ओढत राहू शकले असते, पण त्यापेक्षा धर्मातराचे काँक्रिट सोल्यूशन जातीव्यवस्थेच्या फुटक्या िभतीवर लावले आणि विषमतारहित भारतीय समाजाच्या भक्कम पायाभरणीसाठी रक्तहीन समाजक्रांती घडवून आणली. भारतीय जनतेस ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला पािठबा देण्यासाठी आवाहन करणाऱ्या खुल्या पत्राचा साकल्याने अभ्यास व्हावयास हवा. कारण समाजक्रांतीप्रमाणे बाबासाहेबांना राजकीय क्रांती देखील अपेक्षित होती. तिचा उगम व स्थापना ही रिपाईच्या माध्यमातून व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले होते. पक्ष कसा असावा त्यासाठी आवश्यक असलेल्या भूमिकेचा आणि तत्वज्ञानाचा, नतिकतेचा सबगोलंकारी परिप्रेक्ष्यातून अध्ययन करताना वैचरिक दिग्दर्शन आणि त्यासंबंधीची दूरदृष्टी याबाबतची डॉ. बाबासाहेबांची भूमिकाच आपल्याला या खुल्या पत्रातून पहायला मिळते.
१. चळवळीची व्याख्या कशी करावी, तिचे उद्दिष्टपूर्तीनंतर राजकीय पक्षात होणारे रूपांतर किंवा त्या चळवळीला राजकीय पक्षाचे कालौघात प्राप्त होणारे स्वरूप यातील स्थित्यंतरे व त्यांचे आधुनिक संसदीय लोकशाहीत असलेले महत्त्व अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे.
२. आधुनिक संसदीय लोकशाहीचा अभ्यास व त्यात सक्रिय सहभाग नोंदविताना लोकशाहीचे स्वरुप (Form of Democracy) आणि तिचे उद्दिष्ट (Purpose) हे काळाप्रमाणे बदलत आलेले आहे. म्हणूनच आजची लोकशाही ही आधुनिक लोकशाही बनली असून या लोकशाहीचे उद्दिष्ट हे अनियंत्रित राजसत्तेवर नियंत्रण घालणे नसून, ‘लोककल्याण’ साधणे हे आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी लोकशाहीची दिलेली व्याख्या ही पुढीलप्रमाणे आहे. . ‘लोकांच्या आíथक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविहीन मार्गानी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजचे लोकशाही’ होय.
आज रिपब्लिकन चळवळीचे राजकीय अंग जवळजवळ रसातळाला गेले आहे. विविध पक्षांत असलेल्या बुद्धीवादी लोकांना त्यांचा इष्ट सन्मान मिळत नाही आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे एका जातीपुरती किंवा एका विशिष्ट नेत्यापुरती मर्यादित करून चर्चिली जात आहे.
३. राजकारणात सत्ताधारी पक्षाएवढीच विरोधी पक्षाची आवश्यकता असते. सृजनशीन व विवेकी जनमताच्या अभावामुळे लोकशाही राबविण्यात अडचणी येतात. सरकार व कायदेमंडळाचे कामकाज योग्य रीतीने पार पडण्यासाठी लोकमत ओळखता येणे गरजेचे आहे. प्रचाराधिष्ठित सरकार व लोकशिक्षणाचा पाया घालणारे सरकार यात असलेला मूलभूत फरक स्पष्ट केला पाहीजे. कारण प्रचार हा कायम एकांगी असतो तर लोकशिक्षणाधारित सरकार सांगोपांग चच्रेतून येणारे र्सवकष समाधान असते. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळे एकपक्षीय हुकूमशाही टळण्यास मदत होते.
४. पक्ष हा सन्यासारखा असतो. सरसेनापतीसारखा पुढारी (नेता), संघटना, सभासद, मुलभूत योजना शिस्त, पक्षाचे कार्यक्रम, राजकीय डावपेच व मुत्सुद्देगिरी या गोष्टींचा समावेश यात होतो.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -ध्येय व उद्दिष्टय़े
भारतीय घटनेची प्रस्तावना पुढीलप्रमाणे आहे-
‘आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आíथक व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य; संधी व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रऐक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू. ’
भारतीय घटनेच्या या प्रस्तावनेतील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व साध्य करणे हेच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट राहील.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सार्वजनिक व्यवहारात खालील तत्वांना बांधलेला राहील,
१) सर्व भारतीयांना समान न्याय मिळेल; एवढेच नव्हे तर समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे असे मानण्यात येईल. आणि यानुसार जेथे समता नाही तेथे ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथे ती नाकारण्यात येते, तेथे ती राबविण्यासाठी लढा देईल.
२) प्रत्येक व्यक्तीचे सुख हा केंद्रिबदू समजण्यात येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्तीस समान संधी मिळेल. शासन संस्था ही, हे ध्येय मिळविण्यासाठी वापरावयाचे साधन होय.
३) इतर देश बांधवांच्या हक्कांचे व शासन संस्थेच्या आवश्यक तेवढय़ा अधिकारांचे संरक्षण करून प्रत्येक नागरिकांस धार्मिक,आíथक,राजकीय स्वातंत्र्य असले पाहिजे असे हा पक्ष मानील.
४) प्रत्येक भारतीय नागरिकांस समान संधीचा अधिकार असल्याचे हा पक्ष मान्य करील. अर्थात, ज्यांना आत्मोन्नतीसाठी कधीच संधी मिळालेली नसेल त्यांना संधी मिळालेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याचे तत्व पक्ष अंगीकारेल.
५) प्रत्येक व्यक्तीस जीवनातील गरजा व भीती यापासून मुक्ती मिळवून देण्याच्या शासन संस्थेच्या कर्तव्याची जाणीव सरकारला हा पक्ष सातत्याने देईल.
६) हा पक्ष स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रह धरील आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाची, किंवा एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून होणारी पिळवणूक व दडपशाही यांना पायबंद घालील.
७) व्यक्ती व समाज या दोहोंच्या भल्याच्या दृष्टीने संसदीय राज्यपद्धती ही सर्वोत्तम राज्यपद्धती आहे अशी या पक्षाची श्रद्धा राहील.
आज रिपब्लिकन चळवळीचे राजकीय अंग जवळजवळ रसातळाला गेले आहे. विविध पक्षांत असलेल्या बुद्धीवादी लोकांना त्यांचा इष्ट सन्मान मिळत नाही आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे एका जातीपुरती किंवा एका विशिष्ट नेत्यापुरती मर्यादित करून चर्चिली जात आहे. त्या सर्वानी उपरोल्लिखीत मुद्यांचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. अशा बलदंड राजकीय, सामाजिक व आíथक परिप्रेक्ष्यातून परजलेल्या तत्वज्ञानावर रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्याचा मानस बाबासाहेबांचा होता. अशा बांधणीचा, विचारसरणीचा, तत्वज्ञान जोपासणारा पक्ष राष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेसाठी कायम हितकारी राहील याचा त्यांना विश्वास होता. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी पक्षाची स्थापना झाली. आणि पाहता पाहता १९५७ सालच्या निवडणुकांत देशातील क्रंमांक चारचा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास देखील आला. हे अभूतपूर्व यश पाहण्यासाठी मात्र बाबासाहेब हयात नव्हते.
lokprabha@expressindia.com
http://www.lokprabha.com/20120106/tatvataha.htm