Sunday, May 8, 2011

डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे

नमस्कार ...
आजची नोट लिहीताना विषय वेगळा हाताळलाय. थोडासा स्टिरीओ़टाईप सोडून लिहीण्यासाठीचा प्रमाणिक प्रयत्न करतोय. तर ह्या प्रस्तूत लिखाणाचा मुख्य प्रकाशझोत असणारेय तो आमच्या प्राध्यापिका डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे.
       
                  मला नीट आठवतयं मुंबई विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागात एम.ए. च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. नियमित लेक्चर्स सुरू झाले,  आणि नेमका त्या दिवसापासून पावसाचा जोर देखील अचानक वाढला. सुरूवातीचे दोन दिवसांचा प्रवास मी आणि विनी थॉमस ने अंबरनाथ ते विद्यापीठ पावसाच्या पाण्यात भिजतच काढला. किंबहूना आम्ही जाणून बुजून भिजलो म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचीच परिणीती मला ताप येण्यात झाली आणि मस्तपैकी २ आठवड्यांसाठी विद्यापीठाला सुट्टी ठोकली. या मध्यंतरीच्या काळात माझे डिपार्टमेट मध्ये नव्याने झालेल्या मित्रांसोबत फोनवरून कॉन्टॅक्ट होताच. मला त्यांच्याकडून सतत एकच विचारणा केली जात होती की अरे भाऊ तू इलेक्टीव साठी कोणता सब्जेक्ट निवडतोयेस रे ? मी मुळात बी.एम.एम. झालेला त्यामुळे एम. ए. ला  इलेक्टीव सब्जेक्ट नावाचा देखील प्रकार असतो हे मला नव्याने माहीत पडत होतं. आणि अचानक एका दिवशी यागेश तोरस्करचा फोन आला आणि म्हणाला वैभ्या आज इलेक्टीव सब्जेक्ट निवडायचा शेवटचा दिवस आहे, H.O.D. नावाचा प्रकार काही केल्या एकत नाहीये म्हणून मी तुझा नाव फॉरेन पॉलिसी मध्ये लिहून टाकलयं आणि सोबतच सरांना तुझी ह्या विषयाला संमती असल्याचे परस्पर सांगून टाकलेय. एका क्षणासाठी म्हटले चला बरे झाले ताप कमी होईल तेव्हा होईल पण विषय निवडीची कटकट तरी जाईल.
तब्बल दोन आठवड्यांनतर ताप उतरला आणि विद्यापीठात आलो. उरलेल्या सगळ्यांशी ओळखी झाल्या. सुरूवातीचे पहीले लेक्चर सवयीप्रमाणे बंक केले. आणि दुसरे लेक्चर कंटाळलो म्हणून सोयीस्कररीत्या टाळले. आणि त्यात भरीस भर तिसरे लेक्चर रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मग काय स्वारी खुष तेवढ्यात योगितानं शुद्धीवर आणत म्हणाली ... आत्ता आपलं इलेक्टीव आहे वर कन्नम्मा मॅडमच्या केबिनशेजारी असलेल्या वर्गात जायचंय वास्तविक पाहता मला ते लेक्चर देखील बसायचे नव्हते, पण स्वतःशीच म्हटले यार, सकाळी सकाळी झोपेचं खोबरं करून एवढ्या लांब आलोय चला एक लेक्चर तरी अटेंड करूया . तसा लगोलग वर्गात शिरलो आणि पाहतो तर काय एकुण १८ मुली वर्गात बसलेल्या, एकही मुलगा नाही. वर्गात शिरत असताना प्रत्येकाने माझ्यावर टाकलेला कटाक्ष माझ्या चांगलाच लक्षात राहीला आणि मनातल्या मनात पुटपुटत होतो, ह्या यागेश ने दगा केला आपल्याशी भाऊ, कोणी मुलगा कंपनीला नाही म्हणून यानं माझं नाव ह्या विषयाला सुचवलं असावं असं वाटायला लागलं आणि ते १००%  खरं होतं. त्यात त्याची स्वारी आज गैरहजर. माझा संताप अजूनच शिगेला पोहोचलेला. त्यात एक योगिता सोडली तर माझी कुणाशी साधी तोंडओळखही नव्हती. पुढल्या बाकांवर विराजमान झालेल्या मुली आंतराराष्ट्रीय परराष्ट्र धोरणांबाबत इतक्या मुरब्बी पद्धतीने चर्चा करत होत्या की ती ऐकून मनातल्या मनात हवा टाईट झाली होती. (नंतर ह्याच मुली माझ्या चांगल्या मैत्रीणी देखील झाल्या) बोललो दादा, हे तुझे CHM Collage चे जग नाही इथे सगळे बाप लोक आहेत, जर विद्यार्थी असे आहेत तर यार प्राध्यापक कसे असतील? अजूनपर्यंत मॅडम वर्गात आल्या नव्हत्या. मनात एक आकस्मिक भीती होती, पण त्या भीतीत पण एक सुप्त अशी उत्सुकता होती.  
मी त्या फावल्या वेळेत प्रा. सहस्त्रबुद्धे यांचे चित्र मनात रंगवू लागलो. आत्तापर्यंत NDTV वर पाहिलेले सर्व INTERNATIONAL FOREIGN POLICY  चे एक्पर्ट झराझर डोळ्यांसमोरून पळत होते. एकदम शांत चेहरा, धीरगंभीर मुद्रा, टोटली डिप्लोमॅटिक अशी एक आभासी प्रतिमा मी मनात तयार करून घेतली. तेवढ्यात उत्तरा मॅडम वर्गात आल्या. त्यांना पाहताक्षणीच मी मनात त्यांची तयार केलेली आभासी प्रतिमा पत्त्त्यांचा बंगला कोसळावा तशी एका झटक्यात नाहीशी झाली. तत्क्षणी त्यांनी मला पाहीले आणि  उदगारल्या “ Ok. New Member to Our class, Welcome, What is Your Name? “I replied, Vaibhav Bhalerao. बस एवढंच काय तो संवाद पहिल्या भेटीत झाला आणि लगोलग त्यांनी नेहरूविअन एरा शिकवायला सुरूवात केली.  त्यांचे शिकवणे ऐकून अक्षरशः अवाक झालो कारण  त्यांचं शिकवतानांचं इंग्रजी ऐकून. इतकं सोप्पं इंग्रजी मी बापजन्मात एकलेलं नव्हतं. असे आश्चर्याचे अनेक धक्के बसायचे होते.  
माझ्या आजवरच्या कॉलेजजीवनात मला कधीही इतके चांगले प्राध्यापक लाभले नव्हते, त्यामुळे वर्गात व्याख्यान घेतानाची देखील एक पद्धत असते. विषय समजावून सांगतानाचे असणारे विषयावरील विवचेनाला सुद्धा एक शास्त्र असते, हे त्या केवळ एका लेक्चर मध्येच समजून गेलो. थोड्या वेळापूर्वी ज्या विषयाची भीती वाटते म्हणून बोटे मोडत होतो तो विषय आत्ता मला एकदम समजू लागलाय म्हणून मनातल्या मनात आनंदी होत होतो. लेक्चरचा वेळ कसा संपला कळालेच नाही. वर्ागतून बाहेर आल्या आल्या योगेशला THANK YOU असा मेसेज पाठवला, त्याचे त्याने कारण विचारले पण त्याचे उत्तर मी त्याला आजतागायत दिलेले नाही, असो. जसजसे लेक्चर्स होत होते तसतसा मॅडमशी माझा परिचय वाढत गेला. मला अभ्यासात आलेल्या सगळ्या अडचणी म्हणजे बर्‍याच वेळेला त्या अगदी फुटकळ असायच्या तरी मॅडमनी मला अगदी समजावून संगताना मला त्याचे आकलन किती होतेय हे सुद्धा तपासून पाहत होत्या. त्यांनी आजपर्यंत जे काही शिकवले ते अगदी सोपे करून शिकवले असल्यामुळे अजूनही माझ्या जसेच्या तसे लक्षात आहे. हे तर सगळेच प्राध्यापक करतात त्यात विशेष असे नाही. पण ...
माझा त्यांच्यासाठी असलेला नितांत आदर केवळ डॉ. सहस्त्रबुद्धे आणि डॉ. अरूणा पेंडसे यांनी आम्हाला दिलेल्या दृष्टिकोणाबद्दल.  जगातील सद्य स्थितीतील एकुण परिस्थिती, समाजात जागतिकीकरणानंतर आलेले बदल, राजकारणाची बदललेली दिशा आणि झालेली दशा, सामाजिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे सतत बदलत जाणारे महत्त्व आणि स्थान यांसारख्या विषयांवर त्रयस्थ पद्धतीने पाहून त्यावर समीक्षा करण्यासाठी लागणारी सर्व बौद्धिक ताकद, एक समतोल दृष्टिकोण दिला. त्यामुळे आम्ही जे कही शिकत होतो ते खर्‍या मनापासून एंजॉय करत होतो. आणि पहिल्यांदा जे काही शिकतोय ते पुर्णपणे समजत असल्यामुळे होणारा आनंद देताना बौद्धीक पातळीवर आम्हाला परिपूर्ण करण्यासाठीचे संपूर्ण श्रेय आमच्या प्राध्यापकांनाच जाते.
आत्तापर्यंत जगाच्या पाठीवर ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्यात त्याचे काय भविष्यात उमटणारे पडसाद कसे असतील, त्यांचा अभ्यास करताना घ्यावयाची काळजी हे सगळे अगदी कसोशीने सांगणार्‍या पहिल्या डॉ. सहस्त्रबुद्धे ह्याच होय. आजवर असाईनमेट तयार करणे म्हणजे विकीपीडीया कॉपी पेस्ट करणे असाच भाबडा गैरसमज होता. पण मॅडमनी तो साफ चुकीचा ठरवला. त्यांनी India – US Nuclear Deal वर करायला दिलेले असाईनमेंट त्यासाठी लागणारे तीन विविध लेख आणि त्यांच्या आधारे होणारी समीक्षा असे काहीसे स्वरूप होते. एन दिवाळीच्या वेळेतही सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या विषयानुरूप तीन लेख मिळाले आहेत की नाहीत, त्यांनी ते कसे लिहावे त्या लिखणाची पद्धत काय असावी, त्याचे स्वरूप, मांडणी कशी असावी ? हे प्रत्येकाला मॅडम वैयक्तिक पातळीवर समजावून सांगत होत्या. हे सारे पाहून मनात म्हटले की, असेच प्राध्यापक जर आम्हाला बॅचलर लेव्हल ला लाभले असते तर कदाचित आज जी माझी अवस्था आहे, त्याहून निश्तितच चांगली असती.  एम. ए. लेव्हला देखील प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देणार्‍या प्राध्यापिका मी प्रथमतःच पाहत होतो.
मला चालू व्याख्यानाच्या नोट्स काढणं हा प्रकार नेमका काय असतो हे औषधाला देखील माहीत नव्हतं. पण परिक्षेआधी मॅडम आम्हाला नेहमी चॅप्टर आऊटलाईन पुरवत, कठीणातला कठीण विषय सोप्या पद्धतीने सोप्या शब्दांत कसा मांडला जाऊ शकतो याचं ती चॅप्टर आऊटलाईन ची कॉपी उत्तम उदाहरण असायची.
मधल्या काळात माझी पाठदुखी खुप बळावली होती. पण काही झाले तरी लेक्चर्स मिस करायचे नाहीत स्पेशली १.३० चे आणि २.३० वाजताचे. मॅडम तुमचा शिकवलेला प्रत्येक तास हा माझ्यासाठी नेहमीच मला स्वतःला उत्साह देणारा राहीलाय. मी आपला खुप आभारी आहे. स्लीप डिस्कचा त्रास किती भयानक असतो आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याने होणारे दुष्परिणाम जेव्हा तुम्ही समजावून सांगितले तेव्हा डोक्यात ट्यूब पेटली. त्यावेळी तुम्ही जो मानसिक आधार दिलात तो मी कधीच विसरू शकणार नाही. सध्याच्या काळात एक शिक्षक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून तुमचे जे सहकार्य आणि आशिर्वाद लाभलेत, ते सगळ्यात अनमोल आहेत.

(वरिल लिखाण हे अगदी वेळात वेळ काढून म्हणजे फार कमा वेळात लिहीले असल्याने बर्‍याचशा आठवणी सांगायच्या राहून गेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी डॉ.अरूणा पेंडसे यांचा देखील पुसटसा उल्लेख आलेला आहे त्यांच्याविषयी सुदधा मला सविस्तर लिहायचे आहे, फक्त वाट पाहतोय पाठदुखी केवळ एक तासाभरासाठी थांबण्याची )

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons