विचार करतो मी आहे तरी कोण
शिकल्याची ओळख कि शिकल्याचा शिक्का ?
विचारसरणी कि मांडलिकत्व ?
काय माहीत ? शोधण्याच्या प्रयत्नात भुणभुणतोय भुंगा
वृषभचिन्हांकित मुद्रेसारखा मी स्तब्ध
मनात भयाणतेच्या फेसाळणार्याम लाटा
लालभाईला ठोकलेला लाल सलाम
वर्गव्यवस्थेवर उगारलेला रोकडा संतप्त राग
मला कम्यूनिस्टांचा कॉम्रेड करून गेला.
मग सुरू झाल्या निरंतर प्रसवणार्या कर्कमादिसमक्ष चर्चा,
खांद्यावरचा झोला सावरत कुर्त्याच्या खिशातून काढलेली सिगरेट शिलगावत
क्रांती, शोषण वगैरे वगैरे विषयांवर बुड खाजेस्तोवर चर्चा,
कालांतराने पुढचा रस्ता धरला,
पुढचा सोबती भेटला,
आडनाव काढलंय म्हणून नाव ऐकताक्षणी त्याने मला समाजवादी असल्याचं
अनवॉंटेड सर्टिफिकेट बहाल केलं होतं,
नेहमी मला तो त्यांच्या गोतावळ्यातलाच समजायचा,
पण चुकून कधी त्याच्या घराचा पत्ता माझ्या डोळ्याला शिवला नव्हता.
शाळेत आडनाव सांगायचो तेव्हा म्हणायचे नाशिकचा का ? की खांदेशातला ?
फरक कळत नव्हता ?
रंग काळा, आडदांड शरीर म्हणायचे तु खांदेशातलाच.
आता मी मोठा झालो,
कॉलेजात गेलो, कधी नव्हे ते गोत्र विचारलं
झाटा कळालं नाही,
मी तसाच स्तब्ध, पण डोकं भन्नावलेलं,
डिग्री मिळाली, सामाजिक आयुष्याची सुरूवात झाली,
वळवळ्यांबरोबर चळवळीचे कित्ते गिरवले,
पण येथेही आला आयडेंटीटी क्रायसीस !
मी संविधानवर असतो तेव्हा आठवले गटाचा,
वडाळ्यात नुसता गेलो तरी भाईचा माणूस,
कधी कवाडे सरांच्या तरी कधी भारीप बहुजन महासंघाचा,
ओळखी अनेक मिळाल्या, अनेकदा न मागता,
ह्यांनी दिलेल्या ओळखी, शिक्के, आयडेटिच्या सर्टिफिकेटने
साधा बोचा पुसता येणार नाही, हे ही पुरपुर ठावूक होतं,
मी प्रत्येक कंपूत जबरदस्ती घुसवला गेलो आणि तसाच बाहेरही
एकच ओळख सांगायचो मी आंबेडकरवादी आहे
तेव्हा मात्र विचार नाही तर जात दिसायची
मग मात्र मी कम्यूनिस्ट नाही ना समाजवादी नाही मराठी,
नाही अन्य कोणी, कारण तेव्हा
अधोरेखित झालेलं असतं ते माझं महारपण..
तदपासून न मी कोणाचा न कोण माझं ?