सप्रेम जय भीम,
म्हणतात वयाची साठी ओलांडली की वयात येणारी प्रगल्भता आणि विचारातील परिपक्वता वाढलेली असते. सध्याच्या वर्षात आपण आपल्या प्रजासत्ताकाची साठी साजरी करतोय. ह्याच प्रजासत्ताकाबरोबर उदयाला आलेला रिपब्लिकन पक्ष मात्र आजच्या घडीला राजकारणातील आपले स्थान शोधण्याचा यशस्वी प्रयत्न करतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आणि १९५७ साली स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्ष आज पुन्हा फिनिक्स भरारी घेण्याच्या तयारीत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांना हे पत्र ...
प्रखर संसदीय राजकारणावर श्रद्धा असणारा देशातील रिपब्लिकन पक्ष सध्या राजकीय अडचणीतून बाहेर येण्याचा जोरदार प्रयत्न करतोय. मात्र मोठा इतिहास असणारा रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन जनतेसाठी सध्याची वेळ फारच महत्वाची आहे. काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रखर विरोधी पक्ष असावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. समाजवादी नेत्यांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या पक्षाची भूमिका मांडणारे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादी नेत्यांना लिहिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रातील भूमिकेप्रमाणे नंतरच्या काळात रिपब्लिकन आणि समाजवादी नेत्यांनी एकत्र येण्याचे काहीच प्रयत्न केले नाहीत.
गेल्या काही दिवसात नव्याने होउ घातलेल्या शिवशक्ती भीमशक्ती युतीने आंबेडकरी तरुणांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चेतना निर्माण केली आहे. काल परवा पर्यंत रिपब्लिकन नेत्यांच्या नावाने बोटे मोडणारे तरुण परत रिपब्लिकन पक्षाचा सिरिअसली विचार करू लागले आहेत. पण आजच्या काळातील स्थितीकडे लक्ष वेधले असता प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे या चळवळीत तरुण रक्ताला असलेला संधीचा आणि स्थानाचा अभाव. रिपब्लिकन राजकारण आजही पूर्णतः हे सेकंड जनरेशने व्यापलेले राजकारण आहे. त्यांची ७० च्या दशकात असलेली पॉलिटीकल फिलॉसॉफी आजही ते जशीच्या तशी अंमलात आणण्याचा करत असलेले प्रयत्न पुन्हा एकदा संकटकाळाकाडे घेवून गेला होता. त्याचे कारण रिपब्लिकन राजकारणात सतत तरुणांना डावलले जाणे आणि त्यांचे झालेले ध्रुवीकरण. तरुणांना राजकारणात यायचंय. पण येण्यासाठीचा मार्गच नाही. त्यांना ठोस असा कार्यक्रम नाही. तरुणांना आंबेडकरी राजकारणासाठी उद्युक्त करू शकेल असा कार्यक्रम पर्यायाने सध्या तरी उपलब्ध नाही. मग तरुणांना राजकारणात आणणार तरी कसे?
घरात राजकारणाचा वारसा असल्याने राजकारणात येणे सोपे असते. राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळत असल्याने काहीही कठीण जात नाही. पण ज्यांना राजकारणाचा काहीच वारसा नाही त्यांचे काय? तरुणांचे राजकारणात असलेले महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. एकटे रिपब्लिकन पक्ष सोडले तर सर्वच पक्षांनी तरुणाईचे राजकारणातील स्थान आणि महत्त्व ओळखले आहे. जेमतेम पाच सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मनसे ने केवळ तरुण मतांच्या जोरावर विधानसभेत १३ आमदार धाडले. कालानुरूप पोक्त झालेल्या शिवसेनेनेही युवा सेनेची स्थापना केली आहे. छुप्या पद्धतीने का होईना राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेड आणि मराठा संघटनांच्या माध्यमातून तरुणांच्या ऐन निवडणुकीच्या वेळी उपयोगात येणार्या संघटना भरभक्कमपणे उभारुन ठेवल्या आहेत. भाजपने देखील या स्पर्धेत पाय टाकताना पक्षातील तरुण रक्ताला अग्रक्रम द्यायला सुरूवात केली आहे. प्रश्न राहता राहीला कॉँग्रेसचा तर राहूल गांधी हा एव्हाना देशभरातील जवळपास अर्ध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलाय. हे झाले वरवरचे स्पष्टिकरण..
राजकीय पटलावरच्या आकडेमोडीचा विचार करता संसदीय कार्यप्रणालीत देखील तरुणांचा वाढता सहभाग येणार्या काळातील नव्या पॉलिटिकल थेअरींना निश्चितच जन्म देणारा ठरणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २६ ते ४० वयोगटातील ८१ खासदार निवडून आले आहेत. पंधराव्या लोकसभेतील १५ टक्के आसने त्यांनी व्यापलेली असतील. बहुतांश तरुण खासदार उच्चविद्याविभूषित आहेत. पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयात आणि भाजपच्या पराभवात तरुण रक्ताची भूमिका निर्णायक ठरली होती.
धाडसी निर्णय घेऊन समाजकारण आणि राजकारणातील प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देण्याची क्षमता तरुण नेतृत्वाने नेहमीच सिद्ध केली आहे. यंदाच्या लोकसभेत ३९ वर्षीय राहुल गांधी यांच्या आक्रमकतेतून ती दिसून आली. राहुल गांधींनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसला स्वबळावर लढण्यास भाग पाडले नसते आणि पंजाबमध्ये अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन नव्या रक्ताचे उमेदवार उतरविले नसते, तर आज पंधराव्या लोकसभेत काँग्रेस पक्ष सुस्थितीत पोहोचला नसता. अर्जुन सिंह, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग यांच्यामुळे वार्धक्याकडे झुकलेल्या काँग्रेसमध्ये तरुणाईची सळसळ निर्माण करण्यासाठी यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी स्वत पुढाकार घेत तरुण उमेदवारांना संधी दिली. त्यांनी एनएसयुआय आणि युवक काँग्रेसच्या १० पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या रिंगणात उतरविले आणि आठ जणांचा विजय निश्चित केला. देशातील जनतेलाही तरुण नेतृत्वाची आस लागलेली आहे, हे २६ ते ४० वयोगटातील ८१ खासदार निवडून आल्यामुळे अधोरेखित झाले आहे. बहुतांश तरुण खासदार उच्चविद्याविभूषित आहेत. सामान्य पाश्र्वभूमी असलेल्या आणि तळागाळातून संघर्ष करीत तरुण वयात लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर पोहोचणार्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. भारतीय लोकशाहीवरील राजकीय घराण्यांचे वर्चस्वच त्यातून दिसून येते.
रिपब्लिकन पक्षाचा संसदीय इतिहास पाहता दुसऱ्या लोकसभेत म्हणजे १९५७मध्ये रिपब्लिकन पक्षाचे देशभरातून नऊ खासदार निवडून आले होते. कोपरगाव मतदारसंघातून अॅड. बी. सी. कांबळे, नाशिकमधून दादासाहेब गायकवाड (नाशिक), बॅ. सांळुखे (भोर), हरिहरराव सोनुले (नांदेड), जी. के. माने (दादर) हे महाराष्ट्रातील प्रमुख खासदार होते. कोल्हापूर मतदारसंघातही रिपब्लिकन पक्षाला विजय मिळाला होता. शिवाय गुजरातमध्ये एक, कर्नाटक एक ( दत्ता कुट्टी) आणि तामिळनाडूमधून एन. शिवराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी लोकसभेवर निवडून गेले होते. उत्तर प्रदेशात मध्यल्या काळात दोन खासदार रिपब्लिकन पक्षाचे होते. दुसर्या लोकसभेत असणाऱ्या या खासदारांची कामगिरी मोठी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी कार्य केले होते. त्यामुळे संसदीय राजकारणाची ताकद आणि संसदीय आयुधांचा त्यांचा अभ्यास होता. त्यामुळे नेहरू सरकारवर या खासदारांचा चांगलाच प्रभाव पडला होता.
१९५७ साली स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला मानापमान, इगो क्रायसीस, स्वतःची अहंकारी भुमिका आणि संघटनेत शिरताच नेता बनण्याची फुटकळ मनिषा या वृत्तींमुळे आजमितीला रिपब्लिकन पक्षाची फाटाफुट होउन थोडथोडके नव्हे तर ४४ गट अस्तित्वात आहेत. एक साधा आमदार नाही, किंवा कोणत्याही नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत एवढंच काय साध्या ग्रामपंचायतीत पूर्ण सत्ता नाही तरी या ४४ गटांचे अध्यक्ष स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. राजकारणात ३० ते ४० वर्षांचा प्रदिर्घ अनुभव पाठीशी असताना देखील सर्वच गटातील सेकंड जनरेशन कडून युवक आघाडीला आणि तीच्या निर्मितीला होणारा विरोध त्यांचे राजकीय दिवाळखोरपण सिद्ध करते. प्रत्येकाने साहेबाच्या आजूबाजूला एवढी वर्षे घूटमळून आपआपल्या जिल्ह्याचे अध्यक्षपद मिळवलयं, गटनेतेपद मिळवलयं. काम करण्याचा पत्ता नाही. युवक आघाडीची स्थापना झाली तर नव्या जोमाचं रक्त सगळी मरगळ झटकून टाकतील, आमच्या हातात असलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरण होईल, थोडक्यात आपआपली दुकानदारी बंद होण्याच्या भीतीने जो तो आपआपल्या परिने रिपब्लिकन पक्षाची युवक आघाडी का निर्माण होउ नये यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतोय. ही वृत्ती आत्ता बदलावीच लागणार. जे नेते रिपब्लिकन चळवळीला यशस्वी करण्यात बाद ठरले आहेत त्यांनी आत्ता स्वतः सक्रिय राजकारणातून बाद होऊन पक्षात येणार्या नव्या रक्ताला जागा उपलब्ध करून देताना त्यांचे मार्गदर्शक बनायला हवे.
आंबेडकरी समाजातील तरुण हा आज शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या ब्राम्हण समाजाला तुल्यबळ टक्कर देतोय. आंबेडकरी विचारधारेचा सखोल अभ्यास असलेले हे तरूण राजकीयदृष्ट्या जरी इनअॅक्टिव असले तरी ते पॉलिटिकली अवेअर आहेत. जर रिपब्लिकन पक्ष ह्या तरुणांना योग्य स्थान मिळवून देउ शकला नाही तर स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा दुसरे पर्याय शोधू शकतो. आजवर रिपब्लिकन पक्षाने युवाकेंद्रीत विषयांचे राजकारण न केल्यानेच मागासवर्गीय तरुण हे मोठ्या संख्येने इतर पक्षांतच मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना..
आज या नव्या राजकीय समीकरणे निर्माण होण्याच्या काळात जर यशस्वी व्हायचे असेल तर दशकांपासून आपण आपल्या ज्या हक्कांना वंचित राहीलोय ते हक्क आंदोलनाने झगडून मिळवायला लागतील. त्यासाठी तरुणांची एकसंध, संघटीत आघाडी असणे फार महत्त्वाचे आहे. आंबेडकरी तरुण काय करू शकतो हे दलित पँथरने सार्या जगाला दाखवून दिले आहे. आज परत १९७० सारखी निर्णायक स्थिती येवून ठेपलीये. त्यामुळे तरुणांना त्यांचे योग्य स्थान मिळालेच पाहिजे.
बर्याच वर्षांनंतर आठवलेंच्या रुपाने रिपब्लिकन राजकारणाला नवी संजीवनी मिळाली आहे. असी वेळ पुन्हा पुन्हा साधून येणे होत नाही. माहोल गरम आहे. अवघ्या सहा महिन्यातच ७ महानगरपालिकांच्या निवडणुका येउ घातल्यात. विधानसभेची रंगीत तालीमच आहे. योग्य वेळ आहे. तरुणांना त्यांचे योग्य स्थान, त्यांचे पक्षातील अधिकार मिळवून देण्यासाठी युवक आघाडीची अत्यंत गरज आहे. जर ह्यावेळी केवळ आणि केवळ दुकानदारी वाचविण्याच्या हेतूने आंबेडकरी तरुणांचे ध्रुवीकरण झाले तर सम्यक मार्गाने विचार करणारे हे तरुण परत कधी रिपब्लिकन राजकारणावर विश्वास ठेवणार नाहीत.
साहेब, एकीकडे पक्षात आणि एकुणच राजकारणात युवकांना स्थान मिळण्यासाठीचे आर्जव करताना आपल्या मनात असलेले आडाखे सुद्धा ओळखून आहे. त्यावरच पुढील विधाने करत आहे. रिपब्लिकन चळवळीला फाटाफुटीचा, मानापमानाचा, दुहीचा फार मोठा शाप आहे. पक्षातील युवा नेता हा उद्या सत्तेची हवा डोक्यात जाताच संघटनेतील प्राईम लीडरशीप ला आव्हान देण्याचा धोका देखील असतो. गेल्या दशकभरात घडलेल्या घटना याची साक्ष देतात. राज ठाकरे ने बाळ ठाकरेंना दिलेले आव्हान, अजित पवारांनी शरद पवारांना दाखविलेले शक्तिप्रदर्शन असे एक ना एक अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे येत्या २० तारखेच्या कार्यक्रमात युवक आघाडी आणि तीची कार्यकरिणी जाहीर करताना सत्तेसाठी वैचारिक लाचारी स्विकारणारे, ऐन मोक्याची वेळी जोडतोडीचे राजकारण करणारे फुटीरतावादी राजकारण खेळणार्या तरुणाला आपण सोयीने टाळावे. ज्याची पक्षावर आणि पक्षातील या घडीच्या उच्च नेतृत्वावर श्रद्धा असलेला, काळानुरूप स्वतःचे नेतृत्व बदलणारा, प्रसारमाध्यमांची ताकद ओळखून त्यांचा योग्य रितीने वापर करून घेणारा, गरजेच्या वेळी डिप्लोमॅटिक स्टॅंड घेणारा, राजकारण आणि समाजकारण यांची योग्य जाण असलेला आणि त्यात योग्य समतोल साधणार्या कार्यकर्त्याला (येथे आत्तापासून असलेल्या नेत्याला नव्हे) आणि स्वतःला केवळ कार्यकर्ता समजणार्या युवकालाच आपण युवक विकास आघाडीची घौडदौड सांभाळण्यास द्यावी ही नम्र विनंती..
सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे.. आंबेडकरी समाजातील तरुण, हा कायमच एका एंग्री यंग मॅन च्या शोधात असतो. ७० दशकात त्याला नामदेव ढसाळांच्या रुपाने कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणारा एंग्री यंग मॅन मिळाला. आत्ता आपल्यापुढे ही नामी संधी आहे कारण आपणच एकमेव नेते आणि आशा आहात.
जय भीम.. .
कळावे..
आपला
वैभव छाया
आपला
वैभव छाया
(प्रस्तूत लेख वृत्तपत्रांमध्ये आलेल्या लेखांमधील काही माहीती संकलित करण्यात आलेली आहे.)