Wednesday, November 2, 2011

माध्यमांचं इवॉल्यूशन



जगातील कोणत्याही लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सशक्त प्रसारमाध्यमांची नितांत आवश्यकता असते. त्यासाठीच आपल्या लोकशाहीची चार प्रमुख स्तंभ ठरविताना घटनाकारांनी प्रसारमाध्यमांना चारपैकी एका स्तंभाचा दर्जा बहाल केला, यातच सारे काही आले. बदलत्या काळानुसार प्रसारमाध्यमांचे रुप आणि साधनं देखील बदलत गेली. थोडक्यात, अपडेट होत गेली. साध्या कागदापासून सुरूवात करणार्‍या पत्रकारीतेने आज वर्च्यूअल इ-पेपर पर्यंत यशस्वी मजल मारलेली आहे. याच प्रसारमाध्यमांनी मोठमोठी आंदोलने उभी केली. आणि यशस्वी करताना समाजेतिहासच बदलवून टाकण्यात मोलाची भूमिका बजावलीये. आजच्या काळातील सोशल नेटवर्किंग साईट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध झालेली सारी विचारमंचे ही आधुनिक पद्धतीची प्रसारमाध्यमेच आहेत यात कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. ह्या निमित्ताने केलेला हा उहापोह...    

गेल्या काही दिवसांपूर्वी कॉमस्कोअर आणि PEW या अमेरिकेतील जागतिक शोध संस्थांनी इंटरनेट सबंधी केलेल्या सर्वेक्षणात अगदी मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार १५ ते ३५ वयोगटातील लोक सर्वाधिक वेळ इंटरनेटवर घालवतात. अर्थात हा वापर सोशल नेटवर्किंग साट आणि मोबाइल इंटरनेट कनेक्टिविटी, स्वस्त दरात झालेली उपलब्धता, व माध्यम म्हणून वापरण्यात येणारा सुटसुटीतपणामुळे ही संख्या वाढल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील इंटरनेटचा वापर ब्रिक देश त्याचबरोबर अमेरिका, जपान आणि युरोपीय देशांपेक्षाही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधन अहवालात प्रथमच भारताने एवढी मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. देशातील सुमारे तीन कोटी 50 लाख लोक हे सायबर कॅफेमधून इंटरनेटचा वापर करतात. तर चार कोटी 30 लाख लोक घरून किंवा ऑफिसमधून इंटरनेटचा वापर करतात. मात्र प्रति व्यक्ती इंटरनेटचा वापर पाहायला तर, तो वापर साडे बारा तास होता. हा वापर जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्याचबरोबर देशातील पुरूष इंटरनेटचा वापर अधिक करत असल्याचेही या संशोधनात समोर आले आहे. मात्र 35 ते 44 या वयोगटात महिला सर्वाधिक इंटरनेटचा वापर करत असल्याची बाब यातून समोर आली आहे. या वयोगटातील दर 10 पुरूषांसमोर 12 महिला इंटरनेटचा वापर करतात.

इंटरनेटचा वापर कशासाठी केला जातो, यासाठी केलेल्या विशेष सवेर्क्षणात सर्च इंजिनचा 87 टक्के युजर्स वापर करतात. 85 टक्के युजर्स सोशल नेटवर्किंग साइट, 78 टक्के ई-मेल्स, 58 टक्के बातम्यांसाठी आणि शिक्षणासाठी 41 टक्के युजर्स इंटरनेटचा वापर करत असल्याचे या अहवातात स्पष्ट करण्यात आले आहे. एका वर्षभरात सोशल नेटवर्किंग साइटच्या युजर संख्येमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाल्याची बाबही या संशोधनात समोर आली आहे. तर फेसबुकच्या युजर्सची संख्या 2010च्या तुलनेत दुप्पट झाली आहे. मात्र ई-मेल्ससाठी इंटरनेटचा वापर करण्याऱ्यांचे प्रमाण मात्र सारखेच राहिले आहे.  

पण त्यापेक्षा धक्कादायक वाटणारी माहीती अशी की, इंटरनेट वरिल विविध साधने आणि मोबाईल वरील साधने (mobile application) वापरात आणून जास्तीत जास्त वेब कंटेट निर्माण करण्यात जगातील कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक वंशाचे लोक अग्रस्थानी आहेत. वरकरणी पाहता ही बाब केवळ सर्वेक्षणातून समोर आलेला निकाल आहे असे जरी वाटत असले तरी यामागे एका मोठ्या सामाजिक व्यवस्थेची खोल दरी असल्याचा निर्वाळा मिळतो. का म्हणून कृष्णवर्णीयच किंवा हिस्पॅनिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांचा कंटेट जनरेशन मध्ये अग्रक्रम आहे?

या प्रश्नावर चर्चा करताना नेमके असे उत्तर देता येणे कठिण आहे परंतू त्यांवर चर्चा होणे जरूरी आहे. प्रसारमाध्यमे ही प्रत्येकाची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तिला व्यक्त होण्याच्या नैसर्गिक व जन्मसिद्ध हक्क आहे. परंतू व्यक्त होण्यासाठी लागणारे माध्यम मात्र संकुचित असल्याने त्याला एक मर्यादा होती. पण ती कसरही आता इंटरनेट ने भरून काढली. आजही अमेरिकेतील वंशवाद आणि वर्णभेद हा पूर्णतः संपलेला नाही. भारतातील जातीयवाद देखील संपलेला नाही. जग आजही आहे रे आणि नाही रे गटांत विभागले गेलेले आहे. मुठभर लोकांनी नेहमीच बहुजनांना कधी वर्णभेद तर कधी वंशभेद, जातीभेद, प्रांतभेद तर कधी धर्मभेदाच्या जहाल कारणांखाली दमन करत स्वतःचे वर्चस्व अबाधित राखले. प्रसारमाध्यमे देखील याला अपवाद नव्हती. लोकप्रतिनिधी बनण्याऐवजी मुखपत्रांसारखीच सारी प्रसारमाध्यमे वागवून घेतली जाउ लागली. प्रत्येक ठिकाणी अगदी प्रिंट पासून ते इलेक्ट्रॉनिक मिडीयम पर्यंत सगळ्यांचीच सेंसॉरशिप वेगाने धावत होती. यामुळे माध्यमहीन समाजाचा एक मोठा गट निर्माण झाला होता आणि अजून आहे देखील. हाच एक वर्ग स्वतःसाठी एका सशक्त माध्यमाचा शोध घेत होता. आणि ते माध्यम त्याला इंटरनेट आणि त्यावरील सोशल नेटवर्किंग साईट्स च्या रुपाने मिळाले. ज्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी मनोनीत स्वातंत्र्य होते असे हक्काचे ठिकाण मिळणे ही खरे तर इतिहासातील एक मह्त्तवपूर्ण घटनाच मानावली लागेल. आखाती देशांतील हुकुमशाहीविरोधातील सांप्रत स्थिती ही केवळ आणि केवळ स्थानिकांना इंटरनेट ने जगाची आणि लोकशाहीच्या कल्याणकारी संकल्पनेची जी महाद्वारे उघडून दिली त्याचाच परिपाक आहे. आज भारतापुरते बोलायचे झालेच तर एक गोष्ट प्रामुख्याने विचारात घ्यायला हवी ती म्हणजे भारतातील प्रसारमाध्यमे, त्यांची पोहोच, वापर, उपयुक्तता, प्रभाव आणि त्यांची मालकी...   

भारतातील जवळपास ९०% प्रसारमाध्यमे ही अभिजनांच्या मालकीची आहेत. ज्या ठिकाणी उर्वरित बहुजनांना काहीच स्थान नाही, कोणतेही प्राधान्य नाही. लेखकांच्या लेखाला प्रकाशिक करण्याअगोदर त्याचे आडनाव पाहण्याचा या पत्रकारीतेचा दंडक आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करून उठणार्‍या अभिजन लेखकांना देखील वाळीत टाकण्याची संस्कृती जोपासणारी ही प्रसारमाध्यमे आहेत. पण काळानुरूप परिस्थिती बदलते. परिस्थिती बदलत्या काळात मानवी बुद्धीला अधिक प्रगल्भ होण्याची संधी मिळवून देत असते. आज एखादे चांगल्या दर्जाचे व उच्च प्रतीचा कागद वापरणारे वृत्तपत्र सुरू करायचे असेल तर किमान २० कोटींच्या आकडेएवढी द्रव्यसंप्पती असायला हवी. एखादी वृत्तवाहीनी किंवा कोणतीही मनोरंजनात्मक वाहिनी (Electronic channel) सुरू करायचे आजले तर किमान एक अब्ज तरी लागतातच. पण इंटरनेटचे तसे नाही. स्वतःची अनलिमिटेड स्पेस ची वेबसाईट डेव्हलप आणि होस्ट करण्याचा खर्च हा अगदी ५ ते १०,००० रुपयांत होउन जातो. जे तुमच्या स्वतःच्या मालकीचे असते. खिशात मोबाईल असला तर अवघ्या ५ रुपयांत आणि जरी नसला तरी विशेष असा फरक पडत नाही. केवळ १५ रु. प्रती तास कोणत्याही सायबरमद्ये  साध्यातली साधी व्यक्ती ही महाजालावर स्वतःचे मत अगदी परखडपणे, कोणाचीही सेंसॉरशिप न बाळगता व्यक्त करू शकते. जर तुम्ही मांडलेल्या मतामध्ये खरचं दम असेल तर जगातल्या करोडो वाचकांपर्यंत तुम्ही सहजच पोहोचू शकता. माझा स्वतःचा असा विश्वास आहे, होय आत्ताशी कुठे वेब मिडीयमचं विशअव आम्हाला उलगडतयं. येउद्या एकदा हे वेब मिडीयम पुर्णतः हातात येउद्या. ग्यारंटी देतो. एकापेक्षा एक सरस लेखक, कलावंत, विचारवंत ह्या देशाला मिळतील. कारण त्यांना मुक्त स्वैर होण्याचं आकाश लाभलेलं असेल म्हणूनच...

सोशल नेटवर्किंग साईट्सपुरताच विचार केला तर एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की हो, समाजातील कायम उपेक्षित राहीलेल्या घटकाला याचा खुप फायदा होणार आहे. थोडासा का होईना एक कनिष्ठ मध्यमवर्ग हा उपेक्षितांमध्ये देखील उदयाला आला आहे. तोच आत्ता उर्वरित समाजाला या जोखाडातून सोडवण्याची मनिषा बाळगून आहे. ज्यांना सांप्रत प्रसारमाध्यमांत कोणतेही प्रतिनिधीत्व नाही तोच मध्यमवर्ग सोशल नेटवर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे आढळून आले आहे. याआधी कोणालाही एखाद्या बड्या संपादकांवर टिका करण्यासाठी कोणतीही सोय नव्हती पण ती ह्या माध्यमाने पूरी केली. भारतातील एकुण एक जाती-संप्रदाय, त्यांचे होणारे दमन, त्यांची सद्यस्थिती जगभरात पोहोचू लागली आहे. माध्यमांवर मोनोपोली ठेवणारा वर्ग मात्र यामुळे फार दुखावला गेल्याचे दिसून येत आहे.

याआधी माध्यमांमधून लेखक हा वाचकांशी संवाद साधण्याचे काम करीत असत. कारण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे ही केवळ वन वे कम्यूनिकेशन ची सोय पुरवितात. परंतू सोशल नेटवर्किंग साईट्स ह्या लेखकाचा वाचकांशी आणि वाचकांचा लेखकांशी संवाद घडवून आणण्याची किमाया साधतात ते ही अगदी कमी वेळात, कोणतेही अतिरिक्त कष्ट न घेता,  किंवा कोणताही अतिरिक्त खर्च न करता, अगदी आपल्या सोयीच्या ठिकाणी. वर्तमानपत्रे ही केवळ वर्तमानातच वाचली जातात परंतू सोशल नेटवर्किंग साईट्स वरिल हर एक प्रकारचे कंटेट केवळ एका सर्च वर आपल्यासाठी उपलब्ध होते. यात महत्त्वाचे असे की. या ठिकाणी वाचक हा एक निष्क्रिय खरेदीदार मुळीच नसतो. त्याला आवडलेल्या आणि नावडलेल्या दोन्ही उत्पादनांवर धडक, थेट आणि तात्काळ प्रतिक्रिया देण्याची तय्यारी ठेवून असतो. त्यामुळे एकेकाळी केवळ मनोरंजनासाठी असलेले हे माध्यम आता सामाजिकदृष्ट्या अधिक गंभीर बनले आहे. कारण या माध्यमांमुळे ओपिनियन मेकर्सचे राज्य संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जाउ लागलीये. हेच ह्या माध्यमजगतातलं नवं आणि प्रभावी इवॉल्यूशन आहे.
        



 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons