तुझे ललित, सुंदर नारीपण
मनमोहक आहे
नेत्रसुखद आहे
तुझ्या सुरेख, सुडौल शरीरावर
निसर्ग आणि नियती
प्रगट करतात तरूणपण
तेव्हा तुझे नश्वर शरीर
होते अजरामर अनेक
कलाकृतींचे प्रदर्शन
वा प्रदर्शनीय संग्रहालय
तुझ्या दर्शनानेच कलावंतांना
सुचतात कलाकृती आणि वास्तुशिल्पे
तुझ्या आशयपूर्ण उरोजावरून
देवालयाची मस्तके,
कळस साकार झाले आहेत
आणि ती स्वर्गाशी
सतत संवाद करतात असे मानले जाते आहे
हे नारी,
तुझे प्रिय प्रेयसीपण तर
पूर्वीपासून काव्यनाटकांना अमर करते आहे
अन् घरोघरी, सर्वभर
तुझे पत्नीपण सर्व पतींना
स्वर्गासम वाटते आहे.
तुझेच तुझे आईपण तर
परमेश्वराला भारी भरते आहे.
श्रद्धा, भक्तिभाव तुझ्यामुळेच
घरोघरी, मनोमनी आकाराला आलेले आहे
धर्मप्रचारकांनी हे तुझे महन मंगळपण
त्यांच्या देवासाठी लुटले आहे, लाटले आहे
तुझे प्रेमळ आईपण पाहून
तुझी सर्व पोरावली माया पाहून
पिता परमेश्वराची कल्पना
प्रेषितांना सुचली
अशी तू,
सर्व महन्मंगल कल्पनांची माता तू !
पहिल्या प्रेमाची मालकीण तू !
प्रियतमा तू !
स्वर्गाहून सुंदर तू !
प्रिय पत्नी तू !
संसारातील स्वर्ग तू !
वासना विकारांचा वसंतोत्सव तू !
देव, धर्म, देवळांहून भारी तू !
नारी म्हणूनही आई म्हणूनही !
-- बाबूराव बागूल ---