Monday, September 12, 2011

ढसाळ

आज काल मन फार हेलावून जाते जेव्हा कोणी म्हणते की नामदेवाने पॅंथर काढून चळवळीची वाताहत करुन टाकली. नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्‍यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही "क्षम्य" असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. पण आपल्या मायबोलीचाच हात धरून नेहमी आपल्यावर अत्याचार केलाय त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे जहाल क्रांतीकारक कार्य माझ्या नामदेवानं केलंय.
आज नामदेव ढसाळांचं वय ६२ आहे. वयाने आणि त्यांच्या स्वकर्तृत्वाने ते कितीतरी मोठे आहेत. पोएट ऑफ अंडरवर्ल्डम्हणून ख्याती पावलेले दादा मला नेहमी माझ्यातलेच एक वाटले. आजही सर्वसामान्यांमध्ये जेव्हा केव्हा नामदेव ढसाळांच्या कवितांचा विषय निघतो तेव्हा त्यांना आपला मोठा भाऊ, एक फ्रेंड- फिलॉसॉफर म्हणूनच आपल्या जवळचा मानतो आणि ओघाने माझा नामदेव हा नामदेव ढसाळांप्रती असलेला प्रेमळ स्वार्थी भाव तोंडातून बोहेर येतो. भारतात विद्रोही साहित्याला फार जूनी परंपरा आहे. पण त्या साहित्याला त्याचे खरे स्वरुप, सन्मान त्या साहित्याचे अधिष्ठान हे केवळ आणि केवळ नामदेव ढसाळांनीच मिळवून दिले. साजूक तूपात घोळल्या गेलेल्या, क्षणोक्षणी नाकातून अनुनासिक उच्चरवात बाहेर पडलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन विद्रोहाच्या खर्‍या रंगाला, ढंगाला त्यातल्या हंटरबाजाला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय बिनदिक्कीतपणे नामदेव ढसाळांकडेच जाते.
आज नामदेव ढसाळांना लपून छपून शिव्या देणारे, त्यांचा पोकळ कारणे देउन भ्याड विरोध करणारे हे आपआपल्या मताच्या लोकांमध्ये मतप्रदर्शन करून मोकळे होतात. पण गोलपिठा सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या साहित्यकृतीच्या इंचभर उंचीची नवी निर्मिती करण्यास असमर्थ असतात. बाबासाहेबांनीच म्हटलेय, ज्याला समर्थन करता येत नाही तोच भ्याड विरोध करतो. कारण विरोध करण्यासाठी तात्विक, नैतिक आचरणासोबत नवनिर्माणाची धमक असावी लागते. तोच यथायोग्य विरोध करू शकतो. अन्य कोणी नाही.
नामदेव ढसाळांबद्दल माझे असलेले वैयक्तिक मत हे काही माझे त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आलेले नाही. किंवा मी की त्यांच्या वकिल देखील नाही. नामदेवाला आणि त्याच्या कवितेला, त्या कवितेतल्या अंगाराला, त्या अंगाराच्या धगधगीला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेबांबरोबर डोस्टोव्हस्की, मॉक्झिम गॉर्की, अॅरिस्टॉटल, विजय तेंडूलकर, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक अंजेल, संत तुकाराम, मायकोव्हस्की, शेक्सपिअर, बुकर टी वॉशिंग्टन, मार्टिन ल्युथर किंग सारख्या वैश्विक किर्तीच्या विचारवंताचा, लेखकांचा, साहित्यिकांचा आणि महामानवांचा प्रभाव आणि त्यांचे साहित्य समजून घ्यावे लागेल. नामदेव ढसाळांवर असलेली श्रद्धा ही बाबासाहेबांवर असलेल्या श्रद्धेइतकी थोर तर मुळीच नाही पण ती अंधश्रद्धा बिल्कूल नाही. माझ्या नामदेवासाठी माझे असेलेल वैयक्तिक मत हे अंतिम रुपाने हे वैचारिक मंथनातूनच आलेले आहे. एका खोल चिंतनातून आलेले आहे. आणि हो यावर कोणी आक्षेप घेउ शकत नाही.        
गोलपिठामधून किंवा एकूण समग्र साहित्यातून पिडीत, शोषित, दूर्लक्षित अवहेलित समाजाची जी व्यथा नामदेव ढसाळांनी मांडली, ती इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही तय्यार होणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा.
जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही.
जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात.
जिथे दिवस रात्री सुरू होतो.
ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर
"मनगटावरच्या चमेलीगजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक"
पदोपदी दिसतात.
जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात.
जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.
"येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
इथे माण्सालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"

                 अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून, अन्याय अत्याचार सहन करून हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले. लेखणी मशाल झाली, ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती. त्यामुळे तो ठणकावून म्हणतो

" जिवाचे नाव लवडा ठेवून जगणार्‍यांनी
खुशाल जगावे....
मी तसा जगणार नाही "

           या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या. त्या अगतिक झाल्या नाहीत, ज्वलंत झाल्या.

"मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला
शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो
इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो
बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात
आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत"

या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे. ती बेधडकपणे सांगते की

"तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी"

हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे.

"शेटसावकारांची आय झवून टाकावी
नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा
जेवणातून विष घालावे मूठ मारावी
रांडवाडे वाढवावेत: भाडखाव व्हावे"

पण ती पुढे म्हणते -

" नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये
नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

                 इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जाती पुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात.
त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. लहानपणापासून ते तारुण्याच्या उंबरठ्यावप पाउल पडेस्तोवर बेदर्दी हंगाम सोसलेल्यांना, हमनदस्ती पाटाळात, चान्या चिन्यूल्या, डिलबोळ, पावशेर डालडा झोकणार्‍यांच्या जगातल्या तरुणाला त्या भावल्या नाही तर नवलच.  पिढ्यानपिढ्या क्षयरोगानं मरणारा बाप,   राजेश खन्नाच्या पोस्टर कडे पाहत नाकाला झोंबणार्‍या स्वस्त अत्तराच्या दर्पात आयुष्याला रंगीत बनवण्याची स्वप्न पाहणार्‍या तरुणांना त्यांची गुलामगिरी जाणवून देउन एका महाप्रतिभावंतांची नवी क्रांतिकारी ओळख दिली तर त्यात चुकले कुठे ? नामदेवाच्या साहित्यातून ह्या सार्‍या घटना आणि त्याअनुषंगाने भळभळणार्‍या जखमा इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते आणि ती सच्ची असते म्हणून काळजाला भिडते. 

(प्रस्तूत लेख हा इंटरनेटवर ढसांळाबद्दल लिहीलेल्या अनेक लेखांचं एक छोटंसं संकलन आहे. त्यामुळे या लेखाची स्वतःची अशी मालकी कोणाकडेही नाही. स्त्रोत उपलब्ध असल्यास सुचवावे )

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons