Monday, June 6, 2011

बाबा रामदेव की जय ! भाग- २

       मुळातच महत्त्वाकांक्षी असलेल्या रामदेव बाबांनी भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेला लढा खरचं धाडसी पाऊल आहे. महत्त्वाकांक्षी कोणी असावं आणि कोणी असू नये या तर्काचा तर मी मुळीच नाही. आधी सर्न संमतीने लढा उभारायचा ठरलेला असताना मधल्या मध्ये इंडीया अगेंस्ट करप्शन आणि अण्णा हजारे लोकपालच्या लढाईत भाव खाउून जातात. आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून टोटल रिफॉर्म वर बोलणार्‍या रामदेव बाबांनी जंतर मंतरच्या लढाईची सुत्रे पडद्यामागून अगदी चतुराईने सांभाळली होती. तेव्हा त्यांच्या सोबतीला होते त्यांच्याच गोतवळ्यातले दोनवेळा श्री श्री म्हणवून घेणारे साधूबाबा रविशंकरजी.
       श्री.श्री रविशंकर भारतीय समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण अशा तिन्ही आघाड्यांवर लिलया घेतलं जाणारं एकमेव नाव. कोणतीही कॉन्ट्रवर्सी नावाला अजूनपर्यंत लागलेली नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी हवा तसा मानमरातब. बाबा रामदेव आणि श्री.श्री रविशंकर यांनी जंतर मंजर च्या आंदोलनाची सुत्रे पडद्यामागून चालवली नव्हे तर पळवली. बाबा रामदेव यांच्याकडे देशातला ६० %  मध्यमवर्गाचं पाठबळ, पतंजली योगपीठाच्या माध्यमातून आलेला प्रचंड पैसा, एकुण भारतीय समाजमनामध्ये असलेली स्ंस्कृतीरक्षक, राष्ट्राभिमानी, योगी अशी प्रतिमा, भाषेचं उत्कृष्ट सामर्थ्य, लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि कार्यकर्त्यांकरवी पोहोचवण्याची हातोटी यात ते माहीर. तर दुसर्‍या बाजूला देशातल्या जवळपास व्हाईट कॉलर जॉब करणार्‍यांपैकी ८०% लोकांच्या गळ्यातला ताईत असलेले श्री.श्री रविशंकर, यांच्याकडेही आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून आलेली कोट्यावधींची गंगाजळी, देशातल्या नामवंत उद्योगपती, प्रभावी राजकारणी, पॉलिसीमेकर, टेक्नोक्रॅट, एकुण संपूर्ण मिडीया यांच्यामध्ये असलेला वावर त्यांचे महत्त्व द्विगुणीत करत होता. म्हणूनच या दोघांनीही अण्णांच्या उपोषणाला पाठींबा दिला पण त्यावेळेस स्वतः मात्र उपोषणाला बसले नव्हते. या दोन्ही बाबांनी केजरीवाल अँड हजारे कंपनीने प्रसारमाध्यमांना हाताशी धरून देशातील संपूर्ण अवस्थाच ढासळली  गेलीय आणि ती नीट करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, त्यावर लोकपाल नावाचं जालीम इंजेक्शन आम्ही शोधून काढलंय. ते देण्याचा अधिकार देखील फक्त आम्हालाच मिळायला हवा. आणि एकदा का हे इंजेक्शन दिले की मग बघा कसे सुतासारखे सरळ होतात! हा विचार रुजवून तसे जनमत तयार करण्यात ते १००% यशस्वी देखील झाले. मग काय गल्ली ते दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त श्रींमतांच्या पोरींना न्याय मिळावा किंवा ताजमध्यला उच्चभ्रूंवर हल्ला झाल्यावर मेणबत्या घेऊन रस्त्यांवर उतरणार्‍या पोरांनी ऐन उन्हाळ्यात दिवाळी साजरी केली. मग लोकपालाच्या बैठकांची रुपरेषा ठरली. समिती बनली. पण बाबा रामदेवांना मात्र कुठेच स्थान नाही. भूषण पिता-पुत्र दोघांचीही वर्णी लागली. केजरीवाल आणि अगदी अण्णा देखील आले. आंदोलनाच्या यशानंतर सेल्फ मेड सिवील सोसायटीच्या सदस्यांनी श्री.श्री रविशंकर यांच्याशी सलगी वाढवली आणि बाबा रामदेव यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि येथेच आंदोलनाचे खरे दोन तुकडे झाले. एक गट निर्माण झाला अण्णांचा तर दुसरा गट विरोधातला तयार झाला तो बाबा रामदेव यांचा.
       दुसर्‍या टोकाला अशा सगळ्या प्रकारच्या हालचाली घडत असताना महाभ्रष्ट कॉंग्रेस कार्यकारीणीने डाव साधला. हरिद्वार वरून उपोषणाचं हत्यार खांद्याला लटकावून निघालेल्या रामदेव बाबांना अवास्तव महत्त्व द्यायला सुरुवात केली. अगदी त्यांच्या दिल्लीतील आगमनापासून केंद्रतील बड्या राजकारण्यांनी बाबांना रेड कार्पेट ट्रिटमेंट कशी मिळेल याकडे साकल्याने लक्ष पुरविले. मग व्हायचा तोच परिणाम झाला. सोबतीला आरएसएस, भाजप आणि मित्रपक्षांचा  पाठिंबा असताना देखील जनलोकपालाच्या कक्षेतून पंतप्रधान व न्यायव्यवस्थेला वगळण्याची मागणी केली. सरकार एकदमच आपल्याला रेड कार्पेट ट्रिटमेंट देतेय हे पाहून रामदेव बाबा पण नरमले आणि वरील मागणी करून मोकळे झाले. वास्तविक पाहता आपण बाबांपुढे नमलो आहोत हे दाखवून बाबांना मोठे करताना त्यांच्या मागण्यांची धार कमी करणे आणि अण्णांच्या गटाचा प्रभाव कमी करणे असे दोन डाव एकाच खेळात या कॉंग्रेसच्या का्र्यकारिणीने साधले.
       भारत देश  भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहीजे. इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला वठणीवर आणलेच पाहीजे. यात कोणाचेही दुमत असता कामा नये.  बाबा रामदेवांनी हे पाउल उचलले ते निश्चितच धाडसी आहे पण योग्य नाही. ते जरी स्वागतार्ह असले तरी स्विकारार्य नाही. कारण या सर्व प्रकारामागे कुठे ना कुठे तरी व्यक्तिगत द्वेष, स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आकांक्षा, समोरच्या गटाला नीच दाखवण्याची इर्ष्या होती. त्यामागचा त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या एका रात्रीत मान्य होणे निश्चितच शक्य नाही. याउलट त्यांनी संपूर्ण परिस्थितीला अनुसरून एखादा सुवर्णमध्य सुचवायला हवा होता पण त्यांनी तसे केले नाही. आम्ही तेवढे सोवळे बाकीचे ते भ्रष्ट, देशातली राजकीय व्यवस्था म्हणजे भ्रष्ट लोकांची संस्था असा समज पसरवून देऊन लोकशाहीबद्दल अनास्था निर्माण करण्याची गरजच काय? जर आंदोलन सगळ्यांनी मिळून एकत्र सुरू केले होते तर आत्ता स्वतःने वेगळे होऊन वाट चोखाळण्याची गरजच काय? अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या पावसाळी आधिवेशानात सत्यात उतरतायेत की नाही हे पाहण्याइतका संयम बाबा रामदेव बाळगू शकले नाहीत? मग ते कसले योगी ? देशाला संसदीय लोकशाही आहे. भावनेच्या भरात आपण संसदीय लोकशाहीपेक्षा व्यक्तिच्या निर्णयाला जास्त महत्त्व देऊ लागलो तर आपल्या देशात देखील भगव्या पडद्याआडून चालणारी हुकूनशाही अवतरायला वेळ लागणार नाही ..
क्रमशः  

4 comments:

M. D. Ramteke said...

पुढचा भाग येऊ दया वैभव.

Dhananjay Aditya said...

Goog. Waiting for next article.

Harshu said...

very good job done by vaibhav!!!!!!!!!!!! Keep it up. Thanks Best Regards
Harsh

Rahul Apte said...

नमस्कार वैभव,
छान लिहिलं आहस, वाचताना जाणवत कि तू मनापासून विचार करून लिहितोस. पण एकूणच पहिला लेख आणि हा वाचताना तू पूर्वग्रह दुषित विचारातून लिहित आहेस. बाबा रामदेव हे कधी हि त्यांचा जयजयकार करा असा सांगत नाहीत. ते म्हणतात मला गुरु मानून माझ भाषण ऐकून तुमचे आजार बरे होणार नाहीत, कपालभाती आणि अन्य प्राणायाम करा. एकूणच अन्य सर्व बाबांपेक्षा ते वेगळे आहेत. तू सकारात्मक दृष्टीने पाहिलंस, ऐकलंस तर त्यातील सत्यता तुला दिसेल.
अण्णा हजारे यांची टीम आणि बाबा रामदेव यांच्यात फुट पडली वगैरे सर्व साफ चूक आहे. तसेच अण्णांनी उपोषण केला आणि म्हणून बाबा रामदेव पण केल हे पण चूक आहे. अण्णा उपोषणाला बसण्याआधी कित्येक महिने भारत स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून बाबा रामदेव देशभर स्विस बँकेतील काळा पैसा आणि भ्रष्टाचार या विषयावर जनजागृती करत फिरत होते. अण्णांना दिल्लीमध्ये सर्वात पहिल्यादा मोठ्या व्यासपीठावर बाबा रामदेव यांनी आणलं. अण्णा, बाबा, श्री श्री, अरविंद केजरीवाल या सारखी मंडळी मी आणि माझच्या पलीकडे विचार करणारी आहेत आणि प्रसिद्धी साठी हे सर्व करत नाही आहेत, आपण सर्वांनी त्यांना पाठिबा दिला पाहिजे.

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons