Friday, March 9, 2012

LOG - IN part 2




LOG - IN Part 2
                अख्ख्या जगाला एका फायबर ऑप्टिकल केबलच्या मदतीने आपल्या संगणकावर आणणारं इंटरनेट नेटवर्क हा विसाव्या शतकातील सर्वात क्रांतिकारक शोध ठरलाय. सुरूवातीला कामासाठी आवश्यक असणारे इंटरनेट आज प्रत्येकाचं व्यसन बनलेय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.  आंतरजालाच्या निर्मितीमागे प्रेरणा म्हणून रशियाबरोबरच्या शीतयुद्धात अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीला असलेला धोका फार महत्त्वाचा घटक असला तरी एका राष्ट्राच्या द्रष्टेपणाचं प्रतिक म्हणून पाहणेच उचित ठरेल. आजच्या सायबर युगाला जन्माला घालणार्‍या आंतरजालाच्या निर्मितीचा इतिहास हा संबंध मानवजातीच्या विकासाला कलाटणी देणारा ठरला आहे. वास्तविकता अमेरिकेतील नव्यानव्या तंत्रज्ञानाची उत्पत्ती आणि व्यूत्पत्ती ही तेथील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वैचारिक प्रागतिकतेमुळेच शक्य झाली.  

                १९६० च्या सुमारास, अमेरिका आणि सोव्हियत रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्ध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन,  विज्ञान संशोधन,  अवकाश उपक्रम, हेरगिरी सारख्या कामांतून शिगेला पोहोचलेला होता. त्याच काळात सोव्हीएत ने ४ ऑक्टोबर १९५७ साली स्पुटनिक १ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून शीतयुद्धात अमेरिकेवर आघाडी घेतली. ह्यामुळे धसका घेतलेल्या अमेरिकेने घाईगडबडीत अपोलो ११ ची घोषणा केली. परंतू अण्वस्त्रसज्ज सोव्हिएत रशियाकडून ज्ञानाचे भांडार उडवले जाण्याचा धोका सतत सतावत होता. असे झाल्यास सारे तंत्रज्ञान इतर ठिकाणी एकाच वेळी, एकाच तर्‍हेने, सर्व ठिकाणी सारखेच कसे राहील ? यावर चर्चा सुरू झाली. आणि अमेरिकन लष्कराने सर्व आण्विक, क्षेपणास्त्र व इतर तंत्रज्ञान संबंधित माहिती एका नेटवर्कद्वारे जोडण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टिने वेग वाढविला.

       आंतरजाल म्हणजेच आत्ताच्या इंटरनेटच्या जन्माची कहाणी सुरू झाली ती १९६२ साली. जेव्हा  एमआयटी युनिव्हर्सिटीमधील प्रो. लीकलायडर हे त्यांच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ कम्प्यूटर्स संकल्पनेला घेउन जगासमोर आले. आज प्रो. लीकलायडर इंटरनेट पायोनिअर म्हणून ओळखले जातात. इंटरनेटची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारा आर्थिक नीधी व राजकीय पाठिंबा त्यांनी डार्पा (DARPA - डिफेन्स ऍडवान्स्ड् रिसर्च प्रॉजेक्ट एजन्सी ) च्या साहाय्याने उभा केला. आणि लगोलग संशोधनाला सुरूवात देखील केली. संगणकजाल अपेक्षेनुसार विणले गेले. पण त्याची उपयुक्तता सिद्ध होण्यासाठी दोन संगणकात ईलेक्ट्रॉनिक कम्यूनिकेशन होणे फार महत्त्वाचे होते. हा संवाद घडवून आणण्यासाठी लॉरेन्स रॉबर्ट्स यांनी १९६५ साली मॅसच्यसेट्स आणि कॅलिफोर्निया या दोन पूर्व – पश्चिम सीमांवर विराजमान असलेल्या प्रांतांतील दोन संगणक टेलिफोन वायरींच्या मदतीने जोडले. आणि या टेलिफोन वायरींच्या माध्यमातून जादूईरित्या प्रथमतःच दोन संगणकांना इलेक्ट्रनिकली बोलते केले. एका संगणकाने दुसर्‍या संगणकाला फोन करावा आणि पलीकडील संगणकाने योग्य प्रतिसाद द्यावा हे तसे अनोखे. पण हे अनोखे असे अशक्य काम शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखविले. आत्ता ही बाब झाली केवळ दोन संगणकांच्या बाबतीत. पण जेव्हा गोष्ट जगातल्या असंख्य संगणकांची येते तेव्हा टेलिफोन वायरचे हे तंत्रज्ञान तोकडे पडणार हे लीकलायडर यांना ठाऊक होते. आणि म्हणूनच टेक्नोलॉजी अपडेट करण्यासाठी सारेच कसोशीने प्रयत्न करू लागले.
अशातच यूसीएलए स्कूल ऑफ इंजीनिअरिंग एंड अप्लाईड सायन्सेस मध्ये १९६२ साली प्रा. लिओनार्ड क्लनरॉक हे त्यांच्या मॅथामॅटिकल थेअरी ऑफ पॅकेट नेटवर्क्स वर पीएचडी प्रंबंध तयार करण्यात गुंतले होते. संशोधन कार्य चालू असतानाच त्यांनी नेटवर्क राउटिंग ची कल्पना समोर आणली. राउटर विकसित करण्यासाठी आधी पॅकेट स्विचिंग चं तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे होते हे त्यांनी हेरले. आणि यातूनच आंतरजालाच्या निर्मितीला प्रचंड वेग आला. पॅकेट स्विचिंग हा तसा तांत्रिक शब्द. परंतू याचा वापर आपण नियमित व्यवहारात अनेकदा करत असतो. एखादा इमेल लिहीताना आपण त्याला एकाच स्वरुपात तयार करतो. पण अनेकांना पाठवताना आपण टाकलेल्या पत्त्यांवर तो सारख्याच रुपात सगळ्यांना पोहोचतो म्हणजे पत्र तर एकच लिहीलेले असते पण सगळ्यांना ते सारखेच मिळते. कारण पॅकेट स्विचिंग एकाच स्वरुपातील माहीती असंख्य प्रमाणात, असंख्य पाकिटात भरून असंख्य लोकांपर्यंत किंवा त्यांच्या संगणकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करते. परंतू आपण पाठवलेली माहीती ही नेमकी त्या संगणकापर्यंत पोहोचली आहे की नाही हे तपासण्याचे खात्रीदायक काम राउटरचा करतो. म्हणजे पॅकेट स्विचिंग जर टपाल खाते असेल तर राउटर हे पोस्टमन आणि ह्यांना एकत्रितपणे मिळालेलं पूर्ण रुप म्हणजेच आंतरजाल. ह्याच आंतरजालाचा सर्वप्रथम उपयोग डार्पाने अमेरिकेतील सारे मिलीटरी बेसेस एकमेकांशी जोडताना केला. हेच जगातील पहिले वहिले इंटरनेटवर्क.   
१९६६-६७ च्या सुमारास पॅकेट स्विचिंग आणि राऊटर पूर्णतः विकसित होताच लॉरेन्स रॉबर्ट्स यांनी डार्पाकडे धाव घेतली. नव्यानेच विकसित झालेल्या आंतरजालाचा उपयोग हा केवळ लष्करी कार्यापुरता मर्यादित न राहता त्याचा विस्तार राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यवसायिक, पत्रकारिता, प्रशासनव्यवस्था,  कलाक्षेत्रे,  सारी वाणिज्य क्षेत्रांमध्ये करण्यासाठी डार्पाला साकडे घातले. लॉरेन्स रॉबर्ट्स च्या या प्रतिपादनाला गंभीरतेने घेताना डार्पाने अनेक तज्ञ, विद्वान मंडळींची मते मागविली व त्यांनी संरक्षणात्मक कार्यासाठी असलेल्या डार्पा चे आर्पा मध्ये रुपांतरण करण्याचे सुतोवाच केले. त्यानुसार डार्पा ची सुधारीत आवृत्ती आर्पा- ARPA (ऍडवान्स्ड् रिसर्च प्रॉजेक्ट एजन्सी) ची स्थापना झाली. बॉब टेलर यांनी आर्पाच्या नेतृत्वात तयार होणार्‍या नव्या नेटवर्कची सारी रुपरेषा तय्यार करून घेतली. ठरल्याप्रमाणे कंत्राट काढले गेले. ते कंत्राट मॅसॅच्युसेट्समधल्याच बीबीएन या कंपनीला ७ एप्रिल १९६९ रोजी देण्यात आले. अल्पावधीतच बीबीएमने त्याच वर्षी आर्पासाठी नव्या संवादजालाची निर्मिती केली. आणि त्याचे नामांतर आर्पानेट असे केले.
सुरूवातीला आर्पानेटच्या अधिपत्यात अमेरिकेतील चार प्रसिद्ध विद्यापिठांचे संगणक होते. पुढे जून १९७० ला  एम आय टी, हार्वर्ड विद्यापिठे, बीबीएन स्वत: आणि सँटा मोनिका येथील कंम्प्यूटर्स या जाळ्यात विणण्यात आले. १९७१ साल सुरू होताच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी,  लिंकन लॅबोरेटरी,  कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी या आर्पानेटमध्ये जोडण्यात आले. जेव्हा नासा आर्पानेटच्या कव्हरेज मध्ये आले तेव्हा खर्‍या अर्थाने वैज्ञानिक संशोधनाला नवे आयाम मिळाले. विद्यापीठांमधील आंतरजालांची उपयुक्तता हळूहळू सिद्ध होत होती. १९७२ साली त्यात इमेल ची सुविधा देखील सामाविष्ट केली गेली.
आता खर्‍या अर्थाने जगाचा चेहरा हळूहळू बदलायला सुरूवात झाली होती. १९७२ साल अमेरिकेत उजाडले ते ई-मेल च्या शोधाने जेव्हा भारतात आपल्या आप्तांना तार पाठवणे हे महादिव्य काम समजले जात होते. अमेरिकन भूमी ही अनेक शोधांची जननी आहे, पण त्याचवेळी भांडवलवादाचे उद्गाते असणार्‍या अमेरिकनांनी सारे अविष्कार हे नेहमी नफ्याच्याच परिप्रेक्षातून सार्‍या जगापर्यंत फार उशीरा पोहोचवले.
१९७२ सालापर्यंत ईमेसेजेस म्हणजे इमेल अमेरिकन जगताला सुपरिचीत झाले होते. पण आर्पानेटच्या प्रथमिक अवस्थेतील ह्या इंटरनेटला ला सर्वसमावेशक रुप देणारे वर्ल्ड वाईड वेब चे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या मार्गावर होते. टिसीपी असो किंवा डिफॉल्ट गेटवे नाहीतर आंतरजालाचा वापर सामान्यांसाठी सुकर करून देणारे एफ् टी पी, टेलनेट् चे शोध लागण्याच्या प्रतिक्षेत होते. त्याबद्दल पाहूयात पुढच्या भागात..
             
क्रमशः (पुढील भाग येथे वाचा) 
(वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये साईन इन ह्या सदरात प्रकाशित झालेला आहे . )  

No comments:

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons