Showing posts with label नामदेव ढसाळ. Show all posts
Showing posts with label नामदेव ढसाळ. Show all posts

Tuesday, December 20, 2011

रखरखणारी सावली ..

चमेली गजरा आणि कवळ्या कलेजीची शिकार ...

हातांना गुंडाळलेला गजरा ..

श्वास कोंडणारा स्वस्त अत्तराचा दर्प ..

बेवारशी फिरणारी नायजेरीअन वंशाची भारतीय आयांची मुलं

डावं - उजवं जाणणार्‍या नेपाळी आणि बांग्लादेशी पोरी ...

खुमासदारीने मजा घेणारे .. काम करत असल्याचा आव आणत ..

मनात अनुदानाच्या हिस्स्याचा लाडू फोडत फिरणारे एनजीओवाले...


मध्येच घोगर्‍या आवाजात खिमा पावाची ऑर्डर देणारी अम्मा..


रोगीला देखील भोगणारे लिंगपिपासू


नागव्या चाकूला एकदा तरी ओला करणारे मकोडा


कंडोमच्या फुग्याला दिलेली श्रद्धांजली..


अशीच काहीशी भासत होती नामदेवाने वर्णिलेल्या त्या कामाठीपुर्‍यातली ती रखरखणारी सावली ..



-- वैभव छाया --


नामदेवाला अर्पण


Tuesday, November 15, 2011

आमच्या आळीतून जाताना....


हे महाग्यानी लोक
हिंडताहेत मशाली पेटवून
गल्लीबोळातुन, आळीआळींतून
जेथे उंदीर उपाशी मरतात-
त्या आमच्या खोपटांतील
काळोख़ , म्हणे यांना कळतो
पाणचट गवशीसारखे हेही एक थेर
ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार कळत नाही
त्यांनी पेटलेल्या माण्सांना
छप्पन-टिकली बहुचकपणा
अजुनही दाखवावा
अरे धूर्तांनो,
ज्यांना तुमची नसन नस कळलीय
त्यांच्याशी तरी इमान राखा
आणि ज्यांना उजेड दिसत नसेल
त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा;
आमची ना नाही
मात्र एक:
आमच्या आळीतून जाताना
त्या विझवूनच पुढे जा
आज आम्हाला या खोपटा-खोपटांतून
पूर्ण सूर्य दिसतोय...
-- नामदेव ढसाळ -- 

Monday, September 12, 2011

ढसाळ

आज काल मन फार हेलावून जाते जेव्हा कोणी म्हणते की नामदेवाने पॅंथर काढून चळवळीची वाताहत करुन टाकली. नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्‍यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही "क्षम्य" असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. पण आपल्या मायबोलीचाच हात धरून नेहमी आपल्यावर अत्याचार केलाय त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे जहाल क्रांतीकारक कार्य माझ्या नामदेवानं केलंय.
आज नामदेव ढसाळांचं वय ६२ आहे. वयाने आणि त्यांच्या स्वकर्तृत्वाने ते कितीतरी मोठे आहेत. पोएट ऑफ अंडरवर्ल्डम्हणून ख्याती पावलेले दादा मला नेहमी माझ्यातलेच एक वाटले. आजही सर्वसामान्यांमध्ये जेव्हा केव्हा नामदेव ढसाळांच्या कवितांचा विषय निघतो तेव्हा त्यांना आपला मोठा भाऊ, एक फ्रेंड- फिलॉसॉफर म्हणूनच आपल्या जवळचा मानतो आणि ओघाने माझा नामदेव हा नामदेव ढसाळांप्रती असलेला प्रेमळ स्वार्थी भाव तोंडातून बोहेर येतो. भारतात विद्रोही साहित्याला फार जूनी परंपरा आहे. पण त्या साहित्याला त्याचे खरे स्वरुप, सन्मान त्या साहित्याचे अधिष्ठान हे केवळ आणि केवळ नामदेव ढसाळांनीच मिळवून दिले. साजूक तूपात घोळल्या गेलेल्या, क्षणोक्षणी नाकातून अनुनासिक उच्चरवात बाहेर पडलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन विद्रोहाच्या खर्‍या रंगाला, ढंगाला त्यातल्या हंटरबाजाला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय बिनदिक्कीतपणे नामदेव ढसाळांकडेच जाते.
आज नामदेव ढसाळांना लपून छपून शिव्या देणारे, त्यांचा पोकळ कारणे देउन भ्याड विरोध करणारे हे आपआपल्या मताच्या लोकांमध्ये मतप्रदर्शन करून मोकळे होतात. पण गोलपिठा सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या साहित्यकृतीच्या इंचभर उंचीची नवी निर्मिती करण्यास असमर्थ असतात. बाबासाहेबांनीच म्हटलेय, ज्याला समर्थन करता येत नाही तोच भ्याड विरोध करतो. कारण विरोध करण्यासाठी तात्विक, नैतिक आचरणासोबत नवनिर्माणाची धमक असावी लागते. तोच यथायोग्य विरोध करू शकतो. अन्य कोणी नाही.
नामदेव ढसाळांबद्दल माझे असलेले वैयक्तिक मत हे काही माझे त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आलेले नाही. किंवा मी की त्यांच्या वकिल देखील नाही. नामदेवाला आणि त्याच्या कवितेला, त्या कवितेतल्या अंगाराला, त्या अंगाराच्या धगधगीला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेबांबरोबर डोस्टोव्हस्की, मॉक्झिम गॉर्की, अॅरिस्टॉटल, विजय तेंडूलकर, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक अंजेल, संत तुकाराम, मायकोव्हस्की, शेक्सपिअर, बुकर टी वॉशिंग्टन, मार्टिन ल्युथर किंग सारख्या वैश्विक किर्तीच्या विचारवंताचा, लेखकांचा, साहित्यिकांचा आणि महामानवांचा प्रभाव आणि त्यांचे साहित्य समजून घ्यावे लागेल. नामदेव ढसाळांवर असलेली श्रद्धा ही बाबासाहेबांवर असलेल्या श्रद्धेइतकी थोर तर मुळीच नाही पण ती अंधश्रद्धा बिल्कूल नाही. माझ्या नामदेवासाठी माझे असेलेल वैयक्तिक मत हे अंतिम रुपाने हे वैचारिक मंथनातूनच आलेले आहे. एका खोल चिंतनातून आलेले आहे. आणि हो यावर कोणी आक्षेप घेउ शकत नाही.        
गोलपिठामधून किंवा एकूण समग्र साहित्यातून पिडीत, शोषित, दूर्लक्षित अवहेलित समाजाची जी व्यथा नामदेव ढसाळांनी मांडली, ती इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही तय्यार होणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा.
जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही.
जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात.
जिथे दिवस रात्री सुरू होतो.
ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर
"मनगटावरच्या चमेलीगजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक"
पदोपदी दिसतात.
जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात.
जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.
"येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
इथे माण्सालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"

                 अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून, अन्याय अत्याचार सहन करून हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले. लेखणी मशाल झाली, ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती. त्यामुळे तो ठणकावून म्हणतो

" जिवाचे नाव लवडा ठेवून जगणार्‍यांनी
खुशाल जगावे....
मी तसा जगणार नाही "

           या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या. त्या अगतिक झाल्या नाहीत, ज्वलंत झाल्या.

"मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला
शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो
इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो
बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात
आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत"

या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे. ती बेधडकपणे सांगते की

"तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी"

हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे.

"शेटसावकारांची आय झवून टाकावी
नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा
जेवणातून विष घालावे मूठ मारावी
रांडवाडे वाढवावेत: भाडखाव व्हावे"

पण ती पुढे म्हणते -

" नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये
नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

                 इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जाती पुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात.
त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. लहानपणापासून ते तारुण्याच्या उंबरठ्यावप पाउल पडेस्तोवर बेदर्दी हंगाम सोसलेल्यांना, हमनदस्ती पाटाळात, चान्या चिन्यूल्या, डिलबोळ, पावशेर डालडा झोकणार्‍यांच्या जगातल्या तरुणाला त्या भावल्या नाही तर नवलच.  पिढ्यानपिढ्या क्षयरोगानं मरणारा बाप,   राजेश खन्नाच्या पोस्टर कडे पाहत नाकाला झोंबणार्‍या स्वस्त अत्तराच्या दर्पात आयुष्याला रंगीत बनवण्याची स्वप्न पाहणार्‍या तरुणांना त्यांची गुलामगिरी जाणवून देउन एका महाप्रतिभावंतांची नवी क्रांतिकारी ओळख दिली तर त्यात चुकले कुठे ? नामदेवाच्या साहित्यातून ह्या सार्‍या घटना आणि त्याअनुषंगाने भळभळणार्‍या जखमा इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते आणि ती सच्ची असते म्हणून काळजाला भिडते. 

(प्रस्तूत लेख हा इंटरनेटवर ढसांळाबद्दल लिहीलेल्या अनेक लेखांचं एक छोटंसं संकलन आहे. त्यामुळे या लेखाची स्वतःची अशी मालकी कोणाकडेही नाही. स्त्रोत उपलब्ध असल्यास सुचवावे )

Tuesday, July 5, 2011

“Kamatipura”

 
Namdeo Dhasal, a young guy, Revolutionary thinker and The Poet of underworld. Born in 1949, Namdeo Dhasal is Maharashtra’s leading poet and the only Indian poet to have received a Lifetime Achievement Award from country’s apex literary institution, the Sahitya Akademi. He is the author of nine books of poetry.
Dhasal is a quintessentially Mumbai poet. Raw, raging, associative, almost carnal in its tactility, his poetry emerges from the underbelly of the city — it’s menacing, unplumbed netherworld. This is the world of pimps and smugglers, of crooks and petty politicians, of opium dens, brothels, and beleaguered urban tenements. In a recent article on Dhasal, I described his poetic world as that of “Mumbai without her make-up, her Botox, her power yoga; the Mumbai that seethes, unruly, menacing, yet vitally alive, beneath the glitzy mall and multiplex, the high-rise and flyover.




 
“Kamatipura”
 (Translation: Dilip Chitre)

The nocturnal porcupine reclines here
 Like an alluring grey bouquet
 Wearing the syphilitic sores of centuries
 Pushing the calendar away
 Forever lost in its own dreams

Man’s lost his speech
 His god’s a shitting skeleton
 Will this void ever find a voice, become a voice?

If you wish, keep an iron eye on it to watch
 If there’s a tear in it, freeze it and save it too
 Just looking at its alluring form, one goes berserk
 The porcupine wakes up with a start
 Attacks you with its sharp aroused bristles
 Wounds you all over, through and through
 As the night gets ready for its bridegroom, wounds begin to blossom
 Unending oceans of flowers roll out
 Peacocks continually dance and mate

This is hell
 This is a swirling vortex
 This is an ugly agony
 This is pain wearing a dancer’s anklets

Shed your skin, shed your skin from its very roots
 Skin yourself
 Let these poisoned everlasting wombs become disembodied.
 Let not this numbed ball of flesh sprout limbs
 Taste this
 Potassium cyanide!
 As you die at the infinitesimal fraction of a second,
 Write down the small ‘s’ that’s being forever lowered.

Here queue up they who want to taste
 Poison’s sweet or salt flavour
 Death gathers here, as do words,
 In just a minute, it will start pouring here.

O Kamatipura,
 Tucking all seasons under your armpit
 You squat in the mud here
 I go beyond all the pleasures and pains of whoring and wait
 For your lotus to bloom.
 — A lotus in the mud.

--  Namdeo Dhasal---

Sunday, July 3, 2011

या कवितेला स्वतःचं अस्तित्व असू दे

या कवितेला स्वतःचं अस्तित्व असू दे,जरी असलो आपण एकमेकांसाठी त्रयस्थ
हातातील प्राजक्ताची फुलं कोमेजू न देणार वय होत ते
ओठांचं थरथरनाऱ्या गुलाबांच्या पाकळ्यात रुपांतर होण्याचं वय होत ते
क्षितीजाने महासागर प्राशून टाकण्याचं वय होत ते
तरीही हा सारा अनुभव अस्पृश्याचाच राहिला
जे काही घडायला पाहिजे होत ते या जन्मातच
ज्या 'स्कूल' मधून मी आलो, त्याच्या सिलाबसमध्ये पुनर्जन्माला जागा नव्हती
ना तू ज्युलीयट होती, ना मी रोमिओ,तरीही आपण एका व्याकुळ प्रेमकथेतली पात्र होतो.
-- नामदेव ढसाळ

Friday, July 1, 2011

गोलपिठा व ढसाळ यांविषयी:विजय तेंडूलकर

नामदेव ढसाळ त्याच्या कवितासंग्रहाची बातमी सांगत आला तेंव्हा मला आनंद वाटला. कवितांचा मी व्यासंगी वाचक नाही. परंतु कविता समोर आली तर घाईने उलटतही नाही. ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काहीवेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या. तरीही त्यामागचे मन जाणवले होते. नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, ते तेंव्हा कळले. इतके प्रश्न मनात जमले की काही विचारणेच जमले नाही. ढसाळ थोडासा हसला, मी थोडासा हसलो. ढसाळचे हसणे मला जवळिकीचे वाटले नाही. असेही वाटले की ते जवळिकीचे का असावे? त्याच्या मनात माझ्या जगाविषयी एक आकसच असला पाहिजे. त्याच्या लेखी मी त्या जगाचा प्रतिनिधीच नव्हतो काय?
                नंतर काहीवेळा तो दिसत असे, पण हा माणूस आपल्याशी नीट बोलणार नाही असे माझ्या मनाने घेतले होते. ढसाळची कविताच त्याच्यापेक्षा मला जवळची होती. तिच्यातले अनेक शब्द, प्रतिमा न कळूनही ती मला अस्सल, कसदार आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. या कवितेशीच माझी प्रसंगाप्रसंगाने एका मर्यादेपर्यंत दोस्ती जमलेली होती. आणि ढसाळ एकदा माझ्याशी आपण होऊन बोलला.मला खूप बरे वाटले.
                या आश्चर्याला नंतर फार वाव उरलाच नाही. ढसाळ माझ्याकडे येऊ लागला, बसू लागला, हसू-बोलू लागला. इतके खोलवर वेदनेने आणि रागाने भरलेले काव्य लिहिणारा हा तरुण इतका प्रसन्न हसतो कसा, याचे मी नवल करी. असाच तो आला आणि हसत म्हणाला, 'माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.' त्याने फार प्रयत्न न करताच मी होकार दिला. आता आठवते की माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी आग्रहाने सांगितले पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते. तो म्हणाला, "तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही."
                कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार? केवळ एखादी गोष्ट आपल्याला समजते तशी आणि तेवढी आवडते हा काही तिच्यावरील आपला अधिकार ठरत नाही. जसजसा विचार करू लागलो तसतसा माझा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास आणखी कमी होऊ लागला. मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहित करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला 'सर' म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले. एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेषानरेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच. अज्ञानी मी होतो. चंद्रबिंदी म्हणजे काय, डोबरी म्हणजे काय, सादळलेली जडे म्हणजे काय, रांडकी पुनव कशी आणि कुठे असते, खैरबांडे पांजरपोळ डग्गा याचा अर्थ काय, धेडधाय पोटले कशाला म्हणावे, न.....नष्टचर्य असे एका कवितेत किंवा उजेड असे दुस-या एका कवितेत आवर्जून त्याने का लिहिले आहे, पाणचट गवशी कुठे असते, छप्पनटिकली बहुचकपणा नक्की कसा, मगरमच पलीत्यांचा अर्थ काय, कु. अनुराधा बुधाजी उपशाम कोण आणि कोठली, थम घेऊन म्हणजे काय करून, महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपड्या यात सांडणे शब्द कशाकरता, रायरंदी हाडूक कसे असते, खोडाबेडा हात म्हणजे कडे हात, बिंदाचिंदा हा कोठला शब्द, नेपाळी पोरी डावेउजवे कसे करतात, कंट्रीच्या मसाल्याची मलभोर मलय हे काय प्रकरण, पिंढ म्हणजे शरीराचा कोठला भाग, डिंगडांग धतींगचा शब्दार्थ काय, गुपची शिगा, डेडाळे, डल्ली,सल्ली, बोटी, गुडसे, डिलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात,- एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपने आणि अधिकाराने समजावले. समजावताना एकीकडे तो संकोचत होता(विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेह-यावर दिसत होता.
       परंतु अर्थ विचारताना आणखीनच घोटाळा होऊ लागला. ढसाळच्या जगाविषयीच्या माझ्या घोर अज्ञानाने मला आता पुरते घेरले. कित्येक गोष्टींचे आपणाला ज्ञान नसते. नव्हे, अज्ञानच असते. परंतु जोवर त्या गोष्टीविषयी जाहीररीत्या व ते देखील लेखी काही म्हणण्याचा सवाल येत नाही तोवर अज्ञानासकट आपण सुखात असतो. ढसाळने मला हसत हसत खिंडीतच गाठले होते. माझ्या अज्ञानाची मला (क्वचितच वाटू शकणारी) शरम वाटली. इतक्या जवळ जगणा-या या जगाविषयी आपण असे मख्ख असावे हे जाणवले आणि बोचू लागले. मी ढसाळला म्हणालो, "मला तुझे जग पाहायचे आहे." हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो. त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
       परंतु इतकेच. एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार? फार फार वर वर मी थोडेबहुत पहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवीत होते. ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती. ढसाळची कविता आजही मला पुरती समजली आहे असे मला वाटत नाही. पण ती मला जरा जास्त समजू लागली आहे आणि त्याहूनही जास्त आवडू लागली आहे. ढसाळच्या जगात उभे राहून त्याच्या कवितेत डोकावण्याचा प्रयत्न टाकून, मी आता ढसाळच्या कवितेच्या पुलावरून त्याचे जग समजावून घेऊ लागलो आहे. ह्या जगाच्या प्रत्यक्ष आणि ढसाळनेच घडवलेल्या ओझरत्या दर्शनाने या कामी मला चांगली मदत झाली आहे.
       पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी 'नो मॅन्स लँड'- निर्मनुष्य प्रदेश -जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, 'गोलपिठा' नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणा-या मनुष्यादेहाचे, असोशी वाहणा-या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणा-या तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिका-यांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणा-या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोप-यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला 'शरीफ' बनवण्याची महात्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणा-या क्षयरोगी बापाचे, हिजड्यांचे, हातभट्ट्यांचे, अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणा-या ऊन चिकट रक्तांचे, वाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे. १९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडी येणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणी त्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वाना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गि-हाइकाच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जीवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया-क्षमा-शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो, 'इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच-उफराट्या काळजाचा-असतो."
       हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणा-या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते. नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज.-कदाचित तसाच जगाला असता; परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीनदीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले, परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक विटंबना संपली नाही. कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखा फुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते. भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे, मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते. हागमूत, झवणं, लवडा, लेडाची गाडगी, जंतांच्या माळा यांचे नामदेव ढसाळ याच्या कवितेतले उल्लेख उपरे राहत नाहीत. त्याच्या सर्व कवितेमधून वाहणा-या खोलवरच्या संतप्ततेचे ते काव्यात्म उद्रेक बनतात आणि म्हणून कविताच वाटतात.
       अनेक अपरिचित बोली-शब्द या कवितांतून सहजपणे येतात. परिचित शब्दांचे अनोखे उपयोग होताना दिसतात. या सा-यात विलक्षण आत्मविश्वास जाणवतो. पांढरपेशा थराने दिमाखात जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो, निर्दयपणे तिची मोडतोड करतो अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचे बुद्ध्याच एक विद्रूप करतो. त्याच्या कवितेतील आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. हे करताना भाषेचे पारंपारिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजले आहे याचेही पुरावे तो मधूनच देतो. या अशा गंगाजमनी, विद्रूप, मोडक्यातोडक्या परंतु अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ त्याचे जगणे एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेते. या जगण्यातला असह्य दाह कवितारुप होतो. या जगण्यातल्या अदम्य संतापाचा उकळता लाव्हा सुस्थित , संभावित जगावर चौफेर भिरकावीत नामदेव ढसाळ याची कविता जेंव्हा 'रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना' हकारित, 'अंधारयात्रिक' होण्याचे नाकारीत, 'शहराशहराला आग लावण्या' चे पुकारे देत सुसाट निघते तेंव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणा-या ख-याखु-या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. या प्रकारचे जे कवी ढसाळ याने लिहिले आहे, ते चुकूनही प्रचारकी झालेले नाही हे विशेष. हि बंडखोरी आत्म्याची आहे; कंठाळी नाही. या बंडखोरीला -कवितेपुरते तरी-राजकीय रंग नाहीत, ती अधिक मूलभूत स्वरूपाची आणि म्हणून अस्सल आहे. 'स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे', 'पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ठ' , असे म्हणण्याचा छातीठोक निर्भयपणा तिच्यात आहे. 'गोलपिठ्या'च्या गल्लीबोळांतून मशाली पेटवून हिंडणा-या 'महाग्यानी' लोकांना उद्देशून, 'ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार काळात नाही त्यांनी पेटलेल्या माणसांना छप्पन टिकली बहुचकपणा अजूनही दाखवावा?' असे ती न कचरता म्हणू शकते. 'व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावेत, साहित्यसंघ, शाळा, कॉलेजे, हॉस्पिटले, विमानअड्डे यांवर हातबॉम्ब, हैड्रोजनबॉम्ब टाकावेत.', असे घोषित करण्याइतकी ती निर्णायक आहे. तडजोडीचे सर्व पूल तिने केंव्हाच उडवले आहेत आणि प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा तिने उचलला आहे. कवी ढसाळ याच्या कवितेला निकाली झुंजीचा जसा काही ध्यास लागून राहिला आहे. या ध्यासातली तिच्यात व्यक्त होणारी क्षणिक उदासीनतादेखील मरगळलेली नाही; तो बलदंड प्रज्ञेचा क्षणिक शीण भासतो. तो पराभव नव्हे; ती युद्धतहकुबी असते. या कायम युद्धमान कवितेतला शृंगार, तिच्यातला वियोग, तिच्यातील तात्कालिक वैफल्य, तिच्यातील तसलेच वैराग्य किंवा तिच्यातले गा-हाणे, या सा-याला बंडखोर गरम रक्ताचा जो स्पर्श आहे तो मला तरी फार लोभसवाणा वाटतो. समाजातील दडपून आलेल्या थरातून आलेला ढसाळ हा काही पहिलाच कवी नव्हे. तो या थरातील पहिलाच गुणी कवी देखील नाही. परंतु मराठी कवितेच्या परंपरेचा काही वारसा घेऊनही तिच्यातले अर्वाचीन पांढरपेशे मन आपल्या कवितेत सरकू न देणारा, आपल्या कवितेचा पिंड अंतर्बाह्य आपल्या जगाशी पक्का बांधला ठेवलेला आणि या प्रयत्नात कोठेही खोटा, प्रचारकी वा कंठाळी न होणारा ढसाळ हा विरळा दलित कवी मात्र नक्कीच आहे. अद्याप तरी त्याला हे जमले आहे. त्याच्या कवितेने मला अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगाची आठवण मला दिली असे मी म्हटले तर त्यात मी ढसाळची औपचारिक स्तुती करतो असे कोणी मानू नये. तुकारामाचा अध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसह ढसाळची कविता वागवताना मला भासते.
       कवी ढसाळचा भविष्यकाळ कसा असेल ते मला माहित नाही. त्याच्या सामाजिक थरातून मोठा दिलासा देत पुढे आलेले लेखक, कवी पाहता पाहता चुकीच्या अर्थाने पांढरपेशे, शब्दाळ किंवा रोमँटिक झालेले मी पहिले आहेत. त्यांच्या निर्मितीने आत्माच गमावला आणि ती निष्प्रभ बनली, जुन्या कीर्तीवर मिरवत राहिली. ढसाळ याचे असे न होवो.
'गोलपिठाया नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. हा काव्यसंग्रह मराठी साहित्यातला खर्‍या अर्थाने ठरलेला माईलस्टोन आहे. एकुण साहित्य जगतातील सारस्वतीय नियमांना सुरूंग लावण्याचे काम या काव्यसंग्रहाने केले. एकदा वाचाच .. आपसुक तोंडातून लव यू ढसाळ आल्याशिवाय राहत नाही.

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons