The Birth of FAM
काही महिन्यांपुर्वी आंबेडकरी विचाराने झपाटलेल्या काही तरुणांनी एक स्वप्न पाहिले. महाराष्ट्रातील समविचारी तरुणांना, आंबेडकरवादी तरुणांना एकत्र आणायचे आणि त्यातून आपल्या विचारांची देवाण-घेवाण करायची. त्यातूनच 'फेसबुकवरील समविचारी मित्रांची स्नेह भेट घडवून आणली. अख्ख्या महाराष्ट्रातून आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ असलेल्या तरुणांनी या हाकेला साद दिली. ९ ऑक्टोबर २०११ रोजी ताळचेकरवाडी, म्युनिसीपल स्कुल, लोअर परेल येथे ही स्नेह भेट ठरली. स्नेह मेळावा संपन्न झाला पण एवढ्यावरच थांबतील तर ते आंबेडकरवादी कसले? प्रत्येकजण हेच म्हणू लागला आता थांबायचे नाही यातून काहितरी विधायक घडलेच पाहिजे. मग एक विचार पुढे आला आंबेडकरवादी चळवळ गतिमान करण्यासाठी योगदान देण्याचा आणि त्यासाठी एक राज्यवापी आणि देशव्यापी संगठन निर्माण करण्याचा. प्रत्यक्षात हालचाली सुरु झाल्या आणि जन्म झाला एका युवाशक्तीचा.
फक्त २ महिन्यापुर्वी आम्ही एकत्र आलो. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणार आंबेडकरी समाजाला त्याच्या मनात असलेली धुसफुस बाहेर काढुन टाकण्यासाठी काय करावे असा विचार चालू होता व एखाद्या कल्पक पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आम्ही ठरवले होते. तसा ६ डिसेंबर ला काहितरी वेगळे करायचे अशी सर्वांचीच इच्छा होती. लागोपाठ मिटींग होत होत्या. चर्चा होत होत्या अगदी २७ नोव्हेंबर ला आमचे फायनल झाले काय करायचे ते. शेवटी सगळे जीव तोडून कामाला लागले आणि ५ डिसेंबर ला खरी कसरत सुरु झाली.
आमची पहिली वॉल लागली गेली ५ डिसेंबरला प्रश्न होता "माता रमाईंचे ज्या ठिकाणी अंतिम संस्कार झाले त्या ठीकाणी चैत्यभुमी सारखे स्मारक असावे या करिता सरकारने व समाजाने काय पाऊले उचलली पाहिजेत?" हा प्रश्न घेण्याचे कारण माता रमाई स्मारकासाठी आमच्या वरळी येथील बांधवांचा चालू असलेला लढा. त्यासाठी कॅंडलमार्च ही काढला गेला. या कॅंडलमार्च साठी आम्ही भित्तीपत्रके लावायचे ठरवले पण वेळ कमी असल्याने आमच्यावर काही मर्यादा आल्या होत्या. त्यातही अमोलजी व हरिषची यांच्या कारने आम्ही दोन ग्रुप केले होते. ४ तारखेला हरिष निरभवने, अमोल गायकवाड, मिलिन्द धुमाळे, रमेश सोनावले, किरण जाधव, सन्दिप पगारे, सुशिल जाधव आणि निरंजन दिवेकर हे तेव्हा उपस्थित होते आणि रात्रभर जागुन आम्ही ही भित्ती पत्रके मुंबईतील काही ठिकाणी लावली. आणि ५ तारखेला हा कॅंडलमार्च अमोल गायकवाड, गणेश चव्हाण, सुषमा शिरसाट, प्रशांत गायकवाड, रमेश सोनावले, किरण जाधव, हरिष निरभवणे, साक्यपुत्त नितीन, संदिप पगारे या आमच्या मित्रांनी अतिशय नियोजन बद्द रितीने हाताळला. कारण एवढा मोठा मॉब हाताळणे ही जोखीमच असते. त्याचवेळी चैत्यभुमीवर वैभव छाया, मिलिंद धुमाळे, वैभव मोरे आणि निरंजन दिवेकर फेसबुक वॉल बद्दल लोकांना मार्गदर्शन करत होते. अतिशय नियोजन करित काम चालू होते. आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात होतो.
कॅंडलमार्च संपल्यावर आम्ही सर्व फेसबुक वॉलजवळ जमा झालो. पुण्यावरुन अमोघ गायकवाड आणि बहारीनवरून संजय सामंत सर तसेच नागपूरहून डॉ. संदिप नन्देश्वर हे देखील आले होते. पाच तारखेची रात्र तर आम्ही सर्वांनी अक्षरशा जागून काढली. नंतर ६ तारखेची सकाळ म्हणजे आमच्यासाठी एक दिव्यच घेऊन आली. दुसर्यादिवशीचा प्रश्नच गहाळ झाल्याने आम्ही खुप तणावात होतो. शेवटी एकमेकांशी संपर्क करुन आम्ही त्यावर तोडगा काढलाच आणि ६ तारखेचा प्रश्न वॉलवर लागलाच. लोकांचा प्रचंड प्रतिसाद या प्रश्नाला मिळाला. समाजाने खुप बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. आंबेडकरी समाज किती जागृत आहे त्याचे ते प्रतिकच होते.
राजकीयदृष्ट्या सजग असणारा आंबेडकरी समाज हा सतत माध्यमहीन समाज म्हणून जगत आला आहे. त्यामुळे कोणापुढे कोणत्या विषयावर कसे व्यक्त व्हावे याची जाण मात्र तो हरवून बसला आहे की काय ह्या विचाराला छेद देणार्या बोलक्या प्रतिक्रिया आम्हाला वॉल वर पहायला मिळाल्या. १५ बाय ५ च्या दोन वॉलची आम्ही योजना आखली होती. परंतू लोकांचा प्रसिसाद इतका उत्स्फूर्त होता की की आम्हाला त्या वॉल ची लांबी ५ बाय १६० एवढी वाढवत न्यावी लागली. खुप आव्हाने समोर आली. रात्री तीन वेळा पोलिसांनी वॉल लावण्यास मज्जाव केला. एकदा पोलिस स्टेशन ला नेले. आजवर असा अभिनव प्रयोग त्यांनी ही कधी पाहीला नव्हता. असो, या निमित्ताने वंचित जगाताच्या नायकाला, मुकनायकाच्या समाजाला आम्ही बोलते केले. सलग ७० तास झोपेविना चैत्यभूमीच्या बोचर्या थंडीच्या वातावरणात, आसपासच्या परिवासांच्या बंद घरांच्या टाळे लावलेल्या दरवाजे आणि काचांच्या साक्षीने आम्ही सारी आव्हाने पेलली. आणि खिंड लढवलीच.
जयभिम!
n निरंजन दिवेकर