Wednesday, June 22, 2011

आरक्षण भाग- १०

मिडीया आणि आरक्षण विरोध
गुटखा विकणार्‍या (आणि जळालेल्या) युवकाला बळजबरी आंदोलनकारी बनविले.
                    मागील अंकात महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये दि. २८ मे २००६ रोजी प्रसिद्ध झालेले मुख्य बातम्यांचे मथळे आणि आत्ता दिलेला मथळा हा एक प्रातिनिधिक स्वरुपात आपण घेऊयात (बातमी क्र. १,२,३,४,५). वास्तविकता त्या यादीत सर्वच वृत्तपत्रांचा समावेश नाही आहे. जर बारकाईने आपण त्या मथळावजा शीर्षकांचे नीट नीरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येईल की, द हिंदू,  इंडियन एक्सप्रेस और इकॉनोमिक टाइम्स  सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रांनी दिल्लीतील रामलीला मैदान किंवा कटक मधील कथित आत्मदहनाला महत्त्व न देता प्रस्तूत आंदोलनासंदर्भात तत्कालीन सरकारने केलेल्या घोषणेला महत्त्व देणे पसंत केले. (वैद्यकीय अभ्यासक्रम चालविण्यात येणार्‍या उच्च शिक्षा संस्थानामध्ये जागा वाढविण्यासंदर्भातील घोषणा).
                  एक्सप्रेस न्यूजलाईनच्या शीर्षकात आत्मदहना वर सरळ भाष्य असून इतर सर्व ठिकाणी आत्मदहनाचा विषय किंवा त्यासंबंधीची बातमी आली आहे. दैनिक हिंदूस्तान  नावाच्या दैनिकाने दिल्लीतल्या युवकाच्या जळण्याच्या घटनेला पूर्णतः वेगळा मुद्दा जरी मानला असला तरी कटक मधील घटनेला त्यांनी या आंदोलनाशी जोडून पाहीले आहे. मुळात जो युवक जळाला गेला त्याच्याबद्दल कोणालाही काही पूर्ण अशी माहीती मिळाली नाही. काहींनी त्याला एक सामान्य आंदोलनकारी असावा असे सांगितले तर काही वृत्तपत्रांनी त्याला एकदम विद्यार्थी ठरवून टाकले तर काही पत्रकारांनी त्याला आरक्षणाचा जहाल विरोधक असेही म्हणून टाकले. पण ज्या वृत्तपत्राने त्या युवकाला गुटखा विकणारा युवक म्हंटले आहे त्याच्या जळण्याच्या घटनेला आरक्षण विरोधाशी जुळवूनच बातमी सादर केलेली आहे.
शीर्षक जागच्या जागी पण बातमी मात्र गायब ---
PCI (Press Council of India) प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया ने दिलेल्या दिशानिर्देशनांनुसार जे घटक बातमीशी कोणत्याही प्रकारचे नाते सांगत नाही किंवा ठेवत नाही त्या घटकांना बातमीच्या मथळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्थान असता कामा नये. असे वर्तन हे पत्रकार आणि पत्रकारिता दोघांनाही आपआपले नैतिक अधिकार आणि पावित्र्य शाबूत ठेवण्यासाठीचे दिलेल्या सुचना आहेत. परंतू वरिल सर्व बातम्यांमध्ये या सुचनेकडे सरळसरळ डोळेझाक केलेली आहे. दिल्ली येथीन ऋषी गुप्ता नामक युवकाचे आंदोलनादरम्यान  जळणे, ह्या घटनेला आत्मदहनाचे दिले गेलेले स्वरुप, मंडल वन ची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांद्वारे आत्मदहनाने तीव्र विरोध असे म्हटले गेले.. बघूयात वृत्तपत्रे स्वतंत्रपणे काय म्हणतायेत...
1.       टाइम्स ऑफ इंडिया ने डीसीपी, सेंट्रल नीरज ठाकुर यांचा संदर्भ देताना, त्या युवकाने असे का केले याचा अजूनतरी पत्ता लागलेला नाही. ऋषि गुप्ता हा मुळचा बिहार राज्याचा रहिवासी, पाच वर्षांपूर्वी (२००१) तो १२ वी ची परिक्षा बिहारमधूनच उत्तीर्ण झाला होता. आणि दिल्लीतच गुटखा विकण्याचे काम करत होता. त्याच दिवशीच्या आवृत्तीतील पान क्रं ७ वर अजून एक बातमी होती. त्या बातमीचा मथळा होता --Agitators say they were not aware of immolation plans.—ह्या बातमीमध्ये एलएनजेपी रुग्णालातील डॉ. नेहा (ज्या स्वतः युथ फॉर इक्वालिटी च्या सदस्या आहेत) यांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील ज्या मोर्च्यामध्ये ऋषी गुप्ता ने स्वतःला आग लावली तो त्यात सहभागी झालाच नव्हता. आणि तसेच तो युथ फॉर इक्वालिटीचा सदस्य देखील नाही. 

2.       स्टेट्समन मध्ये आलेले वृत्त--  स्टेट्समन ने डीसीपी, सेंट्रल नीरज ठाकुर यांचाच संदर्भ देताना, २३ वर्षीय ऋषि गुप्ता हा बिहार राज्याचा रहिवासी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील शहादरा परिसरात वास्तव्यास होता. सिगरेट गुटखा विकून आपला उदरनिर्वाद चालवायचा. रामलीला मैदानाबाहेरच असलेल्या गुरू नानक चौकात रॉकेल ओतून घेउन त्याने स्वतःला पेटवून घेतले. प्रत्यक्ष घटना घडतेवेळी त्या ठिकाणी पोलिस उपस्थित नव्हते. पण त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने स्टेट्समन दिलेल्या मुलाखतीनुसार केंद्रसरकारच्या आरक्षण प्रणाली विरोधात चालणार्‍या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऋषी गुप्ताने हे पाउल उचलले असावे, कारण त्याचे सुद्धा आरक्षणामुळेच नुकसान झाले असावे.

3.       हिंदुस्तान टाइम्स ने पहिल्या पानावर दिलेल्या शीर्षकात आत्मदनाच्या बातमीला जरी स्थान दिलेले नसले तरी बातमी मध्ये  शहादरातील २४ वर्षीय तरुण ऋषी गुप्ता याने रामलीला मैदानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी गुप्ताच्या आत्मदहनाचा आमच्या आंदोलनाशी कसलाही संबंध नाही. मौलाना आजाद मेडिकल कॉलेजच्या रेजिडेंट डॉक्टर्स एसोसिएशनचे सदस्य जितेंद्र सिंघला यांनी दिलेल्या माहीतीनुसार ऋषी गुप्ता एक तर आंदोलनात सहभागी नव्हता शिवाय त्याने स्वतःला आग का लावली याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत.

4.       द ट्रिब्यून ने लिहील्याप्रमाणे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या ऋषी रंजन नावाच्या विद्यार्थ्याने आंदोलन स्थळावरच स्वतःला पेटवून घेतले. त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला रोकण्याचा प्रयत्न देखील केला. (आत्ता या ठिकाणी लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे आत्मदहनाची घटना मैदानाबाहेर घडली तरी तीला मैदानातच घडल्याचे सांगण्यात आले. आणि दुसरे म्हणजे स्वतः डिसीपी नीरज ठाकूर यांनी दिलेल्या माहीतीनुसार आत्मदहनाच्या घटनेवेळी पोलिस त्या ठिकाणी हजर नव्हतेच. मग आत्ता नेमके कोणत्या वृत्तपत्रांना खरे मानायचे ते सांगा.)  

5.       द पायोनियर ने देखील डीसीपी नीरज ठाकुर यांचा संदर्भ देताना ऋषी गुप्ता हा गुटखा विकणारा विक्रेता होता. पण पायोनियर च्या म्हणण्यानुसार हा युवक आंदोलनात सहभागी होता. पण हे वृत्त छापताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा संदर्भ दिला नाही, दुसर्‍या बाजूला यूथ फॉर इक्वैलिटी आणि समांतर संघटना ऋषीच्या आंदोलनातील सहभागाला नाकारत होते.

6.       एशियन एज या वृत्तपत्राचा मथळा वाचताक्षणी वाचक ठरवून बसतो की, ऋषी गुप्ता जळीत प्रकरण हे पूर्णतः आरक्षण विरोधात उचलले गेलेले पाउल आहे. पण बातमी मध्ये पुन्हा तोच उल्लेख आलाय जो मुळात पूर्ण बातमीला चुकीचा ठरवतो, तो उल्लेख असा, एलएनजेपी रुग्णालातील डॉ. नेहा (ज्या स्वतः युथ फॉर इक्वालिटी च्या सदस्या आहेत) यांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील ज्या मोर्च्यामध्ये ऋषी गुप्ता ने स्वतःला आग लावली तो त्यात सहभागी झालाच नव्हता. आणि तसेच तो युथ फॉर इक्वालिटीचा सदस्य देखील नाही.

(क्रमशः)

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons