Tuesday, July 5, 2011

आरक्षण भाग १४

  मागील भागात एकुण १५ मुद्दयांसह आरक्षणाची बदलत्या कालातील परिभाषा ठरविताना कोणकोणत्या घटकांचा सखोल अभ्यास व्हायला हवा यावर एक छोटेखानी चर्चा झाली.. त्यापुढे... 
1.  ८० चे दशक खर्‍या अर्थाने भारतीय समाजमनाला विलक्षण कलाटणी देणारे वर्ष ठरले. पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत इंदिरा गांधींचा झालेला उदय, बांग्लादेशचा जन्म, खलिस्तानचा वाद, शीखांचा विद्रोह, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, जबरदस्तीने लादली गेलेली आणिबाणी, अचानकपणे उफाळलेली प्रांतवादाची जहाल भावना, नक्षलवादासारख्या चळवळींचा उदय, महाराष्ट्रात पॅंथर सारख्या चळवळींचा उदय एक ना एक अशा नानाविध घटना घडत होत्या. त्याच समाजमनाला एक आकार मिळवून देण्याचे काम करित होत्या.

2.   स्वातंत्र्य हे कुठल्या गाढवीचे नाव आहे? स्त्रीच्या अब्रूपेक्षा राष्ट्रध्वज महत्त्वाचा का ? असे व्यक्तिस्वातंत्र्य केंद्रित प्रश्न  तरुणांनी जाहीरपणे विचारायला सुरूवात केली. पाश्चात्य शिक्षणाने आधुनिक मनाची निर्मिती असलेली नवी पिढी जन्माला आली होती. पण तीचा प्रस्थापित समाजव्यवस्थेविरोधातील जातीय, आर्थिक आणि सामाजिक समानता प्रस्थापित करण्याचे ध्येय्य पुर्ण झाले नाही. त्यामागील कारणांची चर्चा हा एक स्वतंत्र मुद्धा आहे.   

3.       आर्थिक समानता प्रस्थापित होउ न शकल्याने खेडोपाडयांतील जातीय विषमतेला कंटाळून शहरात जाण्याचा निर्णय घेणार्‍यांना आणखी एका संकटाचा सामना करायचा होता. तो म्हणजे वर्ग व्यवस्थेचा. वर्ग व्यवस्थेच्या विषम मुळांनी देखील आपले पाय घट्ट रोवायला सुरूवात केली होती. त्याचा व्हायचा तोच परिणाम दिसून येत होता. ६०, ७० आणि ८० च्या दशकात सुरू झालेले शहरांकडील स्थलांतर नंतर थांबलेच नाही. खेडी ओस पडू लागली. त्यातच १९८२ मध्ये झालेल्या कुख्यात गिरणी संपाने कामगारांचे होते नव्हते ते सगळे कपडे फाडून टाकले. आणि देशोधडीला लावले.
    
4.       १९९० च्या सुमारास खाऊजा धोरणांचा अवलंब झाल्यानंतर प्रॉफिट हीच एकमेव भाषा लोकांना समजू लागली. बाजारीकरणाच्या काळात रुढी, परंपरा पेक्षा उत्पादनाचे महत्त्व लोकांना अधिक वाटू लागले. परिणामी बाजारमुलक व्यवस्था वेगाने पसरायला वेळ लागला नाही. ९२ नंतर आलेल्या नव्या आर्थिक व्यवस्थेने लायंसेस राजचा खात्मा केला. मोठ्या प्रमाणावर नव्या उद्योजकांती एक सक्षम फळी उभी राहू लागली. औद्योगिकतेला अचानक पणे आलेल्या या नवसंजीवनीमुळे गावागावतले हजारो कुशल-अकुशल कामगार शहरांच्या दिशेने विशेषतः उद्योगधंदे असलेल्या शहरांच्या दिशेने वाटचाल करू लागले. ( या पूर्वीही स्थलांतर होतच होते पण ९२ नंतर ते अधिकच वाढले.) प्रत्येक हाताला योग्य ते काम मिळू लागले. पण योग्य कामासाठी योग्य दाम कधीच मिळाले नाही.

5.       पण ह्याच बाजारमुलक व्यवस्थेने ज्या प्रकारे शहरीकरणाला जन्म दिला त्यात जाती हा प्रकार उरलेला नव्हता पण त्याचे अस्तित्व मात्र कायम होते. आत्ता एखाद्या महाराला कोणी अस्पृश्य म्हणत नव्हते पण गटारखात्यात निघणार्‍या जागांमध्ये सगळ्यात जास्त महार, मातंग आणि भंगी समाजातील लोकांचाच भरणा अधिक असल्याचे आढळून येते. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील.

6.       मुळातच जातीय विषमता, सामाजिक मागासलेपण, आर्थिक कमकुवता या तिन्ही घटकांचे समीकरण मागासवर्गीय जातींमध्येच दिसून येते. यांचा साकल्याने विचार करता आरक्षण हे कोणत्या आधारावर दिले गेले पाहीजे हे वाचकानेच सांगावे.

7.       मागासवर्गीयांची स्थिती सुधारलीये, अजून किती वर्षे त्यांना आरक्षण देणार हे प्रश्न देखील चर्चेसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत जितके आरक्षणाच्या समर्थनार्थ उपस्थित केले गेले आहेत. आज शहारांमध्ये अस्पृश्यता संपलेली आहे. रोजच्या जगण्यात अस्पृश्यतेचा लवलेश देखील आढळत नाही. खाण्या पिण्याच्या पद्धती देखील खुप मागे पडल्या आहेत. ५०वर्षांपूर्वीपर्यंत मेलेल्या गायीचे मढे ओढणार्‍या महार आणि इतर अस्पृश्य जातींचे लोक शिक्षक बनले आहेत, प्राध्यापक बनले आहेत. डॉक्टर, इंजीनिअर्स तयार होतायेत. कालपर्यंत समाजकारणात अडकलेली ही पीढी आत्ता अर्थकारणाची भाषा बोलू लागलीये. पण त्या पीढीच्या प्रतिनिधींची संख्या मात्र कमी असली तरी निराशाजनक नक्कीच नाही. शतकानुशतके , पीढ्यानपीढ्या शिक्षणाचा किंवा कोणत्याही प्रगतीचा कोणताही गंध नसताना आपण त्यांच्याकडून वेगवान प्रगतीची अपेक्षा करूच शकत नाही. हळद पिताच रुप येत नाही. संक्रमणाचा काळ आहे, तो काही एक दोन दिवसांचा नाही. त्यासाठी बराच वेळ जावू द्यावा लागेल. आरक्षण हा केवळ जातीय अंधार आणि जातीय अन्यायाच्या खोल गर्तेत बुडालेल्या समाजाला वर काढण्यासाठी असलेला काडीचा आधार आहे. सगळ्यांना समान संधी मिशायलाच हवी.

8.       शहरीकरणाने जशी असपृश्यता संपवली तशी भांडवलवादी मनस्थितीने जातीयता पुन्हा वाढीस लावली. त्याचे कारण देखील तसेच आहे. मुद्दा क्र. १२ (ब्लॉग क्रं. १३) मध्ये नमुद केल्याप्रमाणे आंतरजातीय विवाह हा जातीय रेषा पुसट करण्यासाठीचा महत्त्वाचा उपाय आहे. परंतू लोकांना आजही आंतरजातीय विवाहाचे किती वावडे आहे ते दर रविवारी जवळपास सर्वच वृत्तपत्रांतील Matrimonial ह्या सदरातील जाहीरातींचे नीट निरिक्षण केल्यास कळून येईल.

9.       दिवस रविवार, जवळपास सर्च वृत्तपत्रे, जवळपास सगळ्याच भाषा, जाहीरातींचा प्रकार एकच, विषय- विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या अपेक्षा. असा काहीसा फ्रेमवर्क असणार्‍या ह्या जाहिरीतीत सर्वात जास्त जाहिराती ह्या पुढील समाजघटांकडून दिलेल्या जास्त आढळ्ल्या. (उतरत्या क्रमाने)
(1)    ब्राम्हण
(2)    कोकणस्थ ब्राम्हण
(3)    ९६ कुळी मराठा
(4)    अरोरा
(5)    मराठा
(6)    देशस्थ
(7)    गुजराती
(8)    मारवाडी
(9)    कायस्थ
(10)लेवा पाटिल.  


10.   वरिल समाजघटकांकडून दिल्या गेलेल्या जाहीरातीत अपेक्षा अनेक असतात पण समान अपेक्षा ह्या दोनच प्रामुख्याने आढळल्या. समजातीय जोडीदार हवा. आणि रंग गोरा हवा. त्यातल्या त्यात जे काही आंतरजातीय विवाहासाठी तय्यार आहेत त्यांच्या जाहीरातीत ठळकपणे उल्लेख आलेला असतो. S.C. & S.T. क्षमस्व. हा कोतेपणा का? आंतरजातीय विवाह म्हणजे केवळ पोटजातीतील विवाह का? आत्ता हा इतका महत्त्वाचा पुरावा देऊन देखील उच्च शिक्षित अभिजनांमधला जातीयवाद जोपासण्याची वृत्ती रसातळाला गेलेली आहे असे म्हणणे किती योग्य ठरेल?

11.   आजही ९९ %  लग्ने ही जातीतीच होतात. किंवा फारफार तर पोटजातीतच होतात. घराघरातून विशेषतः मुलगा किंवा मुलगी हे त्यांच्या तारुण्याच्या वयात येताना त्यांच्या नकळत सर्व शिक्षण दिले जाते, समानतेच्या तत्वांच्या पोकळ गप्पा पण केल्या जातात पण सांगताना हळूच सांगितले जाते शक्यतो आपल्यापैकीच जोडीदार निवड. समाजात, भावकीत, चारचौघात जगायचयं आपल्याला. अशी मानसिकता असताना आंतरजातीय विवाहाला कशी चालना मिळू शकते?

12.   यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा ..
अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह... धर्मशास्त्रे ही अनुलोम विवाहाला मान्यता देतात, पण प्रतिलोम विवाहाला मान्यता देत नाहीत. प्रतिलोम विवाह म्हणजे उच्च जातींतील मुलगी आणि कनिष्ठ जातीतील मुलगा.. याउलट अनुलोम विवाह म्हणजे उच्च जातीतील मुलगा आणि कनिष्ठ जातीतील मुलगी. वास्तविक पाहता जोवर धर्मशास्त्रांतील बुरसटलेल्या ह्या पानचट गवश्या संकल्पना अरबी समुद्रात बुडविल्या जात नाहीत तोवर या देशातल्या जातीय व्यवस्थेच्या काळ्या विषारी मुळांना भुसुरूंग लावून देखील काही नुकसान पोहोचवता येणार नाही.


क्रमशः

      
      

No comments:

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons