Thursday, June 9, 2011

बाबा रामदेव की जय - भाग ५

               संपूर्ण दिवसभर अत्यंत जोशात चाललेल्या आंदोलनाला रात्री मात्र गालबोट लागले. सत्तेचे गुंगीने माजलेल्या काँग्रेसी भांडवलदारांनी दिल्ली पोलिसांना हाताशी धरून निर्दयीपणे लाठीमार करत आंदोलन अक्षरशः चिरडून काढले. त्याचा जाहीर धिक्कार असो. बाबा रामदेव यांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणत जबरदस्तीने त्यांची रवानगी हरिद्वारला केली. सुरूवातीला नेमके का चाललंय याचा काहीच अंदाज लावता येत नव्हता. एक अंदाज तर ठरलेला होता, की येणार्‍या दिवसांत भारतीय राजकारणात मोठ्या उलथापालथी पहायला मिळणार... एकुणच अण्णांची उपोषण सेना आणि बाबा रामदेव यांची रामसेना ह्या सेल्फ मेड सिविल सोसायटीच्या दोन्ही गटांमागे शिजत असलेल्या राजकारणाचा हा मागोवा..
       ज्येष्ठ काँग्रेसी दिगविजय सिंग, कपिल सिब्बल, प्रणब मुखर्जी सिविल सोसायटीने उभारलेल्या प्रत्येक आंदोलनाला काउंटर करण्यासाठी पुढे येतायेत, पण यांच्यापेक्षा मुरब्बी असलेला पी चिदंबरम नावाचा भांडवलवाद्यांचा दलाल नुकत्याच तीन राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांपासून एक साधी प्रेस काँन्फरंस घेत नाही याचे आश्चर्य वाटत होते.  कारण ज्या पद्धतीने डिएमके ला बोलण्यात, प्रचाराच गुंगवून ठेवून, दुसर्‍या बाजूने सीबीआय चा फास आवळून करुणानिधींचा काटा काढण्याचा मास्टर प्लान तयार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर आपले गृहमंत्रीच होय. एवढे सगळे सांगण्याचे कारण असे की, दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या लाठीमारा कांडावर प्रतिक्रिया देण्यासाठी वास्तविक पाहता केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे यायला हवे होते, पण त्यांच्याऐवजी कपिल सिब्बल पुढे आले.  रामदेव बाबांचा हठयोग आणि अण्णांचे उपोषण हे एव्हाना राजकीय पाठिंब्यावर उभे पाहीलेले षडयंत्र आहे हे हळूहळू जगासमोर यायला लागले आहे. या एकुण प्रकारावर पत्रकार सुजय शास्त्री यांनी केलेली कमेंट बरेच ताही सांगून जाते. ती कमेंट मी येथे जशीच्या तशी देत आहे.
      “बाबा रामदेव हे उत्तम उद्योजकही आहेत. त्यांच्या नावावर सुमारे २०० हून अधिक उद्योग असून त्यांच्या हरिद्वारमध्ये बेनामी अनेक प्रॉपर्टी आहेत. सरकारने मनात आणलं तर त्यांचा एका दिवसात सगळ्या बुरखा फाटू शकतो. बाबा रामदेवांनी मीडियामधून आपणं निष्कलंक असल्याची एक इमेज तयार केली आहे. या इमेजचा सरकारला सध्या त्रास होतोय. या बाबाच्या खुळचटपणामुळे भ्रष्टाचाराचा मूळ उद्देश मागेच राहिला आणि सरकार विरोधातलं नवं राजकारण सुरू झालयं. या रामदेवाला स्वतःचा राजकीय महत्त्व वाढवायचं आहे. या महत्त्वाला परिसस्पर्श करण्याची घाई भाजप, संघवाल्यांना झाली आहे. पण कालांतराने हे हिंदूत्व वादी पक्ष त्यांना गुंडाळणार हे सांगायला नको . हा सगळा संघाचा सुनियोजित डाव आहे. सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरायचं, आणि मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असं सरळ राजकारण आहे. ”

     वरिल कमेंट मधून एक गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे ती म्हणजे या आंदोलनाआडून चालणारे राजकारण. त्या राजकारणाची शक्यता कदाचित पुढीलप्रमाणे असू शकतात..     
1.   काँग्रेस इतकी दुधखुळी नाही की केवळ सुडापोटी बाबा रामदेव यांच्या गर्दीवर बेछूट लाठीहल्ला करेल. हा लाठीहल्ला करण्यामागे अतिशय सुनियोजित डाव असल्याचे आत्ता दिसायला लागलेय.
2.       बेछूट लाठीहल्ला झाल्यानंतर बाबा रामदेवांनी अतिशय चलाखीने भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला सारत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे स्टेटमेंट सुरू केले. त्यातले पहिले स्टेटमेंट म्हणजे काँग्रेस माझे एन्काउंटर करणार आहे. आत्ता मी काँग्रेसचा विनाश केल्याशिवाय शांत बसणार नाही. भ्रष्टाचारावर बोलण्याऐवजी स्वतःच्या अस्मितेवर भाष्य करून ब्लॅकमेलिंग करण्याचा उद्योग सुरू केला आहे.

3.       आजच म्हणजे ८ जून २०११ रोजी त्यांनी ११,००० तरूणांची शास्त्र आणि शस्त्र युक्त सेना उभारण्याची घोषणा केली. एक प्रकारे फॅसिस्ट विचारसरणीच्या आरएसएस ला पर्याय उभारून देण्याचीच भाषा केली गेली.

4.       भाजप आणि संघाचा पाठींबा असलेला हा भ्रष्टाचार विरोधी लढा पूर्णपणे भाजपच्या पथ्यावर पडेल असे दिसत असताना अचानकपणे बाबा रामदेव यांनी निर्माण केलेल्या ट्विस्टमुळे त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी पसरताना दिसू लागलेय.   

5.       कालपरवा पर्यंत भ्रष्टाचारविरोधी हाच मुख्य गाभा असलेला लढा मिडीयाने RAMDEV v/s UPA  असा प्रोजेक्ट करायला सुरूवात केली.

6.       यात लक्षात येणारी महत्त्वाची दुसरी बाजू अशी की, रामदेव बाबानी या आधीच भारत स्वाभिमान संघटन नावाचा राजकीय पक्ष उघडून ठेवलाय. येनकेन प्रकारे आत्तापर्यंत योगागुरू असलेले रामदेव आत्ता हळूहळू संघीय विचारसरणीचे नेते बनू लागले आहेत. मिडीयाच्या साथीने येत्या आठवड्याभरात हिंदूत्ववादी नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास देखील पूर्ण झालेला असेल.

7.       एव्हाना पी चिदंबरम पण लुंगीला गाठ मारून मैदानात आलेत. बाबांच्या सेनेविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा करून टाकली. मुळात पॉलिटिकल न्यूज मध्ये केवळ बाबाच लाईम लाईट मध्ये राहतील अशाच प्रकारची वक्तव्ये करण्याचा सपाटाच या काँग्रेसींनी लावलाय.

8.       जर येणार्‍या निवडणुकांत बाबा रामदेव सर्व शक्तीनिसी मैदानात उतरले तर काँग्रसचेच भले होणार आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसचा ठराविक असा इमानदर मतदारवर्ग राहीलाय तो कधीच अन्य पर्याय स्विकारत नाही.

9.       वरिल स्थिती पाहता, रामदेव बाबा जरी निवडणुका लढले तरी भाजपच्याच मतांची विभागणी होईल. अशा पक्क्या राजकारणाची खेळी आखुनच काँग्रेस मैदानात उतरल्याचे दिसतेय.     
        
                        एकुणच काय ? यात सामान्य माणसाचे कुठेच भले होणार नाहीये. आधी भ्रष्टाचाराच्या ओझ्याखाली दबल होता, आत्ता या मुठभर सोवळ्यांच्या हुकूमाखाली दबतोय. लक्षात घ्या, येणार्‍या निवडणुकांत आपण मतपेटीतून भडवेगिरी करणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना त्यांची लायकी दाखवू शकतो. पण सत्तेच्या उन्मादात जर उद्या ह्या सेल्फ मेड सिविल सोसायटीने हुकूमशाही आणली तर आपल्याकडे त्यांना हटवण्याचा कोणताही पर्याय शिल्लक नसणारेय. आपण आपल्या मताच्या ताकदीवर इंदिरा गांधीना देखील  नाकारले, अटलबिहारी वाजपेयी सारख्या मुत्त्सद्दी माणसाला देखील नाकारण्याची हिम्मत दाखवू शकलो. पण भविष्यात या सिविल सोसायटीला आपण कोणत्याही पातळीवर नाकारू शकत नाही. तुमच्या मनातला राग दाबून ठेवा योग्य वेळी बाहेर पडण्यासाठी.     


Wednesday, June 8, 2011

बाबा रामदेव की जय - भाग ४

       आत्तापर्यंतच्या एकुण तीन भागात मी बाबा रामदेव यांच्या संपूर्ण आंदोलनाची रुपरेषा विषद केली. ज्या पद्धतीने सरकाने दडपशाही करून लोकशाहीला निषेधार्ह असणार्‍या कृत्याचा वापर करून आंदोलन चिरडून काढले त्याचा जाहील निषेध ही केला. पण आत्ता मात्र या एकुण आंदोलनाचे खरे रुप समोर यायला लागलेय. या आंदोलनामागून चालणारी राजकारण्यांच्या अराजकीय खेळीचे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेय.
       आमच्या पिढीने (मला येथे ग्लोबलायझेशन नंतर वाढलेली पिढी अपेक्षित आहे.) अनेक उत्कृष्ट वक्ते पाहीले. अव्वल दर्जाचे कम्युनिकेटर पाहीले. पण रामदेव बाबा हे सर्वात हाय क्वालीटीचे, इंप्रेसिव, प्रभावशाली असे कम्यूनिकेटर आहेत. पण त्याहीपेक्षा एक उत्तम मिडीया ऑर्गनायजर म्हटले तर वावगे ठरणार नाही. माझे म्हणणे पटत नसेल तर बाबांनी रामलीला मैदानावर केलेल्या सर्व पत्रकार परिषदा पहा. यु ट्यूब वर पाहून घ्या. मला या बाबतीत माझे मित्र प्रा. दिलीप मंडल यांनी केलेले विधान फार महत्त्वपूर्ण वाटते ते असे की,  
“ बाबा दरअसल रामलीला मैदान में एक बड़ा सीन डायरेक्ट करते नजर आते हैँ। बाबा के क्लोज शॉट को जूम आउट करते ही जो चार-पांच चेहरे दिखते थे उसमें पक्के तौर पर कोई मौलाना होता था। बाबा जैसे ही कुछ बोले और भीड़ की प्रतिक्रिया हो, अद्भुत परफेक्शन के साथ भीड़ को फोकस करने वाला शॉट स्विच कर दिया जाता था। न्यूज चैनलों से बेहतर कैमरा डायरेक्शन और स्विचिंग वहां हो रही थी। “
सामान्य वाचक पत्रकारीतेला किंवा पत्रकार परिषदेला कधीच म्हणावा तसा सिरीअसली घेत नाही. कारण जर सिरीअसली घेतले असते तर मिडीया एवढ्या सहजासहजी कदीत कोणाला नॅशनल हिरो बनवू शकली नसती. गेल्या दोन लोकसभांपासून कॉंग्रेस पक्षाने जो दांभिकपणा चालवलाय तो लोकांसमोर एवढा सहजासहजी आलेला नाही. पण प्रेस कॉंन्फरंस हा सिरीअसली घ्यावा असाच विषय आहे. कोणत्याही प्रकारच्या आयोजनामध्ये एक प्रकारचा जूगारच असतो. मटकाच म्हणा हवा तर.. लगा तो तीर नही तो नंगा फकीर... पत्रकार परिषदेला पत्रकारांनी संगनमताने डच्चू दिला तर अख्खे आयोजन पाण्यात जाते. पण जर का पत्रकार परिषद यशस्वी झाली तर ती एखाद्या सभेपेक्षाही जास्त इंम्पॅक्ट क्रिएट करू शकते. पण प्रेस कॉन्फरंसचा वापर प्रत्येकालाच प्रभावीपणे करता येतो असे नाही, जर असे असते तर मुंबई मराठी पत्रकार संघात आठवड्यागणिक शेकडो परिषदा होतात पण सगळ्यांनाच कव्हरेज मिळतेच असे नाही. पण बाबा रामदेव यात एकदम उस्ताद माणूस.
       जेव्हा जेव्हा प्रेस कॉन्फरंस बोलावली गेली तेव्हा तेव्हा त्याचा अचूक वापर बाबा रामदेव यांनी केला. प्रेस कॉन्फरंसला आलेले रिपोर्टर अचानक एखाद्या स्क्रिप्ट मध्ये लिहील्या गेलेल्या कॅरेक्टरप्रमाणे वागवले गेले. किंबहूना ते तसे वागतील यासाठी आवश्यक असणारी सारी परिस्थिती निर्माण केली गेली. कॉन्फरंस चालू असतानाच बाबा उपोषणकर्ते आणि पत्रकारांचे प्रश्न अशा दोन्ही आघाड्या लिलया सांभाळत होते. उपोषणकर्त्यांच्या घोषणांचा आवाज मोठा झाला रे झाला की बाबा स्मितहास्य द्यायचे. त्याचवेळी लाँग शॉट वर असलेला कॅमेरा बाबांचा क्लोज अप टिपायचा. या आवाजात कितीतरी वेळा पत्रकारांचे जटील प्रश्न दाबले गेले. प्रश्न विचारत असताना एखादा अडचणीत आणणारा प्रश्न आला की बाबांचे ठरलेले उत्तर तयार असायचे ते असे... “आप लोग आपस में झगड़ा मत कीजिए। आप आपस का झगड़ा आप निबटाओ, मैं तो सरकार से झगड़ रहा हूं। “

क्रमशः

Monday, June 6, 2011

बाबा रामदेव की जय ! भाग- ३


 
      भगव्या वस्त्रांकित व्यक्तिंना आपल्या देशात कायम वेगळ्या चष्म्यातून पाहीले गेले आहे. भगवे वस्त्रे परिधान करणारे बाबा लोक म्हणजे साधू, महात्मा हा पूर्वापार रुढ असलेला एक भोळा समज. त्यामुळे धार्मिक व्यक्तिंनी लबाडी केल्या जाणार्‍या राजकारणासारख्या धूर्त आणि फसव्या लोकांच्या क्षेत्रात पाऊल ठेवू नये असा जनमताचा प्रवाह संपूर्ण देशभर दिसतो. पण बाबा रामदेव यांपेक्षा निश्चितच वेगळे आहे. त्याची कारणे देखील तशीच रोचक आहेत.
 
1.       बाबा रामदेव यांना योगविद्येच्या प्रसाराच्या माध्यमातून जगभर नाव कमाविले.
2.       कधीच कोणत्याही पद्धतीच्या चमत्काराची, जादूची बतावणी केली नाही.
3.       योगविद्येचा ब्रँड या ग्लोबलाईज्ड जगात एका मल्टीनॅशनल फर्म सारखा नावारुपाला आणला.
4.       कधीही कोणत्याही शिबीरात कधीही कोणत्याही प्रकारचे बिभत्स वतर्न नाही किंवा कुठेही कोणाच्या भावना भडकावणे अथवा दुखावण्याचे कृत्य केले नाही.
5.       कधीही धर्माच्या नावाचा किंवा त्याद्वारे प्राप्त झालेल्या अधिष्ठानाचा चुकीचा वापर केला नाही. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची शालीनता कायम टिकवून ठेवलीये.
6.       त्यांना त्यांच्या या अध्यात्मिक आयुष्यात लाखोंवर भक्त लाभले. त्यांचे त्याच प्रमाणात अनुयायी देखील बनले. साहजिकच शेवटी ते सुद्धा मानवप्राणीच आहेत. एवढे सगळे सोबतीला असताना राजकीय महत्त्वाकांक्षा न बळावल्या तर नवलच!
7.       सगळ्यात  महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात होउन गेलेल्या आणि सध्या असलेल्या इतर बाबांना देखील लाखोंनी अनुयायी होते पण त्यांनी कधी त्यांच्या राजकीय अनुयायांना भ्रष्टाचाराविरोधात ना लढण्यास प्रवृत्त केले ना ते स्वतः कधी या लढाईत उतरले. मात्र रामदेव बाबा या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले. ते स्वतः दंड थोपटून मैदानात उतरले.
वरील ७ मुद्दे वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बाबांचे शालीन चरित्र. या शालीनतेमुळेच त्यांना आज संपूर्ण देशात मान आणि स्वीकृती मिळतेय. त्यांच्या आंदोलनाला आत्ता अण्णांच्या आंदोलनापेक्षाही जास्त यश मिळालयं. ३ जून २०११ ला सरकारचं शिष्टमंडळ आणि बाबा रामदेव यांच्यात पाच तासांची मॅरेथॉन चर्चा होउन देखील काही निष्पण्ण झाले नाही. ४ जून ला मोठ्या दिमाखात आंदोलन सुरू झाले. आंदोलनाचे लोण आत्ता तर सार्‍या देशभर पसरले आणि ज्याची भीती होती तेच झाले. बाबांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून सरकारने दडपशाही करून रात्री दोन वाजता जबर लाठीमार करून आंदोलन चिरडून टाकले. बाबांची रवानगी जबरदस्तीने दिल्ली रामलीला मैदानातून हरिद्वारला केली गेली. सर्वत्र सरकारच्या नावाचा निषेध केला गेलाय. आत्ताही तो निषेध होतोय. आणि तो व्हायलाच हवा. ज्या पद्धतीने आंदोलन चिरडण्यात आले तो प्रकारच मुळात चुकीचा होता. पोलिसांनी आपल्या या कृष्णकृत्याच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस कारण सादर केलेले नाही. आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नव्हता मग एवढा अमानुष लाठीमार करण्याची गरजच काय होती ? त्यानिमित्ताने आंदोलनाचा एकुण घटनाक्रम पाहणे निश्चितच योग्य ठरेल.
1.       १ जून : बाबा रामदेव यांचे उज्जैन येथून दिल्ली विमानतळावर आगमन. प्रणव मुखर्जी, पवनकुमार बन्सल, कपिल सिबल आणि सुबोधकांत सहाय यांच्याशी काळा पैसा व भ्रष्टाचार निर्मूलन या मुद्द्यांवर बाबांची चर्चा
2.       २ जून : दोन्ही बाजूंमध्ये बंद दाराआड चर्चा
3.       ३ जून : बाबा रामदेव व कपिल सिबल-सुबोधकांत सहाय यांच्यात चर्चा. बहुतांश मुद्द्यांवर सहमती झाल्याचा उभय बाजूने दावा. उपोषणाला बसण्याच्या निर्धाराचा बाबा रामदेवांकडून सायंकाळी पुनरुच्चार. रामदेवांच्या मागण्यांना केंद सरकारचे टप्प्याटप्यात उत्तर.
4.       ४ जून : रामलीला मैदानावर बाबा रामदेवांचे उपोषण सुरू. सरकारने मागण्या मान्य केल्यास दुपारपर्यंत उपोषण सोडण्याचे बाबा रामदेवांचे पत्र केंद सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, असे पत्र लिहिलेच नसल्याचा बाबांचा दावा. केंदाचा प्रतिदावा. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम. केंद सरकारकडून रात्री उशिरा बाबांना पत्र.
5.       ४-५ जूनची मध्यरात्र १.०० : मध्यरात्र उलटल्यानंतर दिल्ली पोलीस दबक्या पावलांनी रामलीला मैदानाच्या परिसरात जमा होऊ लागले. स्वत: बाबा आणि त्यांच्या समर्थकांना याची आणि पुढे घडणाऱ्या रामायणाची पुसटशीही कल्पना नव्हती. हळूहळू पोलिसांची संख्या वाढू लागली. सोबतीला राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
6.       १.१५ : पोलिसांनी बाबांच्या समर्थकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. इथे बॉम्ब ठेवला आहे, अशी खोटीच बतावणी करून पोलिसांनी समर्थकांना मानगुटीला धरून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस आणि समर्थकांत वादाच्या फैरी झडल्या.
7.       १.३० : समर्थक बधत नाही म्हटल्यानंतर पोलिसांकडून जोरदार लाठीमार सुरू. महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकही पोलिसांच्या हल्ल्यातून सुटले नाही. पाठीवर, पोटावर वळ उठेपर्यंत लाठ्या हाणल्या. हे कमी होते म्हणून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. खुद्द बाबांच्या म्हणण्यानुसार, गोळीबारही झाला. लाठीहल्ल्यात पन्नासहून अधिक जखमी झाले. त्यातील एका महिलेची स्थिती गंभीर.
8.       २.१० : पोलिसांशी हुज्जत न घालण्याचे आणि शांतता राखण्याचे बाबांचे आवाहन
9.       २.३० : दिल्ली पोलीस बाबांना अटक करणार, हे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष समर्थकांनी बाबांभोवती मानवी साखळी करण्यास सुरुवात केली.
10.   २.४५ : मानवी कडे करूनही पोलिसांची जबदरस्ती थांबत नव्हती. पोलीस अटक करणार आणि उपोषण सोडायला भाग पाडणार, हे लक्षात येताच बाबांनी आपले सामान गोळा करण्यासाठी पोलिसांकडे पाच मिनिटांची मुदत मागितली. पोलिसांना चकवा देऊन बाबांनी तीन मीटर उंच व्यासपीठावरून जमिनीवर उडी मारली. कोणालाही काहीही कळण्याच्या आत बाबा समर्थकांच्या घोळक्यात मिसळून गेले. मध्येच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्याचे दिसले. थोड्या वेळानंतर ते दिसेनासे झाले आणि बाबा कुठे गेले? कुठे गेले? याची शोधाशोध सुरू झाली.
11.   ३.०० : पोलिसांना हुलकावणी देऊन बाबांनी एका महिलेचा वेष परिधान केला आणि पुढचा एक तास ते पोलिसांना गुंगारा देत होते.
12.   ४.०० : अखेरीस चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रामदेव बाबांना हुडकून काढले. दोन महिलांच्या खांद्यावर हात ठेवून चालणाऱ्या 'पांढऱ्या सलवार- कमीझमधील अतिशय जखमी महिले'ने अॅम्ब्युलन्समध्ये चढण्यास नकार दिल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची रवानगी सफदरजंग पोलीस ठाण्यात करण्यात आली.
13.   ४.३० : उपोषणासाठी उभारलेल्या मंडपातून सर्व समर्थकांना बाहेर हुसकावून लावले. त्यानंतर आबालवृद्ध, महिला आणि सर्व नागरिकांनी रस्त्यावर उर्वरित रात्र काढली.
14.   रविवारी सकाळी ९.०० : पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर दिल्ली पोलीस त्यांना घेऊन पालम विमानतळावर पोहोचले. तेथून बाबांना विमानाने डेहराडून येथे पाठविण्यात आले.
15.   ११.४५ : डेहराडूनहून बाबा गाडीने हरिद्वार येथील त्यांच्या पतंजली आश्रमात पोहोचले आणि त्यानंतर ज्येष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर बाबांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर तोफ डागली. उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार.

क्रमशः

(प्रस्तूत घटनाक्रम हा महाराष्ट्र टाईम्स च्या वेबसाईटवरून घेण्यात आला आहे. यात केवळ घटनाक्रमच केवळ बाहेरून घेण्यात आला आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

बाबा रामदेव की जय ! भाग- २

       मुळातच महत्त्वाकांक्षी असलेल्या रामदेव बाबांनी भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेला लढा खरचं धाडसी पाऊल आहे. महत्त्वाकांक्षी कोणी असावं आणि कोणी असू नये या तर्काचा तर मी मुळीच नाही. आधी सर्न संमतीने लढा उभारायचा ठरलेला असताना मधल्या मध्ये इंडीया अगेंस्ट करप्शन आणि अण्णा हजारे लोकपालच्या लढाईत भाव खाउून जातात. आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून टोटल रिफॉर्म वर बोलणार्‍या रामदेव बाबांनी जंतर मंतरच्या लढाईची सुत्रे पडद्यामागून अगदी चतुराईने सांभाळली होती. तेव्हा त्यांच्या सोबतीला होते त्यांच्याच गोतवळ्यातले दोनवेळा श्री श्री म्हणवून घेणारे साधूबाबा रविशंकरजी.
       श्री.श्री रविशंकर भारतीय समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण अशा तिन्ही आघाड्यांवर लिलया घेतलं जाणारं एकमेव नाव. कोणतीही कॉन्ट्रवर्सी नावाला अजूनपर्यंत लागलेली नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी हवा तसा मानमरातब. बाबा रामदेव आणि श्री.श्री रविशंकर यांनी जंतर मंजर च्या आंदोलनाची सुत्रे पडद्यामागून चालवली नव्हे तर पळवली. बाबा रामदेव यांच्याकडे देशातला ६० %  मध्यमवर्गाचं पाठबळ, पतंजली योगपीठाच्या माध्यमातून आलेला प्रचंड पैसा, एकुण भारतीय समाजमनामध्ये असलेली स्ंस्कृतीरक्षक, राष्ट्राभिमानी, योगी अशी प्रतिमा, भाषेचं उत्कृष्ट सामर्थ्य, लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि कार्यकर्त्यांकरवी पोहोचवण्याची हातोटी यात ते माहीर. तर दुसर्‍या बाजूला देशातल्या जवळपास व्हाईट कॉलर जॉब करणार्‍यांपैकी ८०% लोकांच्या गळ्यातला ताईत असलेले श्री.श्री रविशंकर, यांच्याकडेही आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून आलेली कोट्यावधींची गंगाजळी, देशातल्या नामवंत उद्योगपती, प्रभावी राजकारणी, पॉलिसीमेकर, टेक्नोक्रॅट, एकुण संपूर्ण मिडीया यांच्यामध्ये असलेला वावर त्यांचे महत्त्व द्विगुणीत करत होता. म्हणूनच या दोघांनीही अण्णांच्या उपोषणाला पाठींबा दिला पण त्यावेळेस स्वतः मात्र उपोषणाला बसले नव्हते. या दोन्ही बाबांनी केजरीवाल अँड हजारे कंपनीने प्रसारमाध्यमांना हाताशी धरून देशातील संपूर्ण अवस्थाच ढासळली  गेलीय आणि ती नीट करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, त्यावर लोकपाल नावाचं जालीम इंजेक्शन आम्ही शोधून काढलंय. ते देण्याचा अधिकार देखील फक्त आम्हालाच मिळायला हवा. आणि एकदा का हे इंजेक्शन दिले की मग बघा कसे सुतासारखे सरळ होतात! हा विचार रुजवून तसे जनमत तयार करण्यात ते १००% यशस्वी देखील झाले. मग काय गल्ली ते दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त श्रींमतांच्या पोरींना न्याय मिळावा किंवा ताजमध्यला उच्चभ्रूंवर हल्ला झाल्यावर मेणबत्या घेऊन रस्त्यांवर उतरणार्‍या पोरांनी ऐन उन्हाळ्यात दिवाळी साजरी केली. मग लोकपालाच्या बैठकांची रुपरेषा ठरली. समिती बनली. पण बाबा रामदेवांना मात्र कुठेच स्थान नाही. भूषण पिता-पुत्र दोघांचीही वर्णी लागली. केजरीवाल आणि अगदी अण्णा देखील आले. आंदोलनाच्या यशानंतर सेल्फ मेड सिवील सोसायटीच्या सदस्यांनी श्री.श्री रविशंकर यांच्याशी सलगी वाढवली आणि बाबा रामदेव यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि येथेच आंदोलनाचे खरे दोन तुकडे झाले. एक गट निर्माण झाला अण्णांचा तर दुसरा गट विरोधातला तयार झाला तो बाबा रामदेव यांचा.
       दुसर्‍या टोकाला अशा सगळ्या प्रकारच्या हालचाली घडत असताना महाभ्रष्ट कॉंग्रेस कार्यकारीणीने डाव साधला. हरिद्वार वरून उपोषणाचं हत्यार खांद्याला लटकावून निघालेल्या रामदेव बाबांना अवास्तव महत्त्व द्यायला सुरुवात केली. अगदी त्यांच्या दिल्लीतील आगमनापासून केंद्रतील बड्या राजकारण्यांनी बाबांना रेड कार्पेट ट्रिटमेंट कशी मिळेल याकडे साकल्याने लक्ष पुरविले. मग व्हायचा तोच परिणाम झाला. सोबतीला आरएसएस, भाजप आणि मित्रपक्षांचा  पाठिंबा असताना देखील जनलोकपालाच्या कक्षेतून पंतप्रधान व न्यायव्यवस्थेला वगळण्याची मागणी केली. सरकार एकदमच आपल्याला रेड कार्पेट ट्रिटमेंट देतेय हे पाहून रामदेव बाबा पण नरमले आणि वरील मागणी करून मोकळे झाले. वास्तविक पाहता आपण बाबांपुढे नमलो आहोत हे दाखवून बाबांना मोठे करताना त्यांच्या मागण्यांची धार कमी करणे आणि अण्णांच्या गटाचा प्रभाव कमी करणे असे दोन डाव एकाच खेळात या कॉंग्रेसच्या का्र्यकारिणीने साधले.
       भारत देश  भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहीजे. इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला वठणीवर आणलेच पाहीजे. यात कोणाचेही दुमत असता कामा नये.  बाबा रामदेवांनी हे पाउल उचलले ते निश्चितच धाडसी आहे पण योग्य नाही. ते जरी स्वागतार्ह असले तरी स्विकारार्य नाही. कारण या सर्व प्रकारामागे कुठे ना कुठे तरी व्यक्तिगत द्वेष, स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आकांक्षा, समोरच्या गटाला नीच दाखवण्याची इर्ष्या होती. त्यामागचा त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या एका रात्रीत मान्य होणे निश्चितच शक्य नाही. याउलट त्यांनी संपूर्ण परिस्थितीला अनुसरून एखादा सुवर्णमध्य सुचवायला हवा होता पण त्यांनी तसे केले नाही. आम्ही तेवढे सोवळे बाकीचे ते भ्रष्ट, देशातली राजकीय व्यवस्था म्हणजे भ्रष्ट लोकांची संस्था असा समज पसरवून देऊन लोकशाहीबद्दल अनास्था निर्माण करण्याची गरजच काय? जर आंदोलन सगळ्यांनी मिळून एकत्र सुरू केले होते तर आत्ता स्वतःने वेगळे होऊन वाट चोखाळण्याची गरजच काय? अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या पावसाळी आधिवेशानात सत्यात उतरतायेत की नाही हे पाहण्याइतका संयम बाबा रामदेव बाळगू शकले नाहीत? मग ते कसले योगी ? देशाला संसदीय लोकशाही आहे. भावनेच्या भरात आपण संसदीय लोकशाहीपेक्षा व्यक्तिच्या निर्णयाला जास्त महत्त्व देऊ लागलो तर आपल्या देशात देखील भगव्या पडद्याआडून चालणारी हुकूनशाही अवतरायला वेळ लागणार नाही ..
क्रमशः  

Sunday, June 5, 2011

बाबा रामदेव की जय ! भाग- १


बाबा रामदेव- बाबा रामदेव- बाबा रामदेव-
            फक्त एकच नाव. या नावाशिवाय प्रसारमाध्यमांना एकही बातमी नाही. किंबहूना रामदेव बाबशिवाय इतर बातम्या द्यायच्याच नाहीत असा जणू एकुण मिडीयाने सार्वमताने संमत केलेला ठरावच असावा असे वाटले तर नवल वाटू नये. काहीही असो गेल्या आठवड्याभरापासून या स्वामी रामदेवांनी देशाच्या राजकारणाच्या लाईमलाईट पॉईंट वर ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक स्टेटमेंटमधून नेहमीच काही ना काही तरी संभ्रम निर्माण झालाय. त्यानिमित्ताने केलेला हा उहापोह.
1.       नावः- रामदेव किशन यादव,
2.       जन्मठिकाणः- हरियाणा
3.       कामः- योगी
4.       स्थापन केलेल्या संस्थाः- पतंजली योग पीठ
5.       संस्थांमार्फत चालणारे कामः- आयुर्वेद आणि योगविद्येचा प्रसार
6.       संस्थांचा जगभर असलेला पसाराः- जगातील जवळपास २० देश
7.       सध्या प्रकाशझोतात असण्याचे कारणः- भ्रष्टाचार विरोधी आंदोलन

     एवढा काय तो बाबा रामदेव यांचा बायोडेटा. संन्यासी असलेल्या बाबा रामदेव यांनी आपल्या धार्मिक कारकिर्दीची सुरूवातच मुळातच एक योग गुरू म्हणून केली. त्यांचा हरीयाणा ते पतंजली आणि पतंजली ते दिल्ली पर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच ठावूक आहे. आजमितीला या संपूर्ण भारत देशात बाबा रामदेव माहीत नाही असे म्हणणारा एक शेंबडं पोरगं नावाला देखील मिळायचे नाही. त्यांच्या योग शि्बीराला मुख्यमंत्र्यांपासून, केंद्रिय मंत्री ते राज्यपालांची उपस्थिती असायची. कोणत्याही प्रकारचा जादूटोणा नाही, बुवाबाजी नाही, अंगारे-धुपारे नाही म्हणून सुशिक्षितांमध्ये लोकप्रिय व्हायाला त्यांना फारसे कष्ट घ्यायला लागले नाही. सत्य साई बाबा नंतर राजकारण्यांवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे बाबा म्हणून रामदेव बाबांचा उल्लेख केला तर ती अतिशयोक्ती ठरू नये. संपूर्ण देशभरात त्यांचे योगासन शिबीरे चालू असतात. त्यांच्या पतंजली पीठाला मिळणार्‍या देणग्याही डोळे दिपवणार्‍या आहेत. याच पतंजली पीठाची संप्पत्ती अब्जावधींच्या घरात असल्याचे बोलले जाते.  या मिळणार्‍या देणग्यांचा हिशोब त्यांनी आजवर दाखवलेला नाही हा भाग वेगळा. स्वतः हे माया ते माया म्हणत लोकांना वैराग्याचे महत्त्व पटवून द्यायचे आणि स्वतः मात्र एसी गाड्यांतून फिरायचे, असा दुटप्पीपणा ते आजतागायत करत आले आहेत.  पण आज अध्यात्म आणि योगासने सोडून त्यांनी राजकारणाचे दार ठोठावलेय, सरकारसाठी अँटी हिरो बनून प्रचंड प्रसिद्धी देखील मिळवली. भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करून रातोरात नॅशनल स्टार देखील झाले. पण ज्या आंदोलनाची सुरूवात त्यांनी केलीये त्याची सत्यता पडताळून पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण क्रांती ही कधी एका रात्रीत घडून येत नाही. त्याची एक प्रोसेस असते. जेव्हा देशातील अकुण व्यवस्था ही लोकमताच्या विरोधात जाते तेव्हा क्रांतीची खरी गरज वाटू लागते. प्रत्येक क्रांतीचा एक नायक असतो. त्याचे स्वतःचे असे नेतृत्व आणि व्हिजन असते. क्रांतीचा लढा उभारताना लढ्याची ध्येय्य, उद्दीष्टये, परिणाम यांचे जनतेवर होणारे दुरगामी परिणाम यांची सखोल चर्चा होउनच लढ्याची दशा आणि दिशा ठरविणे योग्य, नाहीतर जो क्रांती घडवून आणण्यासाठी असंवैधानिक मार्गांचा वापर करतो तोच मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचारासारखा वापर करून हुकूमशाहीला दारे मोकळी करून देतो. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने उपोषण करण्याचा जो एक ट्रेंड सुरू झालाय तो आपल्या एकुण समाजाला उपरोल्लिखित परिस्थिताकडे नेणारा आहे.
       वास्तविक पाहता बाबा रामदेव यांचे उपोषण हे भ्रष्टाचार मुक्त भारत साकारण्यासाठी आहे आपण त्याचे स्वागत करायलाच पाहीजे. पण त्याची पार्श्वभूमी समजावून घेतल्याशिवाय खरे मुद्दे कळणार नाहीत. जवळपास दोन वर्षांपूर्वी स्विस बँकेत असलेला काळा पैसा हा सर्वात जास्त भारतातूनच येत असल्याच्या बातम्या पुढे आल्या. त्यातूनच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया अगेंस्ट करप्शन च्या माध्यमातून देशातल्या बड्या नॉन पॉलिटिकल पण प्रभावी व्यक्तिमत्त्वांना एकत्र करून भ्रष्टाचार विरोढी आंदोलन उभारले. सुरूवातीला आंदोलनाला काहीच यश मिळाले नाही. जवळपास पावणे दोन वर्षांच्या कालावधीत या आंदोलनाला कुणी मुंगीएवढा पण स्पेस दिला नाही आणि आत्ता हे अकुण डब्ब्यात जाणार असे चित्र असताना अचानक चक्रे फिरली कालपरवापर्यंत गल्ली बोळातलं आंदोलन म्हणवून हिणवल्या गेलेल्या आंदोलनाला एकदम प्राईम टाईम ची स्पेस मिळायला लागली. इंडिया अगेंस्ट करप्शन च्या प्रत्येक हालचालींना हेडलाईन मिळू लागली. असे नेमके का झाले असावे ? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या आंदोलनाचा एकुण चेहरा लपलेला आहे, आणि तो एकुणच खुप मजेशीर देखील आहे.
       २०११ सालाचा अंत आणि सुरूवातच मुळात एका नव्या क्रांतीच्या पर्वाला जन्माला घेऊनच झाली. ट्युनिशिया, इजिप्त आणि नंतर लिबीया सारख्या हुकूमशाही राष्ट्रांत बोकाळलेला भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकण्यासाठी तेथील जनतेने केलेला उत्फुर्त उद्रेक जगभरातल्या मिडियाने टिपला. त्या उद्रेकाला यश देखील मिळाले, अर्थात ते मिळण्यामागे तेलाच्या राजकारणाचा कसा सहभाग होता हा मुद्दा वेगळा. भारतात २०१० साली  सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली होती. जनमताने भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्‍यांविरोधातल्या रागाचा परमोच्च बिंदू एव्हाना गाठला होत. वास्तविक पाहता आखाती देशांमध्ये घडलेल्या प्रकार हा जरी क्रांतीत मोडत असला तरी त्याचे इप्सित ध्येय्य अजूनदेखील साधले गेलेले नाहीये. आखाती देशातील विद्रोह भारतीय मिडीयाने अत्यंत चवीने चघळला होता. त्या निमित्ताने भारतातील पत्रकारांनी आपल्याकडे अशा प्रकारची क्रांतीची कशी गरज आहे या विषयाला तोंड फोडले. आणि मग काय भारतात देखील लोकपाल चा लढा सुरू झाला. लोकपाल चा लढा कसा फसवा होता हे मी याआधीच सविस्तरपणे मांडले आहे.
     
        अण्णांचे उपोषण सुरू झाले, बराच काळ लांबले. आंदोलनाचे लोण देशभर पसरले.
लोकांनी रस्त्यावर उतरून, जंतर मंतर सारख्या ठिकाणांना तहरीर चौकाचं स्वरूप प्रदान करून देउन हा लढा उभारला  तो तात्पुरता जिंकला. तो जिंकण्यासाठी जंतर मंतर च्या आंदोलनाला स्वांतत्र्यलढ्याची आभासी प्रतिमा निर्माण केली गेली. (नेमके हेच चित्र रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या वेळी देखील उभारण्यात येतंय.) शेवटी सरकार झुकलं अण्णांच्या मागण्या झाल्या. राळेगणसिद्धीचे अण्णा रातोरात गांधी बाबा बनले. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, श्री श्री रविशंकर, किरण बेदी, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश यांनी एकत्रितरित्या सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले, पण यात भाव खावून गेले ते फक्त अण्णा. बाकी कुणालाच म्हणावे तसे एक्सपोझर मिळाले नाही. सारे यश अण्णांच्या नावावर लिहीले गेले.  आणि येथूनच बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या कहाणीचा जन्म झाला.
क्रमशः


Wednesday, June 1, 2011

आरक्षण भाग ४

आरक्षणास अनुसरुन असणार्‍या घटना दुरुस्त्या
स्वातंत्र्योत्तर काळात आरक्षणा संदर्भात काही घटना दुरुस्त्या केल्या त्या पुढील प्रमाणे
१ ला घटना दुरुस्ती (कायदा १९५१)       १९५० साली भारताचे संविधान स्वीकृतीनंतर अवघ्या वर्षभरातच घटना दुरूस्तीची वेळ आली. १८ जून १९५१ रोजी अंमलात आणला गेलेल्या पहिल्या घटना दुरूस्ती कायद्यामध्ये प्रथमच आरक्षणासंबंधी काही बदल करताना नव्या कलमांचा समावेश घटनेत करण्यात आला. मद्रास सरकारने समाजवादी धोरणांप्रमाणे शासकीय नोकर्‍यात व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आरक्षण सुरु केल्याने या निर्णयाविरुद्ध आव्हानात्मक याचिका दाखल झाल्या.
       स्टेट ऑफ मद्रास वि. चंपकम दोराइराजन
(AIR 1951 SC 226) च्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा फार महत्त्वपूर्ण मानला जातो. ह्या निकालामुळेच संविधानाच्या अंमलबजावणीनंतर पहिल्यांदाच घटना दुरूस्ती करण्यात आली. त्याचबरोबर भारतातील आरक्षण प्रणालीवर सुप्रीम कोर्टाद्वारे देण्यात आलेला पहिलाच निर्णय. ब्रिटीशकालीन भारतात मद्रास प्रांताने पारीत केलेल्या कम्युनल ऑर्डरच्या विरोधात हा निकाल गेला. तसेच या दुरूस्तीमुळे राज्यांच्या अधिकारांबाबत मार्गदर्शन करणारे कलम ३१ (क) संविधानात अंतर्भूत करण्यात आले. प्रस्तूत सुधारणा करताना तत्कालीन प्रधामनमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी  स्टेट ऑफ मद्रास वि. चंपकम दोराइराजन या प्रकरणाचा आधार घेत कॅबिनेटला योग्य सुचना केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जवाहरलाल नेहरू यांनी या दुरूस्तीस पाठिंबा दर्सविताना त्यावर सखोल विश्लेषण देखील केले तर हींदूत्व या संकल्पनेचे जनक मानले गेलेले श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला.

८ वा घटना दुरूस्ती कायदा १९६०
     
प्रजासत्ताकाच्या पहिल्या दशकभरातच भारतीय शंविधान एकुण आठ वेळा अपडेट केले गेले. ५ जानेवारी १९६० रोजी करण्यात आलेला महत्त्वपूर्ण बदल म्हणजे संविधानातील कलम ३३४ मध्ये सुचविण्यात आलेली मुदत वाढ. भारतीय संविधान कलम ३३४ नुसार संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि राज्यांचे कनिष्ठ सभागृह असलेली विधानसभांमध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अँग्लो इंडियन कम्युनिटीला नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्वाचा कालावधी हा १९५० नंतर दहा वर्षांसाठी  निश्चित करण्यात आला होता. परंतू १९६० पर्यंत या उपरोल्लिखीत वर्गांमध्ये अपेक्षित अशी प्रगती घडून न आल्यामुळे ही मुदत आणखी दहा वर्षांनी वाढवणायत आली. त्यानुसार बदलेले कलम पुढीलप्रमाणे ...  
Amendment of article 334.-In article 334 of the Constitution, for the words "ten years" the words "twenty years" shall be substituted.

२३ वा घटना दुरुस्ती कायदा १९६९-
         २३ जानेवारी १९७० रोजी अंमलात आलेला प्रस्तूत कायदा हा याआधीच्या ८ व्या दुरूस्तीची पुनरावृत्तीच होती. यावेळी मागील वेळेप्रमाणे वाढवण्यात आलेली मुदत ही पुन्हा दहा वर्षांनी वाढवणायत आली. आणि यात नवा शब्द समाविष्ट करण्यात आल्यामुळे नवे बनलेले कलम पुढीलप्रमाणे...
      
Amendment of article 334.-In article 334 of the Constitution, for the   words “twenty years", the   words   "thirty years” shall be substituted.



४५ वा घटना दुरुस्ती कायदा १९८०
      २५ जानेवारी १९८० रोजी अंमलात आलेला प्रस्तूत कायदा हा याआधीच्या ८ व्या व २३ व्या दुरूस्तीची पुनरावृत्तीच होती. यावेळी मागील वेळेप्रमाणे वाढवण्यात आलेली मुदत ही पुन्हा दहा वर्षांनी वाढवणायत आली. आणि यात नवा शब्द समाविष्ट करण्यात आल्यामुळे नवे बनलेले कलम पुढीलप्रमाणे... Amendment of article 334.-In article 334 of the Constitution for the   words “thirty years";   the    words “forty years” shall be substituted.

५१ वा घटना दुरूस्ती कायदा १९८६
       प्रस्तूत कायदा हा १६ जून १९८६ रोजी अस्तित्त्वात आला. या बदलामुळे भारतातील पूर्वांचल मधील मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांतील अनुसुचित जमातींची ओळख करताना त्यांची व्याख्या करण्यात आली. मेघालय विधानसभेने ३१ मार्च १९८० रोजी पारित केलेल्या ठरावात मेघालय मधील अनुसूचित जमातींना  विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला न्याय देताना भारतीय संविधान कलम ३३० व ३३२ मध्ये सुधारणा करून संघराज्य क्षेत्र यामध्ये मेघालय , नागालॅंड ,अरुणाचल प्रदेश, आणि मिझोराम मधील अनुसूचीत जमातींना लोकसभेमध्ये आणि कलम ३३२ मध्ये सुधारणा करुन नागालॅंड आणि मेघालय येथील विधानसभा मध्ये जागा राखुन ठेवण्यात येतील अशी दुरुस्ती केली.


५७ वा घटना दुरुस्ती कायदा १९८७
       प्रस्तूत कायदा हा २१ जानेवारी १९८७ रोजी अस्तित्त्वात आला. हा कायदा यापूर्वी झालेल्या ५१ वा घटना दुरूस्ती कायदा १९८६ ला पुरक म्हणून बनवण्यात आला होता. भारतीय संविधान कलम ३३० व ३३२ मध्ये १९८६ साली करण्यात दुरूसतीनंतर देखील त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर तेथील अनुसुचित जमातींच्या प्रगतीचा आलेख ही जसाच्या तसाच राहीला होता. आणि म्हणूनच त्या विशिष्ट प्रदेशातील मागास जातींना पुढारलेल्या वर्गासोबत जाण्यासठी किंवा त्यायोग्य पातळी गाठण्यासाठी एक तात्पुरता उपाय म्हणून लोकसभेत व राज्यांच्या विधानसभेत एकूण राखीव असलेल्या जागांच्या संख्येशी असलेल्या प्रंमाणापेक्षा कमी नसेल अशी दुरुस्ती केली. शिवाय ही दुरूस्ती केवळ २००० साली होणार्‍या जणगणनेपर्यंतच राहीन असेही नमुद करण्यात आले.

६२ वा घटना दुरुस्ती कायदा १९८९

         २० डिसेंबर १९८९ रोजी अंमलात आलेला प्रस्तूत कायदा हा याआधीच्या ८ व्या, २३ व्या आणि ४५ व्या दुरूस्तीची पुनरावृत्तीच होती. यावेळी मागील वेळेप्रमाणे वाढवण्यात आलेली मुदत ही पुन्हा दहा वर्षांनी वाढवणायत आली. आणि यात नवा शब्द समाविष्ट करण्यात आल्यामुळे नवे बनलेले कलम पुढीलप्रमाणे...
Amendment of article 334.-In article 334 of the Constitution, for the words "forty years", the words "fifty years" shall be substituted.


६५ वा घटना दुरुस्ती कायदा १९९०
       १२ मार्च १९९२ रोजी भारतीय संविधानात ६५ वे संशोधन करण्यात आले. भारतीय संविधान कलम ३३८ नुसार अनुसुचीत जाती व अनुसुचीत जनजमाती यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याशी निगडीत असलेली सर्व प्रकरणांचा न्यायनिवाडा करण्यासाठी एका उच्चस्तरीय राष्ट्रीय आयोगाची नेमणुक करण्यात यावी. या आयोगाचे कामकाज राष्ट्रपती नियमाद्वारे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पाच सदस्य त्यांच्या सेवेच्या शर्ती निश्चित करतील असा आयोग अनुसुचित जाती व अनुसुचित जनजाती राष्ट्रीय आयोग म्हणुन ओळखला जाणारा आयोग असेल अशी सुधारणा करण्यात आली.


७२ वा घटना दुरुस्ती कायदा १९९२
       ५ डिसेंबर १९९२ रोजी अंमलात आलेला ७२ व्या घटना दुरूस्ती कायदा भारतीय संविधान कलम ३३२ अंतर्गत करण्यात आलेला कायदा आहे. त्रिपुरा राज्यात उद्भवलेल्या आणिबाणीवर मात करण्यासाठी सरकार आणि त्रिपुरा नॅशनल वॉलंटीअर्स मध्ये मेमोरंडेम ऑफ सेटलमेंटवर सह्या करण्यात आल्या. यानुसार त्रिपुरा राज्याच्या विधानसभेतील जागांच्या संख्येचे अनुच्छेद १७० ला अनुसरुन तात्पुरती सुविधा म्हणुन विधानसभेत अनुसुचित जमातीसाठी त्यांच्या विधान सभेतील सदस्यांच्या संख्येचे त्या विधानसभेतील एकूण जागाच्या संख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणापेक्षा कमी नसेल अशा प्रकारचे बदल करण्यात आले.
७३ वा घटना दुरुस्ती कायदा १९९३
       प्रस्तूत कायदा २४ एप्रिल १९९३ अंमलात आणला गेला . या संशोधनानुसार घटनेमध्ये ९ वा भाग समाविष्ट करण्यात आला असुन या भागतील २४३(न) नुसार ग्रामसभा, पंचायत व नगरपालिका याला अनुसरुन असणार्‍या सभेवर निवडून येवून प्रतिनिधीत्व करणार्‍या व सभेस अनुसरुन असणार्‍या सभापती पदावर" अनुसुचित जाती " व "अनुसुचित जमाती" या लोकांच्या त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात आरक्षित करता येईल. नगरपालिकेतील विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल.अशा आरक्षीत ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशापेक्षा कमी नसतील एवढ्या जागा अनुसुचित जातीच्या किंवा प्रकरणपरत्वे अनुसुचित जमातींच्या महिलांसाठी आरक्षीत ठेवता येतील.संविधानातील ३३४ नुसार विनिर्दिष्ट केलेला कालावधी समाप्त झाल्यावर परिणामक असण्याचे बंद होईल अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या घटना दुरुस्तीने आरक्षण लागू केले.

७६ वा घटना दुरुस्ती (कायदा १९९४)
       ३१ ऑगस्ट १९८४ रोजी अंमलात आणला गेला. तामिळनाडूतील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्याकरता सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी व शैक्षणिक संस्थामधील पदाकरिता आरक्षण धोरणाला १९२१ पासून स्विकारले आहे. राज्य सरकारने वेळोवेळी मागास वर्गीयाकरीता आरक्षणाची टक्केवारी वाढवीत वाढवीत ती ६९ % टक्क्यापर्यंत आणली होती.( अनुसुचित जातीकरिता १८%, अनुसुचित जमाती करिता १% व उर्वरित ५०% टक्के इतर मागासवर्गीयाकरिता) याचवेळी इंद्रा सहानी च्या प्रकरणात न्यायपलिकेने म्हटले होते की," कलम १६ (४) नुसार कोणतेही आरक्षण हे ५०% टक्क्यापेक्षा अधिक असता कामा नये"पण त्याचवेळी तामिळनाडू सरकारने १९९३ साली एक कायदा संमत केला होता. त्यास संविधान कलम ३१(क) नुसार राष्ट्रपतींनी संमती दिली .

७७ वा घटना दुरुस्ती (कायदा १९९५)
       १७ जून १९९५. १९५५ सालापासून अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती च्या लोकांना सेवेमधील पदोन्नतीचे लाभ मिळत होते. सर्वोच्च न्यायालयातील इंद्रा सहानी प्रकरणामध्ये दि १६ नोव्हेंबर १९९२ रोजी जो न्यायाधिशांनी निकाल दिला तेव्हा कलम १६(४क)हे समाविष्ट केले की, ज्यानुसार या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टींमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये ज्या कोणत्याही अनुसुचित जातींना किंवा अनुसुचित जमातींना त्या राज्याच्यामध्ये पर्याप्त प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा संबंधातील कोणत्याही वर्गामध्ये पदोन्नती देण्यासंबंधात आरक्षण करण्यासाठी राज्याला कोणतेही उपबंध करण्यास प्रतिबंध होणार नाही असा कायदा करुन अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती यांच्या संरक्षणार्थ सेवेमधील पदोन्नती ही पुर्ववत चालु ठेवली. या दुरुस्तीमुळे मागासवर्गीयांच्या सेवेमधील पदोन्नतीचे असंख्य अडथळे दुर झाले.

७९ वी घटना दुरुस्ती (कायदा १९९९) – 
              २५ जानेवारी २००० - कलम ३३४ नुसार लोकसभे व राज्याच्या विधानसभात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व आंग्ल भारतीय समाजाला नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधीत्व असण्यासाठी जी १९८९ साली ६२ घटना दुरुस्ती करण्यात आली होती तिच पुढे दहा वर्षासाठी वाढवण्यात आली.

८१ वी घटना दुरुस्ती (कायदा २०००)
       बालाजी न्यायप्रविष्ट प्रकरण (१९६३) इंद्रा सहानी प्रकरण (१९९२) आर.के.सबरवाल प्रकरण (१९९५) व अजितसिंह प्रकरण (१९९९) यापासून आरक्षणावर ५०% टक्क्यांची मर्यादा घातली गेली व त्या त्या वेळी आरक्षण भरले न गेल्याने जो अनुशेष ( कॅरी फ़ॉरवर्ड ) वाढत चालला होता. अशा आरक्षित पदावर अनेक उच्चभ्रु व्यक्तीच्या नेमणुका होऊन त्या कायम होत असल्याने मागासवर्गीयांच्यावर अन्यायाला परिसीमा रहात नव्हती. यामुळे अनुशेषाबाबत कायम गोंधळ होत गेला.परंतु सदर घटना दुरुस्ती, संविधान कलम १६(४) मध्ये १६(४ख) हे समाविष्ट केले. यानुसार ४ख या अनुच्छेदातील कोणत्याही राज्याला अनुच्छेद (४) अगर (४क) च्या तरतुदींनुसार संबंधीत वर्षाला भरावयाच्या रिक्त जागा या वेगळ्या वर्गातील रिक्त जागा या त्या वर्षातील एकूण रिक्त जांगापैकी ५०% जागाच आरक्षीत श्रेणीतून भरण्याच्या प्रतिबंधाशी संबंधीत असणार नाही.या घटना दुरुस्ती मुळे अनुशेषबाबातचा गोंधळ संपुष्टात आला आणि अनुशेष की जो ५०% टक्क्यापेक्षा पुढील असला तरी तो भरुन काढावा असे आदेश देले.
८२ वी घटना दुरुस्ती (कायदा २०००)
       या कायद्यानुसार संविधान कलम ३३५ मध्ये सुधारणा केली .या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे संघराज्य किंवा राज्य सरकारच्या अखत्याराखालील सेवा संबंधातील सेवा संबंधातील कोणत्याही वर्गामध्ये अनुसुचित जाती यांना पदोन्नती देण्यासंबंधाने कोणत्याही परीक्षेत आवश्यक गुणांमध्ये शिथिलता आणण्यास किंवा मूल्यांकन स्तर कमी करण्यास कोणतीही तरतुद करण्यास प्रतिबंध होणार नाही अशा प्रकारची सुधारणा केली.

 ८५ वी घटना दुरुस्ती (कायदा २००१)
       कलम ८१ व ८२ च्या घटना दुरुस्तीनुसार सेवेमध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती कर्मचार्‍याला बिंदुनामावलीने पदोन्नती मिळाल्यास त्याच्या मागून खुले गटातील जेष्ठ कर्मचार्‍याला पदोन्नती मिळाल्यास तो कर्मचारी सेवा्जेष्ठ ठरतो. त्यामुळे बिंदुनामावलीतून पदोन्नती घेणार्‍या अनुसुचित जाती अनुसुचित जमाती च्या उमेदवारावर अन्याय होतो. त्यामुळे तो अन्याय दूर करण्यासाठी ८५ वी घटना दुरुस्ती करुन अनुच्छेद १६(४क) मध्ये सुधारणा केली.ती अशी की, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, राज्याच्या नियंत्रणाखालील क्षेत्रामध्ये ज्या अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमाती यांना राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा संबंधातील कोणत्याही वर्गामध्ये परिणाम स्वरुप जेष्ठतेसह पदोन्नती देण्यासंदर्भात आरक्षीत करण्यासाठी राज्याला कोणतीही तरतुद करण्यास प्रतिबंध होणार नाही. सदर कायद्याची अंमलबजावणी १७ जुन १९९५ पासून अंमलात आल्याचे समजण्यात येईल असेही जाहीर केले.
( या ब्लॉगमधील बरेचसे संदर्भ हे मला नेटवरील एका संकेतस्थळावर भि. रा. इदाते यांच्या लेखातून घेतलेले आहेत परंतू ते सर्व संदर्भ हे वरिल लिंक वर उपलब्ध असलेल्या माहीतीवरूनच संकलित करण्यात आलेला आहे. )

Friday, May 27, 2011

आरक्षण भाग - ३

आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करताना याआधी मी दोन भाग लिहिले आहेत. त्या दोन भागांमध्ये आरक्षणाचा इतिहास आणि मंडल आयोगाची जडणघडण आणि त्याची इतिवृत्तांत अगदी सविस्तरपणे, कोणत्याही प्रकारची बायस सायकॉलजी न ठेवता, त्रयस्थ नजरेने, तटस्थ भूमिकेतून मांडला आहे. परंतू आत्ता या ठिकाणी भारतातील एकुण आरक्षण प्रणाली कशी व ती त्या पद्धतीची का आहे यावर भाष्य करण्याची वेळ आली आहे.
१८५७ च्या सैनिकी उठावानंतर जवळपास अख्खा भारतीय उपखंड इंग्रजांच्या अंमलाखाली आला. पण तोपर्यंत भारत एक राष्ट्र म्हणून संकल्पना जन्माला आली नव्हती. ब्रिटीश भारतात आले. त्यांच्या व्यावहारीक सोयीकरता येथे शाळा स्थापन झाल्या इंग्रजी शिक्षण उपलब्ध झाले. दळणवळणाच्या सोयी निर्माण केल्या गेल्या. यातून महत्त्वाचे फलित समोर आले ते पाश्चात्य शिक्षण आणि मुल्यांची भारतीय समाजमनाला झालेली ओळख. आणि ह्यातूनच स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातला निश्चित असा फरक भारतीयांना कळला. आधुनिक जगातील स्वतंत्र राष्ट्र संकल्पना, स्वातंत्र्याचे महत्त्व, मानवाधिकार, लोकशाही आणि ती मिळवताना युरोपीय राष्ट्रे आणि अमेरिकन वसाहतींनी केलेला संघर्ष ब्रिटीश इंडियात एक राष्ट्र म्हणून निर्माण होण्यास हातभार लावला. आणि नंतर जे काही घडले तो इतिहास आहे. सलग शतकभराच्या निकराच्या लढ्यानंतर १९४७ साली जगाच्या नकाशावर भारत नावाच्या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. २६ जानेवारी १९५० रोजी सार्वभौमत्व प्राप्त झाले. पण यावेळी स्वातंत्र्यलढ्याशी समांतर अजून एक लढा अधिक त्वेषाने लढला जात होता, आणि तो म्हणजे सामाजिक न्यायाचा. एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठीचा, लढा अस्पृश्यतेविरुद्धचा.
अस्पृश्यतेविरोधातला एकुणच सामाजिक विषमतेविरोधातला हा समांतर लढा १८ व्या शतकातच सुरू झाला होता.  क्रांतीसूर्य जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेला लढा शाहू महाराजांनी पुढे चालवला. आणि बाबासाहेबांनी यालढ्याचे इप्सित ध्येय्य साध्य केले. भारतीय संविधानाचा पाया रचताना बाबासाहेबांनी माणुसकीला काळीमा फासणार्‍या विषमवृत्तीना कायद्याच्या चौकटीत बसवून बंद केले. बाबासाहेब जाणून होते की जोवर या देशातील सामाजिक विषमता हद्दपार होणार नाही तोवर या देशाचे स्वातंत्र्य चिरायू होणार नाही. भारतीय संविधानातील कलम १७ अन्वये कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळणे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. शतकानुशतके अस्पृश्यता आणि जातीयतेच्या काळ्याकुट्ट अंधाराखाली गाडल्या गेलेल्या जाती जमातींना पुन्हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर सक्षम करून समानता आणण्यासाठी आरक्षणाच्या मार्ग अवलंब केला गेला. या देशात आरक्षणाला कधीच सकारात्मक पद्धतीने पाहीले गेले नाही. परंतू आरक्षणाच्या माध्यमातून अपेक्षित असलेल्या समानतेचे तत्व हे देखील काही प्रमाणात पाश्चात्य विचारवंताकडून मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. यासाठी पुढील काही उदाहरणे फार बोलकी आहेत.
अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या लेखकांपैकी प्रमुख असलेले थॉमस जेफरसन यांनी प्रस्तूत जाहीरनाम्यात उद्धृत केलेले वाक्य पुरेसे बोलके आहे.
“We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.”
वरिल वाक्यातील unalienable Rights म्हणजेच निसर्गदत्त अधिकार आणि त्यांचे समप्रमाणातील वितरणाचा सिद्धांत हा १६ व्या शतकातच जन्माला आला होता. १६ व्या शतकातले थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि जॅक्वेस रुसो यांच्या लिखाणातून सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर केलेले महत्तवाचे भाष्य जगासमोर येउ लागले होते. समानतेच्या दृष्टीने मानवी मनाची होणारी प्रगती हळूहळू वेग धरू लागली होती. वरील त्रयींपैकी जॉन लॉक या इंग्लिश पॉलिटिकल फिलॉसॉफर ने आयुष्य जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि संप्पतीचा अधिकार हे निसर्गदत्त अधिकार असून प्रत्येकाला त्याचा आनंद उपभोगता यायला हवे असे प्रतिपादन केले. वरिल वाक्यातून राईट टू इक्वालिटी या संकल्पनेचा विशाल अर्थ आणि समानतेचा अधिकार आणि हक्क यातील पुसट रेषा तसेच त्यांची व्याख्या स्पष्ट होण्यास मदत होते. आणि म्हणूनच सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात असलेल्या राष्ट्राने त्या देशातील नागरिकांचा समानतेचा अधिकार पुरवण्याबरोबरच अंमलबजावणीवर ही भर द्यायला हवा.      
भारतीय संविधानातील प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत नमुद केले गेलेले महत्त्वाचे वाक्य
 सामाजिक
, आर्थिक आणि राजनैतिक न्याय
भारताच्या संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक, आर्थिक आणि राजनेतिक पातळींवरील समानता आणि त्यासंबंधीची न्यायप्रणाली लाभ भारतातील एकुण एका नागरिकापर्यंत पोहोचवायला हवी एवढा साधा सरळ अर्थ आहे. वरिल त्रयींमधील सामाजिक पातळीवरील समानता हा तसा अतिशय क्लिष्ट आणि वादातीत विषय राहिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर याबद्दलची व्याख्या आजपर्यंत योग्य अंगाने मांडली न गेल्याने तसा दुर्लक्षित राहीला गेलेला मुद्दा. त्यामळे आजपर्यंतचे सर्व वादविवाद हे केवळ आणि केवळ राजनैतिक आणि आर्थिक पातळीवरील असमानतेच्या भोवती चिकटून राहीले आहेत. राजकीय समानता मिळवून देण्यासाठी न्यायपालिका, संसद आणि प्रशासन व्यवस्था ह्या जबाबदार संस्था आहेत. आर्थिक समानता मिळवून देण्यासाठी सरकारने विविध योजनांच्या माध्यमांतून समाजातील आर्थिक मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणणे बंधनकारक आहे. या ठिकाणि विचार करण्याजोगी महत्त्वाची गोष्ट अशी की, भारतात एखाद्या घटकाचे सोशल स्टेटस हे त्याच्या इकॉनॉमिकल स्टेटस वरून ठरविण्याची जनमानसात रुजलेली पद्धत आहे. आणि यामुळेच मंडल आयोगाने इतर मागास जातींची नोंद करताना विविध कसोट्या ठरविल्या त्यात बहुतांश ह्या आर्थिक आधारावर होत्या. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर कायमच मागास राहील्या गेलेल्या मागासवर्गांना ओबीसी मध्ये सामावून घेण्यात आलं. तर कायम जात हा मुख्य दुवा धरून अमानवी छळाला बळी पडून आपले सामाजिक अस्तित्व नाकारले गेलेल्या अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण बहाल करण्यात आलं. वरिल वाक्यात आणि याआधी सुरूवातीला नमुद केलेल्या अनेक सिद्धांतांना अनुसरून जर नीट निरीक्षण केले तर बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण प्रणाली ही खुप फॉरवर्ड आणि शास्त्रशुद्ध असल्याचे जाणवते. आरक्षण देताना ज्या समुदायाचा जातीयवादामुळे उत्कर्ष होउ शकलेला नाही त्यांना जाती- आधारीत आरक्षण दिले गेलेले आहे. आजही भारतात जातीय अत्याचार कमी नाहीत. त्यांची दाहकता देखील कमी झालेली नाही. म्हणून जोवर अत्याचाराचा मुळ गाभा जातीयवाद राहणार तोवर त्या त्या समाजघटकांना देखील त्याच आधारावर प्रतिनिधित्व मिळायला हवे. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळवून देण्यासाठीचा आरक्षण हाच आत्ता उपलब्ध असलेला एकमात्र पर्याय. आणि आपणही आत्ता आरक्षण म्हणजे इतरांवर होणारा अन्याय अशा फसव्या अफवांवर विश्वास न ठेवता आरक्षण म्हणजे मागासवर्गांना मुख्य प्रवाहात येवून प्रगत घटकांच्या खांद्याला खांद्या लावून चालण्यासाठी दिलेली एक सुवर्णसंधी म्हणून पहावे हीच एक माफक अपेक्षा ...
क्रमशः





 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons