Sunday, October 2, 2011

राजमाता जिजाबाई


आजचा मान : - राजमाता जिजाबाई ....  महाराष्ट्राची जिजाऊ यांचा

राजमाता जिजाबाई (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा ।
लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥
लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून ।
वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥

जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत ।
स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास ।
दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥

गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला ।
उत्सुक झाली होती जिजाई, ध्यास लागला जीवाला ॥

राजमाता जिजा महशूर । दिगंतावर ।
केला तिनं थोर । महाराष्ट्राचा राजा शिवराय ।
दुस्मान करी सदा हाय हाय । धन्य ती जिजा आपुली माय ॥
   
शिवनेरीला जन्म जाहला शिवाजीचा त्या वेळेला ।
महाप्रतापी बाळ जन्मला, आनंदाला भर आला ॥
जिजाबाई देई शिक्षण शिवाजी बाळाला ॥
रामायण महाभारत शिकवी ती त्याला ॥
दुष्टांचा नाश करण्याला । रामकृष्ण अवतार झाले शिकवलं त्याला ॥
लहानाचा मोठा बाळ झाला । अन्यायाची चीड ये त्याला ।
देवधर्म साधुसंताचा भक्त तो झाला ॥१॥
जिजाबाई आणि शिवराय गेले पुण्याला ॥
दादोजी कोंडदेव होते गुरुजी त्याला ॥
हिंदवी राज्य करण्याचा संकल्प केला ॥
तवां बोलला बाळ आईला । "आई आशीर्वाद दे मला ।"
रोहिडेश ठेवला साक्षीला । आणि हिंदवी राज्य करण्याच्या घेतलं शपथेला ॥
जिजाबाई बोलली त्याला । "बाळा ! आशीर्वाद हा तुला ।
जगदंबा तुझ्या पाठीला । भारी होशिल कळिकाळाला ।
शिवशंकर यश देणारा । धन्य धन्य माता ती धन्य बाळ तो झाला ॥२॥
शिवाजीचं मन तिनं भारलं थोर पराक्रम करण्याला ।
राजा शिवाजी तिनं घडविला, राज्य हिंदवी करण्याला ॥
संकटं आली मोठमोठालीं शिवरायावरती जेव्हां ।
पुढेंच जा तूं, मागें सरुं नको’, माता बोलली हो तेव्हां ॥
"देवी भवानी प्रसन्न तुजला देईल यश तुज चौफेर ।
तूं सिंहाचा बच्चा, लांडगे कसे तुला रे धरणार" ॥
   
चालून आल अफझलखान । केली त्याचा दाणादाण ॥
चालून आला फाजलखान । निसटून गेला वीर महान ॥
चालून आला शास्ताखान । बोटं छाटून केला म्लान ॥
सिंह आग्र्याला सांपडला । तेथूनी पण सुटुनी आला ॥
कैक संकटें प्राणघातकी शिवबावरती जरि आली ।
तरी न माता डगमगली ॥३॥
   
धीर देत ती पुढे   ली ।
शिवराज्याभिषेक सोहळा तिनं पाहिला ।
तृप्त झाला मातेचा डोळा ।
   
शहाजी राजे नव्हते परि ते सौख्य सोहळा बघण्याला ।
मनांत येऊन खिन्न जाहली वीरपत्नीा ती त्या वेळां ॥
पंधरा दिवस ही पुढें न जगली इहयात्रा ती संपविली ।
जगदंबेचे नांव घेऊनी परलोकीं निघुनी गेली ॥
   
पाचाड गांवी अंत तो झाला । रायगडाच्याच पायथ्याला ।
धन्य शहाजी धन्य जिजाई धन्य शिवाजी जगिं झाले ।
मायबाप ही धन्य पुत्र हा धन्य असे जगतीं झाले ॥
घरांघरांतून दर्शन होईल जिजामातेचें ते जेव्हां ।
भरभराट होईल देशाची निश्चित जन हो मग तेव्हां ॥
जिजाई व्हावें जगांत तुम्ही आयाबहिणींनो ही विनति ।
पांडुरंग शाहीर जाहला कीर्ति गावया सिद्धमति ॥४॥

  
विनंती :- लाइक  करणे  सोपे  असते  तेव्हा आपल्या प्रत्येक प्रतिक्रिये मधे जिजाऊ ना अभिवादन   करा

 


 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons