Sunday, October 16, 2011

नवजातीयवाद



सध्या भारतात उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या निवडणूकांचं महाभारत धुमाकूळ घालतयं. त्याच्या अधिकृत अध्यायाला १४ ऑक्टोबर २०११ रोजी दस्तूरखुद्द मायावतींनीच सुरूवात केली.  नोएडातल्या दलित प्रेरणा स्थळाच्या उद्घघाटनाने याची अधिकृत घोषणा देखील झाली. त्यानिमित्ताने उफाळून आलेल्या राजकारणावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.. प्रस्तूत लेख वाचण्याआधी वाचकांनी ह्या गोष्टीची जरूर नोंद घ्यावी की मी कोणत्याही अँगलने बसपा चा समर्थक नाही उलट कडवा विरोधक आहे. मायावतींचे आणि कांशीरामजी यांचे संधीसाधू राजकारण कधीच पटलेले नाही. सत्तेसाठी कोणत्याही न पटणाऱ्या विचारांशी हातमिळवणी करण्याच्या स्वभावामुळे ते आजवर महाराष्ट्रात जरासेही यशस्वी होऊ शकले नाहीत. बाबासाहेबांना सोयीनुसार वापरणारे पण हेट लोक. म्हणून कांशीराम यांच्या राजकारणावर टिप्पणी करताना कांशी तेरी फेक कमाई .. तुने जागी कौम सुलाई .. असे म्हणताना कोणाच्या बापाची भीडभाड बाळगत नाही. असो.. हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा नाही. 
२००७ सालच्या मे महिन्यात कर्मठ, रुढीवादी, प्रतिगामी आणि पुरूषी वर्चस्व असलेल्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यात मायावतींच्या बसपाने पूर्ण उत्तर प्रदेश विधानसभेत बहुमत मिळवून एकहाती सत्ता खेचून आणली. यामागे त्यांनी य़शस्वीपणे राबवलेल्या दोन कार्यक्रमांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पहिला म्हणजे सोशल इंजिनिअरींग आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे इतर राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने पसरलेल्या मोठ्या समुहाला केवळ मतदानासाठी परत प्रदेशात घेउन येणे आणि त्यांच्याकडून सकारात्मक मतदान करवून घेणे त्यांच्या पथ्यावर पडले. सत्तेवर येताच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ची कामे हातात घेतली. जी कामे इतर राज्यात होउ शकली नाहीत ती कामे मायावतींनी सुरू करून पूर्ण करण्याचा धडाकाच लावला. या प्रकल्पांपैकी एक असलेला व त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त कुप्रसिद्ध करवला गेलेला प्रकल्प म्हणजे नोएडा येथे उभारण्यात आलेले दलित प्रेरणा स्थल. मिडीयाने एवढा आक्रोश इतर कोणत्याही घोटाळ्यात केला नाही तेवढा आक्रोश त्यांनी ह्या प्रकल्पाला केला.  एक ना अनेक हजारो कारणे पुढे केली असतील. सगळ्यात जास्त विरोध झाला तो महाराष्ट्रातील स्वघोषित समाजवादी मिडीयाकडूनच. असू द्या त्यांच्याकडून विरोध होणार हे निश्चित होते.
       म्हणे मूर्त्या बनवून काय साध्य करू पाहतायेत मायावती ? खरे तर हा प्रश्न विचारणाऱअयांनाच मला प्रतिप्रश्न करावासा वाटतो की गल्ली-बोळात, नाक्यावर, चौकाचौकात, नुक्कडच्या कोपऱ्यावर भर रस्त्यात ठाण मांडून बसलेल्या मंदिरावर कधी ब्र उच्चारत नाही. गणेशोत्सावात, नवरात्रौत्सावात अन्य बऱ्याच उत्सवात ज्या मूर्त्यांची स्थापना केली जाते तेव्हा त्यासाठी खास लाईव्ह कव्हरेजची व्यवस्था करणारे देखील हेच विराधक असतात. तेव्हा ह्यांच्यातील प्रश्नबुद्धी कोणत्या भंगारवाल्याकडे गहाण पडलेली असते ते माहित नाही. देशातल्या प्रत्येक महानगरातल्या, नगरातल्या, गावातल्या छोट्या–मोठ्या चौकांना गांधी-नेहरू-इंदिरा–पंत-दीनदयाल सारख्या लोकांच्या मूर्त्यांनी व्यापून टाकले आहे. उगाच भरलेले नाहीत ते चौक. फरक एवढाच असतो की काही मूर्त्या ह्या अग्रक्रमाने बसविल्या जातात तर काहींना त्यांच्या नावांना अगदी जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्सर संघटीतपणे विरोध केला जातो. बाबासाहेबांनाच हा विरोध कायम केला जातो हे वेगळे सांगायला नको.   
       वांद्रे – वरळी सी लिंक ला राजीव गांधीचे नाव दिले. माझा विरोध नाही कारण राजीवजींचे तेवढे योगदान आणि बलिदान आहे देशासाठी, पण तेव्हा कोणाचाच विरोध समोर आला नाही. अशी खुप उदाहरणे आहेत. पण बाबासाहेबांच्या नावावर किंवा त्यांच्या प्रतिभेचे वर्णन करणारे एखादे स्मारक उभारण्यात आले तर त्याला एवढा विरोध का? एवढे घोटाळे झाले त्यात एवढा पैसा बर्बाद झाला त्यावर काहीही बोलेना.. फक्त बातम्या देउन मोकळे व्हायचे. इथे तर मायावतींनी ७०० कोटी खर्च झाले आणि त्याचा रिझल्ट पण दाखवला आत्ता बोला.
सरकारी खजिना रिता केला. समाजोपयोगी कामासाठी पैसा नाही ठेवला. पार्क बांधून झाडे लावून कोणता विकास साधणार आहेत? खरंच मायावतींचं फार चुकतयं *****… ह्याच पैशातून किती लोकांना काय काय फॅसिलीटी मिळू शकतात ? कोणाचे काय काय भले होऊ शकते ह्याचे लगोलग पॅकेजेसच्या पॅकेजेस चालवले गेले. मायावतींना व त्यांच्या प्रशासनाला सल्लेवजा ताकीद देण्यात आल्या. पण याकडे जरा वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिले तर.... या कामासाठी सरकारचा पैसा वापरला गेला कारण काम सरकार करत होतं. कोणा भांडवली दलालाला काम दिलेलं नव्हतं. कामाचा सारा भार हा गरिब मजदूरांवर होता. त्यांची परिणीती ही त्यांच्या रोजगार निर्मितीत झाली. इंदिरा गांधीनंतर कोणत्याही नवनिर्माणाचे सबळ उदाहरण समोर आलेले नाही. म्हणून येणाऱ्या काळात उभारल्या जाणाऱ्या नव्या शिल्पकलेची प्राथमिक जडणघडण आहे. यासारखे अनेक मुद्दे आहेत.
जर सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक परिप्रेक्षातून ह्या प्रकरणाचा अभ्यास करावयाचा झाल्यास आपल्याला निश्चितच याची सकारात्मक बाजू लक्षात येईल. मायावती ह्या प्रधानमंत्रीपदासाठीच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी उमेदवार आहेत. त्या कितपत योग्य उमेदवार आहेत हे अभ्यासकच सांगू शकतील. भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांत पुतळे नेहमीच राजकीयदृष्ट्या ज्वलंत व हमखास यश मिळवून देणारे विषय राहिलेले आहेत. त्यात बाबासाहेबांचे स्मारक हे महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशात रिपब्लिकन राजकारणाला कंटाळलेल्या मागासवर्गीय जनतेला खुश करण्यासाठीचा अत्यंत चतुराईने खेळलेला जाव ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण कोणत्याही किल्ल्यावर किंवा स्मारकावर गेलो तर ते ठिकाण आपणाला गतकाळातील वैभवशाली इतिहासाची साक्ष देत असते. त्याच न्यायाने जेव्हा उद्या कोणतेही पर्यटक जेव्हा दलित प्रेरणा स्थळाला भेट देतील तेव्हा निश्चितपणे फुले – शाहू – आंबेडकरांच्या दैदिप्यमान कामगिरीचे पुनरावलोकन होण्यास मदत होईल. यात चुकले ते काय? आणि या कामाल जर विरोध होत असेल तर त्याला नवजातीयवाद म्हणू नये काय?   जो न्याय दलित प्ररणा स्थळाला लावला गेला जर तोच न्याय नेहरू मेमोरिअल किंवा राजघाट सारख्या ठिकाणांना लावला गेला तर... त्यात देखील कितीतरी प्रमाणावर अधिक पैसा लावला गेला असेल .. आणि त्याहूनही अधिक खाल्ला असेल..
कॉमनवेल्थची वेल्थ निघालीच ना बाहेर. एवढा पैसा ओतूनही रुझल्ट नाही मिळाला. एकीकडे सुधारणा नाही नवनिर्मिती नाही म्हणून बोंबा ठोकायच्या आणि दुसरीकडे काही नवं काम होउ द्यायचं नाही हे किती दिवस चालवायचं
?
सामाजिक परिप्रेक्षातून पहायचे झाल्यास.. आत्ताच्या मागासवर्गीय तरुणांच्या समस्या बदलल्या आहेत. त्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांचे रुप आणि संदर्भ देखील बदलले आहेत. पूर्वी डायरेक्ट जातीच्या नावानं हिणवलं जायचं. जगण्याचा अधिकारच नाकारला जायचा. बाबासाहेबांनी एका फटक्यात सगळं बदललं. पण सापाचं जालीम विष फिरून डंख नाही मारला तर नवलच. आजच्या या तरुणाला अन्न – वस्त्र – निवारा या तीन समस्या राहिलेल्या नाहीत म्हणून त्याने या एकुण प्रकरणाला होणाऱ्या विरोधाकडे डोळेझाक केली. कारण त्याला ठावूक आहे. जे विरोध करतायेत त्यांनी आपल्यावर मनसोक्त सत्ता उपभोगली. दणकट हातांना कधी काम दिलं नाही. अभिमानी मानेला कधी सन्मान दिला नाही. आपल्याच देशांत परप्रांतीय म्हणून वागणूक मिळवून देण्याची सोय देखील केली. आत्ताची तरुण पिढी सुशिक्षित आहे. इतिहासाचा अभ्यास असेलली आहे. कोण-किती आणि कसा विरोध करतो याचे सारे भान ठेवून आहे. स्वतःचा उत्कर्ष हा आपण स्वतःच साध्य करू शकतो. त्यासाठी आशेची गरज आहे. ही आशा इच्छेतूनच येते. इच्छा ही प्रेरणेनेच निर्माण होते. आणि फुले – शाहू – आंबेडकरांसारख्या महापुरूषांचे भव्य दिव्य स्मारके ही आमची प्रेरणास्त्रोत आहेत. त्यामुळे कोणी कोणाच्याही बोलण्यात आले नाही.    
काही वेळा राजकीय कटूता आणि मतभेद बाजूला ठेवून विरोधकांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करायलाच हवे. दलित प्रेरणा स्थल च्या यशासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन. मित्रांनो काहीही असू द्यात, आत्ता आपल्याला आपला इतिहास स्वतःच लिहून ठेवायचा आहे. स्वतःच उभारायचा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घटनांना पॉझिटिव्हली पहा. This is a Period of ransformation. & we are witnessing it.
जय भीम  
पाहू कोण कोण काय प्रतिक्रिया देतोय ?


 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons