गेल्या रविवारी २० नोव्हेंबर २०११ रोजी माझा लोकमतमद्धे "शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?" हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला पार्श्वभुमी होती ती एका प्रसिद्ध दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजीची मुखप्रुष्ठावर प्रसिद्ध झालेली बातमी. शिर्षक होते "फ्रेंच अभासक उभारतोय शिवस्रुष्टी" आणि याच बातमीत दुस-या परिच्छेदात म्हटले होते कि "लोहगांव येथे पाच एकरात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाचे माहिती देणारे संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केली असुन त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पुर्ण होत आहे...." याच बातमीत पुढे म्हटले आहे कि या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे व दुर्मीळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे." खरे तर माझा लेख लोकमतने आवर्जुन प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक वैचारिक वादळ उठले. पण गोतिये यांचे या लेखाला उत्तर छापुन आले ते डीएनए या इंग्रजी दैनिकात दिनांक २३ नोव्हेंबर २०११ रोजी. या उत्तरात पहिली चुक म्हणजे माझा लेख १९ नोव्हेंबर रोजी छापुन आला आहे असे केलेले प्रारंभीचे विधान. प्रत्यक्षात ते २० नोव्हेंबर रोजीचे असायला हवे होते. पण मी या इतिहाससंशोधक फ्रेंच-हिंदुला ती गफलत माफ करतो. या लेखाचे शिर्षक होते, "Hijacking of Shivaji Maharaj by vested interests." (छुपा हेतु असणा-यांचे शिवाजी महाराजांचे अपहरण...) मुख्यारोप अर्थात माझ्याकडेच होता...पण मला म्हणायचेय कि कोण शिवाजीमहाराजांना वैदिक तंबुत हायज्यक करू पहातोय? हे गोतिये आणि त्यांचे छुपे समर्थक, मी नव्हे कारण मी मानवी स्वरुपाच्या एका महानायकाकडे, शिवाजी महाराजांकडे, एक माणुस म्हणुन पहातो, दैवी अवतार म्हणुन नव्हे कि दैवी आशिर्वादाने महनीय क्रुत्ये पार पाडनारा माणुस म्हणुन नव्हे. शिवाजी महाराजांना भावानी मातेने तलवार दिली हे काव्यात्मक उल्लेख इतिहास ठरवणारा हा इतिहास संशोधक कसा असु शकतो?
मुळात पुण्यतील वर्तमानपत्रातील बातमीत आणि या डीएनए मधील लेखात गोतिये यांनी आव असा आणला आहे कि जणु ते आजही फ्रेंच आहेत, जे खरे नाही. शिवाजी महाराज व भारतीय संस्क्रुती याचा आपला गाढा अभ्यास आहे हे ते म्हणतात तेही खरे नाही, ते कसे हे आपण त्यांच्याच डीएनए दैनिकातील त्यांच्याच स्पष्टीकरणातुन स्पष्ट करुन घेवू.
त्यांच्या प्रत्युत्करात्मक लेखात ते म्हणतात कि शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणुन पुढे आणायला हवे. म्हणजे आधीच शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे महानायक नव्हते आणि आता स्व-क्रुत शिवाजी-मंदिरामुळे ते महानायक ठरतील असे त्यांचे म्हणने आहे. ही त्यांची सरळ सरळ लबाडी आहे.
त्यांनी लेखात अजुन केलेली लबाडी अशी आहे कि, ते म्हणतात, "हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नांवाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते...." आणि पुढे हेच सद्ग्रुहस्थ म्हणतात "मला खात्री आहे कि शिवाजी महाराज हे हिंदु होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील..." आता मला या सद्ग्रुहस्ताला प्रश्न विचारायचाय कि जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदु कसे असु शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.
मला येथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणुन पुरातन काळापासुन ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढेही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरे असे कि ऋग्वेदाला मुर्तीपुजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचे मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असे सांगतांनाच ते "हिंदु" होते हे सांगण्यामागील कारंण काय आहे?
भारत माता आणि भारती माता यातील फरक या तथाकथित विद्वानाला समजलेला दिसत नाही, किंबहुना ते या बाबतीत वेड्याचे सोंग घेत पेडगांवला जात आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.
पुढे हे विद्वान ग्रुहस्थ श्री अरबिन्दो घोष यांचा दाखला देत म्हनतात कि "आम्ही शिवाजी महाराजांना देव मानत नसुन "विभुती" मानतो." यांना भारतात २०-२५ वर्ष राहुनही भारतीय संस्क्रुती शुन्य समजली आहे असाच याचा अर्थ. विभुती म्हणजे दैवी शक्तीचे अंशता: वा पुर्णावतरण...अवतार. विभुती या चमत्कारांशी संबंधीत असतात. त्यांच्या सर्वच क्रुती या चमत्कारांत जातात,,,,त्यांना कसलाही मानवी प्रयत्नांचा, अलांघ्य मार्ग आक्रमिण्यामागील प्रेरक मानवी स्त्रोतांचा संबंध नसतो. त्या फक्त दैवी इच्छेने घडणा-या घटना असतात.
म्हणजे मग या सद्ग्रुहुस्थांना माझा आक्षेप समजलेलाच नाही. यांनीच आई भवानी...( आता ते तिला एकाएकी भवानी भारती म्हणायला लागले आहेत...) शिवाजी महाराजांना तलवार देते असे शिल्प आधीच सिद्ध करुन ठेवले आहे. पुण्यातील एका प्रमुख व्रुत्तपत्राने यांच्याच मुलाखतीनुसार हे शिवाजी महाराजांचे मंदिर व शिवाजी महाराज आणि वेदांचे संग्रहालय आहे असे प्रसिद्ध केले आहेच. त्याबाबत या उत्तरात गोतिये महोदय एक शब्दही लिहित नाहीत. त्याचे एकही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट कांगावा करतात कि हिंदुंचे खरे शत्रु हे हिंदुच आहेत. त्यासाठी ते मिर्झाराजे जयसिंहांचे उदाहरण देतात. पण मला दाट शंका आहे कि २०-२५ वर्ष भारतात राहुन आणि हिंदुत्वाचे धडे गिरवुनही या ग्रुहस्थांना भारतीय इतिहास माहितच नाही. कारण यांना हे माहित नाही कि औरंगझेब ते आदिलशहाच्या दर्बारात जसे हिंदु सरदार होते तसेच शिवाजी महाराजांच्याही सोबत बहाद्दर आणि जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार आणि सेवक होते. हा लढा, गोतिये समजतात तसा, हिंदु आणि मुस्लिमांतील नव्हता तर, अन्याय करणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे यांच्यातील होता. यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चश्म्यातुन बाहेर पडुन इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. हिंदुंचे शत्रु हिंदु असतील असे एक वेळ मान्य करु, मग मुस्लिमांचे शत्रुही भारतात मुस्लिम नव्हते कि काय? हे गोतियेंना बहुदा कोणी शिकवलेले नसावे. किंवा त्या माहितीची दखल त्यांना घ्यावी असे वाटले नसेल.
मला स्पष्टपणे वाटते ते हे कि श्रीयुत गोतिये यांना भारतीय संस्क्रुती वा शिवाजी महाराजांचा कसलाही इतिहास माहित नाही. त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. फाउंडेशन अगेन्स्ट कन्टिन्युंग टेररीझम (FACT) ही त्यांची संघटना, जी हे मंदिर आणि संग्रहालय बनवत आहे ती इस्लामविरोधी संस्था आहे हे कोणीही वेबवर सम्शोधन करुन समजावुन घेवु शकतो. विजत्यनगरमद्धे यांच्याच FACT या संस्थेने उभारलेले संग्रहालय का उद्ध्वस्त केले गेले हे ते सांगत नाहीत, उलट लिंगायत समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा या घडत असलेल्या मंदिररुपाने कोणीही आजवर एवढा घोर अवमान केला नसेल. मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे म्हणजे महाराजांचे खरे अपहरण होय...शिवाजी महाराजांचे अपहरण मी नव्हे तर गोतिये व त्यांचे कडवे समर्थक करत आहेत. मी त्यांचा येथे पुन्हा एकदा स्पष्ट निषेध करतो.
श्रीमान गोतिये, भवानी भारती म्हणोत कि भारत माता, शिवाजीराजांना तलवार देत आहे हे मध्यवर्ती शिल्प जेंव्हा पुढाकार घेत उभारतात तेंव्हा त्यांना त्या क्रुत्याचा मतितार्थ समजला पाहिजे. मानवी प्रेरणा आणि दु:सह संकटे झेलण्याची भारतीय मानसिकता यांचेच ते अपहरण करण्याचा डाव रचत आहेत हे स्पष्ट दिसते. मानवी महानायकांचे हे दैवतीकरण आजचा समाज सहन करु शकत नाही हे त्यांना व त्यांच्या छुप्या पाठिराख्यांना समजावुन घावे लागेल. अकारण सामाजिक असंतोष उत्त्पन्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांना हवे तसे संग्रहालय उभारावे, त्यात वेदांची महत्ता गा वा अन्य कशाची, फक्त शिवाजी महाराजांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे तात्काळ थांबवावे. महाराजांचा स्वतंत्र पुतळा उभारावा, न उभारला तरी काही एक फरक पडत नाही. पण भवानी भारती नामक अद्न्यात देवतेच्या हातुन महाराज तलवार स्वीकारत आहेत हे शिल्प/मुर्ती ही सर्वच शिवप्रेमींच्या ह्रुदयावरील घाव असेल हे क्रुपया समजावुन घ्यावे. शिवाजी महाराजांचे हे वैदिक अपहरण आता तरी थांबवावे.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment