Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Sunday, January 22, 2012

उद्दिष्टापासून ढळलेला रिपब्लिकन पक्ष


वैभव छाया

सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकणारा एक ताकदवर विरोधी राजकीय पक्ष असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. परंतू सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे. सर्वाना सामावून घेण्यासाठी निर्मिलेल्या पक्षाचेच आज ४४ गट पडलेले आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एका दशकभरानंतर उदयाला आलेला रिपब्लिकन पक्ष मात्र आजच्या घडीला राजकारणातील आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते स्थान किंवा अस्तित्व त्यांना परत मिळेलच याची आशा फार धूसर होत चालली आहे. सध्या रिपब्लिकन चळवळींवर विचारांची घुसळण जोरदारपणे चालू आहे. काही अतिहुशार स्वघोषित विचारवंत सोशल नेटवìकग वेबसाइट्सवर रिपब्लिकन पक्षांवर वाटेल ती टीका करण्यात धन्यता मानत आहेत. वेगवेगळ्या ग्रुप्सवर टाकलेल्या पोस्टवर हजारो कमेंट्सने फेसबुकचे रकानेच्या रकाने भरून निघत आहेत. त्या साऱ्या चर्चेवरून रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन चळवळ आजच्या पिढीला नीटसा कळला नसल्याचेच दिसून येते आहे. या साऱ्या चर्चामध्ये पक्षाची उत्पत्ती व व्यूत्पत्ती, त्याची संकल्पना, तत्त्वज्ञान, बाबासाहेबांनी जनतेस उद्देशून लिहिलेले खुले पत्र याबद्दल नेहमीच उदासीनता बाळगलेली दिसते. अध्र्या हळकुंडात पिवळे होउन फेसबुकचा वेबस्पेस वाढविणाऱ्या त्या साऱ्या बोरूबहाद्दरांसाठी खास रिपब्लिकन पक्षाच्या तत्वप्रणालीवर टाकलेली ही नजर. .

         संसदीय राजकारणावर व समताधिष्ठित राजकीय तत्वज्ञानावर उच्चतम विश्वास असणारा रिपब्लिकन पक्ष सध्या राजकीय अडचणीतून बाहेर येण्याचा जोरदार प्रयत्न करतोय. तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रखर विरोधी पक्ष असावा म्हणून आचार्य अत्रे
, एस. एम. जोशी, कॉ. डांगे, डॉ. लोहीयांसारख्या समाजवादी नेत्यांना सोबत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. बाबासाहेबांनी याकरिता भारतीय जनतेला एक खुले पत्र देखील लिहिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. या लोकसत्ताक विचारसरणीवर उभ्या राहिलेल्या पक्षाच्या निर्मितीमागील बाबासाहेबांची व्यापक भूमिका व इतिहास समजून घेतल्याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे खरे महत्त्व कळणे अशक्य आहे. 

भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ साली प्रथमच घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेस पक्षाने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ४८९ जागांपकी ३६४ जागांवर विजय संपादन करत बहुमताचे सरकार स्थापन केले. १८८५ साली काँग्रेस पक्ष हा परकिय सत्तेविरोधात यल्गार पुकारून देशात स्वातंत्र्य निर्मितीचे ध्येय घेउन स्थापन झाला होता. १९४७ साली साध्य प्रत्यक्षात सिद्ध होताच गांधीजीनी काँग्रेसला बरखास्त करण्याचा सल्ला देखील दिला होता. पण तो सल्ला मानला गेला नाही. अशा वेळी लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकणारा एक ताकदवर विरोधी राजकीय पक्ष असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना सर्वासमोर मांडली. ही संकल्पना मांडताना १९५४ पर्यंतच्या राजकारणाचा र्सवकष अभ्यास, शेल्ड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा इतिहास व भविष्यातील आव्हानांचा आढावा घेऊनच रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती.
बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची आखणी करताना फार मोठी दूरदृष्टी ठेवली होती. सर्वसमावेशक राजकारणासाठी सर्वाना सामावून घेता येणारा एक प्रबळ राजकीय विचारमंच त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यामातून लोकांना द्यायचा होता. परंतु, सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे.
१९५१-१९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकात देशभरातील एकूण ५४ विविध प्रांतीय व राष्ट्रीय पक्षांनी सहभाग घेतला होता. त्यात काँग्रेसव्यतिरिक्त कोणालाही वाखाणण्याजोगे यश मिळाले नव्हते. दरम्यानच्या काळात बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते. सोबत सर्वसमावेशक अशा नव्या राजकीय पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. यासंदर्भात १० डिसेंबर १९५५ रोजी जनता पाक्षिकात बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक होती. ते म्हणाले की,

‘‘माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढण्याचा विचार आहे. भारतीय राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबविण्यासाठी हा पक्ष काढण्यात येणार असून पक्षाचे मुख्य ध्येय समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव असे राहणार आहे. भारतातील सत्ताधारी काँग्रेसला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान पक्षांचे या नवीन पक्षांत एकत्रीकरण करण्यात येईल आणि अमेरिकन धर्तीवर हा पक्ष कार्य करीत राहील. भारतातील व्यापारी वर्गाने अमेरिकेतील व्यापारी वर्गाप्रमाणे सत्ताधारी व विरोधी पक्षास सहकार्य केल्यास दोन्ही पक्ष मजबूत पायांवर काम करू शकतील व त्यामुळे लोकशाहीच्या निरोगी वाढीस मोठा हातभार लागू शकेल.
लहानसहान पक्षांजवळचे मामुली निधी, कार्यकर्त्यांची वानवा, या गोष्टी लक्षात घेता सध्याच्या राजकीय वातावरणात अशा पक्षांना बिलकूल भविष्यकाळ नाही. सरकारने व देशभक्तांनी अमेरिकेप्रमाणेच काँग्रेस व रिपब्लिकन पक्षांच्या वाढीस प्रोत्साहन द्यावे. उदाहरणादखल घ्यायचे झाल्यास, गेल्या निवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला काही हजार रुपये ही खर्च करता आले नाही. या उलट काँग्रेस पक्षाने कास्ट फेडरेशनचा पराभव करण्यासाठी अमाप पसा खर्च केला. ’’

वरील प्रतिक्रियेतून सहज लक्षात येण्यासारखी एक गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची आखणी करताना फार मोठी दूरदृष्टी ठेवली होती. सर्वसमावेशक राजकारणासाठी सर्वाना सामावून घेता येणारा एक प्रबळ राजकीय विचारमंच त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यामातून लोकांना द्यायचा होता. परंतु, सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे. किंबहुना ते त्याचे सोंग घेत असावे. सर्वाना सामावून घेण्यासाठी निर्मिलेल्या पक्षाचेच आज ४४ गट पडलेले आहेत. एकेकाळी स्वाभिमानी रिपब्लिकन जनता अशी ओळख असणाऱ्या वर्गाला स्वार्थलोलुप नेतृत्वाने व त्यांच्या स्वसंस्थापित नेतृत्वगटाने व्होट बँकचा दर्जा मिळवून दिला. आणि एका प्रकारे राजकीय अध:पतानाला सुरूवात करून दिली.

बाबासाहेबांनी १३ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते की, धर्मातरानंतर कदाचित शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष अस्तित्वात राहणार नाही. मात्र धर्मातरानंतर मी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा सदस्य राहणार नसून लवकरच रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात येईल. मी त्या पक्षाची घटनाही तयार केली आहे. त्याच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन प्रमुख तत्वांवर हा पक्ष आधारलेला राहील. पार्लमेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची कसोटी या तीन निकषांवर पाहिली जाईल. या पक्षाला स्वत:चे असे तत्वज्ञान असेल.

कोणत्याही राजकीय पक्षाला तत्वज्ञानाएवढेच एखाद्या कणखर नेत्याची आवश्यकता असते, हे बाबासाहेबांनी निक्षून संगितले होते. एका प्रबळ राजकीय पक्षाच्या निर्मितासाठी आणि त्याच्या सशक्त वाढीसाठी लागणारे सारे आवश्यक घटक भारतीय जनतेस रिपब्लिकन पक्षात सामील होण्यासाठी लिहिलेल्या खुल्या पत्रात उद्धृत केले आहेत. खुले पत्र केवळ एक पत्र नसून एक भक्कम विचारसरणी आहे. रिपब्लिकन पक्षाची मुहूर्तमेढ याच विचारसरणीवर व त्यातील तत्वज्ञानावर आधारित आहे. हे तत्वज्ञान काळानुरूप स्वत:मध्ये बदल घडवणारे असून जगातील कोणत्याही राष्ट्रात लोकशाहीची स्थापना व तिच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. जगातील वैफल्यग्रस्त राष्ट्रांत रक्तहीन क्रांती घडवून आणण्यासाठी तिची क्षमता अत्यंत प्रभावी आहे. त्यांचे विश्लेषण पुढील काही मुद्दयांच्या आधारे करता येऊ शकेल.
विसाव्या शतकात जातीव्यवस्थेने हळूहळू आíथक व्यवस्थेचे स्वरूप प्राप्त केले होते ज्यात लोकशाहीवादी राष्ट्र असूनही मूठभरांनी बहुसंख्यांकांवर आजन्म वर्चस्व गाजविण्याचे जन्मसिद्ध अधिकार मिळविल्याचे प्रतीत होत होते.
१. ही विचारधारा केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा पुरस्कार करून थांबत नाही तर कोणत्याही चळवळीचे राजकीय चळवळीत रुपांतर होताना कोणती स्थित्यंतरे होतात याची शास्त्रशुद्ध मांडणी करते.

२. लोकशाहीचा पुरस्कार करताना अधिकाअधिक संसदीय लोकशाहीचे महत्त्व व तीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पटवून देते.

३. लोकशाहीचे भविष्यातील बदलणारे स्वरूप, तिच्या उद्दिष्टांवर भाष्य करताना आधुनिक लोकशाहीचा पर्याय सुचविते. सोबत आधुनिक लोकशाही तिचे नेमके उद्दिष्ट आणि त्यांची योग्य व्याख्या हे खुले पत्र अतिशय नेटकेपणाने करते.

४. लोकशाहीच्या यशस्वी सिद्धीसाठी आवश्यक असणारे घटक :-
 विषमतारहित समाज
 विवेकबुद्धी बाळगणारा प्रखर संसदीय विरोधी पक्ष
 वैधानिक व कारभार विषयक क्षेत्रांत पाळावयाची समता
 संविधानात्मक नीतींचे कसोशीने व नतिकतेने करावयाचे पालन
 अल्पसंख्यकांची सुरक्षा
 राज्यशास्त्राधिष्ठित नीतीमान समाजव्यवस्थेची आवश्यकता
 विचारी, जागरूक, विवेकी जनमत

इतकी प्रभावी विचारप्रणाली आजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या घटनेमध्ये अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही. या खुल्या पत्रांचे विवेचन करताना तत्कालिन रिपब्लिकन नेते अॅ ड. बी. सी. कांबळे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्राचा संदेश भारताच्या कानाकोपऱ्यात आणि भारतीय लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत निकडीचे आहे. त्याचप्रमाणे, जणू हे खुले पत्र जगातील लोकांस उद्देशून आहे असे समजून, खुल्या पत्राचा संदेश राष्ट्रसंघापर्यंत व शक्यतो जगातील लोकांपर्यंत पोहोचवणे तितकेच निकडीचे आहे. कोणी हे कार्य करील तर ते जगाच्या धन्यवादाला पात्र होतील. कोणी हे करो वा न करो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणाऱ्या तमाम लोकांनी हे कार्य करण्यास पुढे यावे जगाचा व भारताचा बचाव रक्तपातापासून करावा.

बाबासाहेबांनी आपल्या भाषणात संदेश दिला होता, जा आपल्या घरातील भिंतीवर लिहून ठेवा की, मला या देशातील शासनकर्ती जमात व्हायचे आहे. बाबासाहेबांचा हा संदेश तर सर्वानी ऐकला. पण त्यासाठी करावी लागणी तपस्या, ती तपस्या यशोसिद्धीस नेण्यास करावी लागणारी प्रयत्नांची पराकाष्ठा, या सर्वावर ज्या र्सवकष विवेकबुद्धीने, वस्तूनिष्ठ दृष्टिकोनातून जे सखोल चिंतन व्हावयास हवे होते ते आजवर झालेले नाही. यासाठी सांप्रत ४४ गटां-तटांत विखुरला गेलेल्या व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जबाबदार धरावे का? की त्यांना कोणत्याही प्रकारचा जाब न विचारणाऱ्या अविवेकी जनमत बाळगणाऱ्या मतदारांना जबाबदार धरावे? या दोन प्रमुख प्रश्नांची कारणे आपणच शोधायला हवीत.

विसाव्या शतकात जातीव्यवस्थेने हळूहळू आíथक व्यवस्थेचे स्वरूप प्राप्त केले होते ज्यात लोकशाहीवादी राष्ट्र असूनही मूठभरांनी बहुसंख्यांकांवर आजन्म वर्चस्व गाजविण्याचे जन्मसिद्ध अधिकार मिळविल्याचे प्रतीत होत होते. बाबासाहेब कोणतेही सुधारणावादी आंदोलन उभारून त्याचा रेटा पुढे ओढत राहू शकले असते, पण त्यापेक्षा धर्मातराचे काँक्रिट सोल्यूशन जातीव्यवस्थेच्या फुटक्या िभतीवर लावले आणि विषमतारहित भारतीय समाजाच्या भक्कम पायाभरणीसाठी रक्तहीन समाजक्रांती घडवून आणली. भारतीय जनतेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पािठबा देण्यासाठी आवाहन करणाऱ्या खुल्या पत्राचा साकल्याने अभ्यास व्हावयास हवा. कारण समाजक्रांतीप्रमाणे बाबासाहेबांना राजकीय क्रांती देखील अपेक्षित होती. तिचा उगम व स्थापना ही रिपाईच्या माध्यमातून व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले होते. पक्ष कसा असावा त्यासाठी आवश्यक असलेल्या भूमिकेचा आणि तत्वज्ञानाचा, नतिकतेचा सबगोलंकारी परिप्रेक्ष्यातून अध्ययन करताना वैचरिक दिग्दर्शन आणि त्यासंबंधीची दूरदृष्टी याबाबतची डॉ. बाबासाहेबांची भूमिकाच आपल्याला या खुल्या पत्रातून पहायला मिळते.

१. चळवळीची व्याख्या कशी करावी, तिचे उद्दिष्टपूर्तीनंतर राजकीय पक्षात होणारे रूपांतर किंवा त्या चळवळीला राजकीय पक्षाचे कालौघात प्राप्त होणारे स्वरूप यातील स्थित्यंतरे व त्यांचे आधुनिक संसदीय लोकशाहीत असलेले महत्त्व अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे.

२. आधुनिक संसदीय लोकशाहीचा अभ्यास व त्यात सक्रिय सहभाग नोंदविताना लोकशाहीचे स्वरुप (Form of Democracy) आणि तिचे उद्दिष्ट (Purpose) हे काळाप्रमाणे बदलत आलेले आहे. म्हणूनच आजची लोकशाही ही आधुनिक लोकशाही बनली असून या लोकशाहीचे उद्दिष्ट हे अनियंत्रित राजसत्तेवर नियंत्रण घालणे नसून, ‘लोककल्याणसाधणे हे आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी लोकशाहीची दिलेली व्याख्या ही पुढीलप्रमाणे आहे. . लोकांच्या आíथक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविहीन मार्गानी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजचे लोकशाहीहोय.
आज रिपब्लिकन चळवळीचे राजकीय अंग जवळजवळ रसातळाला गेले आहे. विविध पक्षांत असलेल्या बुद्धीवादी लोकांना त्यांचा इष्ट सन्मान मिळत नाही आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे एका जातीपुरती किंवा एका विशिष्ट नेत्यापुरती मर्यादित करून चर्चिली जात आहे.

३. राजकारणात सत्ताधारी पक्षाएवढीच विरोधी पक्षाची आवश्यकता असते. सृजनशीन व विवेकी जनमताच्या अभावामुळे लोकशाही राबविण्यात अडचणी येतात. सरकार व कायदेमंडळाचे कामकाज योग्य रीतीने पार पडण्यासाठी लोकमत ओळखता येणे गरजेचे आहे. प्रचाराधिष्ठित सरकार व लोकशिक्षणाचा पाया घालणारे सरकार यात असलेला मूलभूत फरक स्पष्ट केला पाहीजे. कारण प्रचार हा कायम एकांगी असतो तर लोकशिक्षणाधारित सरकार सांगोपांग चच्रेतून येणारे र्सवकष समाधान असते. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळे एकपक्षीय हुकूमशाही टळण्यास मदत होते.

४. पक्ष हा सन्यासारखा असतो. सरसेनापतीसारखा पुढारी (नेता), संघटना, सभासद, मुलभूत योजना शिस्त, पक्षाचे कार्यक्रम, राजकीय डावपेच व मुत्सुद्देगिरी या गोष्टींचा समावेश यात होतो.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -ध्येय व उद्दिष्टय़े

भारतीय घटनेची प्रस्तावना पुढीलप्रमाणे आहे-
आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, íथक व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य; संधी व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रऐक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू.
भारतीय घटनेच्या या प्रस्तावनेतील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व साध्य करणे हेच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट राहील.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सार्वजनिक व्यवहारात खालील तत्वांना बांधलेला राहील,

१) सर्व भारतीयांना समान न्याय मिळेल; एवढेच नव्हे तर समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे असे मानण्यात येईल. आणि यानुसार जेथे समता नाही तेथे ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथे ती नाकारण्यात येते, तेथे ती राबविण्यासाठी लढा देईल.

२) प्रत्येक व्यक्तीचे सुख हा केंद्रिबदू समजण्यात येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्तीस समान संधी मिळेल. शासन संस्था ही, हे ध्येय मिळविण्यासाठी वापरावयाचे साधन होय.

३) इतर देश बांधवांच्या हक्कांचे व शासन संस्थेच्या आवश्यक तेवढय़ा अधिकारांचे संरक्षण करून प्रत्येक नागरिकांस धार्मिक,íथक,राजकीय स्वातंत्र्य असले पाहिजे असे हा पक्ष मानील.

४) प्रत्येक भारतीय नागरिकांस समान संधीचा अधिकार असल्याचे हा पक्ष मान्य करील. अर्थात, ज्यांना आत्मोन्नतीसाठी कधीच संधी मिळालेली नसेल त्यांना संधी मिळालेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याचे तत्व पक्ष अंगीकारेल.

५) प्रत्येक व्यक्तीस जीवनातील गरजा व भीती यापासून मुक्ती मिळवून देण्याच्या शासन संस्थेच्या कर्तव्याची जाणीव सरकारला हा पक्ष सातत्याने देईल.

६) हा पक्ष स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रह धरील आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाची, किंवा एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून होणारी पिळवणूक व दडपशाही यांना पायबंद घालील.

७) व्यक्ती व समाज या दोहोंच्या भल्याच्या दृष्टीने संसदीय राज्यपद्धती ही सर्वोत्तम राज्यपद्धती आहे अशी या पक्षाची श्रद्धा राहील.

आज रिपब्लिकन चळवळीचे राजकीय अंग जवळजवळ रसातळाला गेले आहे. विविध पक्षांत असलेल्या बुद्धीवादी लोकांना त्यांचा इष्ट सन्मान मिळत नाही आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे एका जातीपुरती किंवा एका विशिष्ट नेत्यापुरती मर्यादित करून चर्चिली जात आहे. त्या सर्वानी उपरोल्लिखीत मुद्यांचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. अशा बलदंड राजकीय, सामाजिक व आíथक परिप्रेक्ष्यातून परजलेल्या तत्वज्ञानावर रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्याचा मानस बाबासाहेबांचा होता. अशा बांधणीचा, विचारसरणीचा, तत्वज्ञान जोपासणारा पक्ष राष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेसाठी कायम हितकारी राहील याचा त्यांना विश्वास होता. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी पक्षाची स्थापना झाली. आणि पाहता पाहता १९५७ सालच्या निवडणुकांत देशातील क्रंमांक चारचा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास देखील आला. हे अभूतपूर्व यश पाहण्यासाठी मात्र बाबासाहेब हयात नव्हते.
lokprabha@expressindia.com

http://www.lokprabha.com/20120106/tatvataha.htm

Tuesday, November 8, 2011

नामांतराच्या जखमा... आणि विद्यापीठ प्रवेशद्वाराची चाळीशी






वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात. वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दूर्लक्षित जीवन. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. जगात सगळ्यात जास्त गाजलेलं नाव. तेथील विद्यादानाच्या अद्भूत पद्धतीमुळे नव्हे तर.. मानवी अधिकारा मिळवण्यासाठई झालेल्या संघर्षामुळे. विद्यापीठाचे नाव समोर आले की चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या परिवर्तनाच्या लढ्याचे ! विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचे. ह्या लढ्याने काय मिळालं हा वादातीत विषय आहे आणि राहील देखील. पण नामांतराच्या चळवळीनं आमच्याकडून जे हिरावून घेतलं ते कधीच परत मिळणारं नव्हतं. आज त्याच विद्यापीठाच्या या महाकाय प्रवेशदग्वाराच्या वास्तूला ४० वर्षे पूर्ण झालीत. त्या नामांतराच्या एकुण चळवळीवर आणि त्याच्या परिणामांवर ह्या चाळीशीच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश..


      
 

     सत्तरच्या दशकात महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह पूर्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने तमाम आंबेडकरी संघटनांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशा प्रकारच ठराव देखील मंजूर केला गेला. एव्हाना पँथर देखील फाटाफुटीला बळी पडली होती. या फाटाफुटीमुळे राज्यभरातील पँथर्स मध्ये खदखदणार्‍या अंसोताषाला प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद मस्के, कमलेश यादव, उमाकांत रणधीर, मारुती सोनवणे, डी.एम. गायकवाड सारख्या खमक्या तरुणांनी वाचा फोडली. या सर्व तरुणांनी एकत्र येवून औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सभेत पँथर ला पुन्हा एकदा जीवदान मिळवून दिले. त्यावेळी झालेल्या बैठकीत पँथरची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर हाच मुख्य अजेंडा असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि पुलोद प्रयोगाचे प्रणेते असेलेले शरद पवार यांच्याकडे तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. पण त्याला योग्य तो प्रस्ताव न मिळाल्याने संतापलेल्या पँथर्सनी मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. नामांतर मोर्चास महाराष्ट्रातील  खेड्यापांड्यातून लाखोंच्या संख्येने पँथर सहभागी झाले होते. त्या पँथरच्या ताकदीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधीमंडळात संम्मत करताच त्याच रात्री मराठवाडा पेटला. मराठवाड्यातील हिंदू धर्मीय सनातनी जातीयवादी गावगुंडांचा पोटशुळ उठला व त्यांच्या तरुण मुलांना भडकाऊन देऊन महारवाडे पेटवा, त्यांची घरे जाळा, त्यांना बेदम मारा, त्यांच्या लहान मुलांना व महिलांनाही झोडपा असे आदेश देऊन भयानक दंगल ह्या जातीवादी औलादींनी घडवली. ही दंगल भयानक व अतिशय क्रर होती.

     
    
दंगलीत जातियवादी गावगुंडाना दलित पँथरनेही जेरीस आणुन, तरुण पँथर त्याचा मुकाबला करुन रात्रंदिवस लढत होते. जातीयवादी वृत्तीचे सनातनी कट्टर हिंदत्ववादी औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ याने लोकांना भडकविण्याचे व दलित वस्त्यांचा नायनाट करुन त्यांना बेचिराख करावे म्हणून नामांतर विरोधी कृती समितीचे गुंड पाच जिह्यांतील खेड्यापाड्यांतील दलित वस्त्यांवर जाऊन रात्री पेट्रोलचे जळते गोळे फेकून घरांना व झोपड्यांना आगी लावत असे. त्याचवेळी नामांतरवादी कृती समितीमध्ये कॉलेजचे तरुण आणि पँथर्स जश्यास तसे उत्तर देत असत. जवळ जवळ महिनाभर ही दंगल चाल होती. पोलीस अनेकदा हिंदूचीच बाजू घेत असत.दलित समाज अल्पसंख्याक असून देखील महिलाही लढतांना अग्रभागी राहून दलित पँथरच्या तरुणांना अन्यायाविरुध्द लढण्याचे बळ देत होत्या.



     भिमा कोरेगांव येथील महार बटालियनने पेशव्यांना पळवून लावून त्यांना पराभूत केले. त्याच सामर्थ्याने मराठवाड्यातील दलितांनी दंगलखोर, जातीयवादी गावगुंडांशी मुकाबला  केला. उदगीर, जळपोट, नांदेड या शहरात व तेथील खेड्यापाड्यांतील दलितांवर अतिशय अन्याय , अत्याचार केले गेले. पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल करुन ठार मारले. ते इतके भयानक होते की २०० लोकांच्या जमावाने पोचीराम कांबळेला पकडून त्यांचा अमानुष छळ करुन पहिला त्यांचा हात काढण्यात आला व गावगुंड पोचीरामला मारत मारत म्हणायचे, `` सांग पोच्या तू जयभिम करणार का''  पोचिरामला इतक्या वेदना होत असतानाही म्हणाला, `` जयभिम म्हणणार''.  नंतर दुसरा हात काढला दोन हात काढल्यानंतर एक पाय काढला तरी पोचीराम चिडून `जयभिम'  म्हणून ओरडायचा नंतर दुसराही तोडला तेंव्हा पोचीरामचे रक्त सांडलेले होते.पोचीरामचे दोन हात व दोन पाय मराठवाड्यातील हैवानांनी तोडले होते. तेवढ्यातही पोचीराम जयभिम म्हणत होता, पोचिराम याचे फक्त तोंड राहिले होते. त्यांनी बजावले, ``पोच्या, आता तुझे फक्त मुंडके राहिले आहे. सांग जयभिम करणार का? जयभिम'' म्हणून बोलत असतांना त्या हरामखोरांनी तलवारीने मान छाटताच जयभिम हा शेवटचा नारा बोलला. सर्व रक्त जातीयवादी गुंडांच्या अंगावर उडून पोचीरामच्या रक्ताने अनेक पँथर निर्माण झाले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील टेंभुर्णी ह्या गावी पशुलाही लाज वाटेल असा प्रकार केला होता. जनार्दन मेवाडे यांनाही हाल हाल करुन ठार केले होते.असे असतानाही मराठवाड्यातील नामांतराबाबतची दंगल पत्रकारांना लिहूदेखील वाटत नव्हती. दंगलग्रस्त भागात मुंबईतून दलित पँथरचे नेते प्रा.अरुण कांबळे, रामदास आठवले आले, तेव्हा वातावरणात पँथर काय करतील हे सांगता येत नव्हते.सर्व लोकांना ह्या नेत्यांनी शांतता ठेवण्यात यावी असे सांगितले.



प्रा.अरुण कांबळे म्हणाले,
`` सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची
संपली नाही लढाई नामांतराच्या लढ्याची''



       ह्या गंभीर परिस्थितीमुळे पँथरला शासन घाबरुन राहत होते.गंगाधर गाडे यांच्या अटकेमुळे सर्व पँथर चळवळीचा भार तरणाबांड बिबळ्या वाघ रामदास आठवलेंवर पडला. रामदासच्या अंगात पँथर संचारला होता.रामदास आठवलेंना मुंबईत घरदार नव्हते, सिध्दार्थ हॉस्टेल रु.नं. ५० हे त्यांचे निवासस्थान व राज्याचे पँथर कार्यालय होते.रामदास आठवलेंचे लग्न झाले नव्हते.तरणाबांड बिबळ्या वाघाच्या ढांगा खेड्यापाड्यात पँथर तयार करण्यास जात होत्या.रिपाइंचे ऐक्य टिकले नाही रामदास कॅबिनेट मंत्री झाले शरद पवार यांनी आठवलेंची ताकद ओळखून १७ वर्षे सत्तेत घेतले.मंत्री असतांना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री शरद पवार यांना विश्वासात घेऊन १४ वर्षांचा दलितांच्या अस्मितेचा नामांतराचा प्रश्न आता तरी सोडविण्याचे साकडे घातले. १४ जानेवारी दिवस निवडला आणि राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे वरिष्ठांना आदेश दिले. पोलिस पाटील व सरपंचांची बैठक `सह्याद्रीवर' बोलविली व तेथे सांगितले की एकाही दलिताचे घर जळताना दिसले नाही पाहिजे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक गावच्या पोलीस पाटील व सरपंचावर असणार विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मंजुर करताच संपुर्ण दलित वस्त्यांत दिवाळी साजरी झाली.




     दरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळीभाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते.. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेटपुढे नतमस्तक होतात..एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते.. विद्यापीठ प्रशासनालाही गेटच्या ४
0 व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे? वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिनानिमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो तेव्हा. चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव!


या गेटच्या उभारणीचा इतिहासही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा आजही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. यासंदर्भात ते सांगतात की, डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवीदान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभापूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एकाही वास्तूविशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोडबेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तूद्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्पही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत.

      
    जोपर्यंत हे विद्यापीठ आहे तोवर त्याचे प्रवेशद्वार आहे. हेच प्रवेशद्वार आमच्यासारख्याना आणि आमच्यानंतर येणार्‍या कैक पिढ्यांना त्या जुलूमाची, त्या अत्याचाराची, त्या त्यागाची, शौर्याची आणि झुंजार लढ्याची आठवण करून देत राहील. त्यातूनच नवे चैतन्य कायम संचारत राहील. नामांतर लढ्याची आठवण आंबेडकरी समाजाला सदैव स्फूर्ती देत राहो.

प्रस्तूत लेख हा दै महानायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात अर्जूनराव  कदम यांनी लिहलेल्या लेखाला व विजय सरवदे यांच्या लेखाला संकलित करून येथे टाकताना मी सुद्धा त्यात माझे योग्य योगदान टाकले  आहे. लेखकाला त्याच्या लेखनाचा मालकी हक्क मिळायलाच हवा परंतू  हा लेख म्हणजे आंबेडकरी चळवळीची मालमत्ता असल्याने तो मी कदम साहेबांना न विचारता जरी टाकला तरी ते कोणतीही हरकत घेणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.

लेखकः- अर्जूनराव  कदम
लेखकः- विजय सरवदे
संकलकः- वैभव छाया

सप्रेम जय भीम ....

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons