Friday, May 27, 2011

आरक्षण भाग - ३

आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करताना याआधी मी दोन भाग लिहिले आहेत. त्या दोन भागांमध्ये आरक्षणाचा इतिहास आणि मंडल आयोगाची जडणघडण आणि त्याची इतिवृत्तांत अगदी सविस्तरपणे, कोणत्याही प्रकारची बायस सायकॉलजी न ठेवता, त्रयस्थ नजरेने, तटस्थ भूमिकेतून मांडला आहे. परंतू आत्ता या ठिकाणी भारतातील एकुण आरक्षण प्रणाली कशी व ती त्या पद्धतीची का आहे यावर भाष्य करण्याची वेळ आली आहे.
१८५७ च्या सैनिकी उठावानंतर जवळपास अख्खा भारतीय उपखंड इंग्रजांच्या अंमलाखाली आला. पण तोपर्यंत भारत एक राष्ट्र म्हणून संकल्पना जन्माला आली नव्हती. ब्रिटीश भारतात आले. त्यांच्या व्यावहारीक सोयीकरता येथे शाळा स्थापन झाल्या इंग्रजी शिक्षण उपलब्ध झाले. दळणवळणाच्या सोयी निर्माण केल्या गेल्या. यातून महत्त्वाचे फलित समोर आले ते पाश्चात्य शिक्षण आणि मुल्यांची भारतीय समाजमनाला झालेली ओळख. आणि ह्यातूनच स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातला निश्चित असा फरक भारतीयांना कळला. आधुनिक जगातील स्वतंत्र राष्ट्र संकल्पना, स्वातंत्र्याचे महत्त्व, मानवाधिकार, लोकशाही आणि ती मिळवताना युरोपीय राष्ट्रे आणि अमेरिकन वसाहतींनी केलेला संघर्ष ब्रिटीश इंडियात एक राष्ट्र म्हणून निर्माण होण्यास हातभार लावला. आणि नंतर जे काही घडले तो इतिहास आहे. सलग शतकभराच्या निकराच्या लढ्यानंतर १९४७ साली जगाच्या नकाशावर भारत नावाच्या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. २६ जानेवारी १९५० रोजी सार्वभौमत्व प्राप्त झाले. पण यावेळी स्वातंत्र्यलढ्याशी समांतर अजून एक लढा अधिक त्वेषाने लढला जात होता, आणि तो म्हणजे सामाजिक न्यायाचा. एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठीचा, लढा अस्पृश्यतेविरुद्धचा.
अस्पृश्यतेविरोधातला एकुणच सामाजिक विषमतेविरोधातला हा समांतर लढा १८ व्या शतकातच सुरू झाला होता.  क्रांतीसूर्य जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेला लढा शाहू महाराजांनी पुढे चालवला. आणि बाबासाहेबांनी यालढ्याचे इप्सित ध्येय्य साध्य केले. भारतीय संविधानाचा पाया रचताना बाबासाहेबांनी माणुसकीला काळीमा फासणार्‍या विषमवृत्तीना कायद्याच्या चौकटीत बसवून बंद केले. बाबासाहेब जाणून होते की जोवर या देशातील सामाजिक विषमता हद्दपार होणार नाही तोवर या देशाचे स्वातंत्र्य चिरायू होणार नाही. भारतीय संविधानातील कलम १७ अन्वये कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळणे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. शतकानुशतके अस्पृश्यता आणि जातीयतेच्या काळ्याकुट्ट अंधाराखाली गाडल्या गेलेल्या जाती जमातींना पुन्हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर सक्षम करून समानता आणण्यासाठी आरक्षणाच्या मार्ग अवलंब केला गेला. या देशात आरक्षणाला कधीच सकारात्मक पद्धतीने पाहीले गेले नाही. परंतू आरक्षणाच्या माध्यमातून अपेक्षित असलेल्या समानतेचे तत्व हे देखील काही प्रमाणात पाश्चात्य विचारवंताकडून मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. यासाठी पुढील काही उदाहरणे फार बोलकी आहेत.
अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या लेखकांपैकी प्रमुख असलेले थॉमस जेफरसन यांनी प्रस्तूत जाहीरनाम्यात उद्धृत केलेले वाक्य पुरेसे बोलके आहे.
“We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.”
वरिल वाक्यातील unalienable Rights म्हणजेच निसर्गदत्त अधिकार आणि त्यांचे समप्रमाणातील वितरणाचा सिद्धांत हा १६ व्या शतकातच जन्माला आला होता. १६ व्या शतकातले थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि जॅक्वेस रुसो यांच्या लिखाणातून सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर केलेले महत्तवाचे भाष्य जगासमोर येउ लागले होते. समानतेच्या दृष्टीने मानवी मनाची होणारी प्रगती हळूहळू वेग धरू लागली होती. वरील त्रयींपैकी जॉन लॉक या इंग्लिश पॉलिटिकल फिलॉसॉफर ने आयुष्य जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि संप्पतीचा अधिकार हे निसर्गदत्त अधिकार असून प्रत्येकाला त्याचा आनंद उपभोगता यायला हवे असे प्रतिपादन केले. वरिल वाक्यातून राईट टू इक्वालिटी या संकल्पनेचा विशाल अर्थ आणि समानतेचा अधिकार आणि हक्क यातील पुसट रेषा तसेच त्यांची व्याख्या स्पष्ट होण्यास मदत होते. आणि म्हणूनच सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात असलेल्या राष्ट्राने त्या देशातील नागरिकांचा समानतेचा अधिकार पुरवण्याबरोबरच अंमलबजावणीवर ही भर द्यायला हवा.      
भारतीय संविधानातील प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत नमुद केले गेलेले महत्त्वाचे वाक्य
 सामाजिक
, आर्थिक आणि राजनैतिक न्याय
भारताच्या संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक, आर्थिक आणि राजनेतिक पातळींवरील समानता आणि त्यासंबंधीची न्यायप्रणाली लाभ भारतातील एकुण एका नागरिकापर्यंत पोहोचवायला हवी एवढा साधा सरळ अर्थ आहे. वरिल त्रयींमधील सामाजिक पातळीवरील समानता हा तसा अतिशय क्लिष्ट आणि वादातीत विषय राहिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर याबद्दलची व्याख्या आजपर्यंत योग्य अंगाने मांडली न गेल्याने तसा दुर्लक्षित राहीला गेलेला मुद्दा. त्यामळे आजपर्यंतचे सर्व वादविवाद हे केवळ आणि केवळ राजनैतिक आणि आर्थिक पातळीवरील असमानतेच्या भोवती चिकटून राहीले आहेत. राजकीय समानता मिळवून देण्यासाठी न्यायपालिका, संसद आणि प्रशासन व्यवस्था ह्या जबाबदार संस्था आहेत. आर्थिक समानता मिळवून देण्यासाठी सरकारने विविध योजनांच्या माध्यमांतून समाजातील आर्थिक मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणणे बंधनकारक आहे. या ठिकाणि विचार करण्याजोगी महत्त्वाची गोष्ट अशी की, भारतात एखाद्या घटकाचे सोशल स्टेटस हे त्याच्या इकॉनॉमिकल स्टेटस वरून ठरविण्याची जनमानसात रुजलेली पद्धत आहे. आणि यामुळेच मंडल आयोगाने इतर मागास जातींची नोंद करताना विविध कसोट्या ठरविल्या त्यात बहुतांश ह्या आर्थिक आधारावर होत्या. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर कायमच मागास राहील्या गेलेल्या मागासवर्गांना ओबीसी मध्ये सामावून घेण्यात आलं. तर कायम जात हा मुख्य दुवा धरून अमानवी छळाला बळी पडून आपले सामाजिक अस्तित्व नाकारले गेलेल्या अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण बहाल करण्यात आलं. वरिल वाक्यात आणि याआधी सुरूवातीला नमुद केलेल्या अनेक सिद्धांतांना अनुसरून जर नीट निरीक्षण केले तर बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण प्रणाली ही खुप फॉरवर्ड आणि शास्त्रशुद्ध असल्याचे जाणवते. आरक्षण देताना ज्या समुदायाचा जातीयवादामुळे उत्कर्ष होउ शकलेला नाही त्यांना जाती- आधारीत आरक्षण दिले गेलेले आहे. आजही भारतात जातीय अत्याचार कमी नाहीत. त्यांची दाहकता देखील कमी झालेली नाही. म्हणून जोवर अत्याचाराचा मुळ गाभा जातीयवाद राहणार तोवर त्या त्या समाजघटकांना देखील त्याच आधारावर प्रतिनिधित्व मिळायला हवे. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळवून देण्यासाठीचा आरक्षण हाच आत्ता उपलब्ध असलेला एकमात्र पर्याय. आणि आपणही आत्ता आरक्षण म्हणजे इतरांवर होणारा अन्याय अशा फसव्या अफवांवर विश्वास न ठेवता आरक्षण म्हणजे मागासवर्गांना मुख्य प्रवाहात येवून प्रगत घटकांच्या खांद्याला खांद्या लावून चालण्यासाठी दिलेली एक सुवर्णसंधी म्हणून पहावे हीच एक माफक अपेक्षा ...
क्रमशः





Wednesday, May 25, 2011

आरक्षण भाग - २


कहाणी मंडल आयोगाची
भारतीय समाजकारणात आरक्षणाच्या राजकारणाचे विशेष असे महत्त्व राहीले आहे. मागील आरक्षण भाग १ मध्ये आपण आरक्षण या संकल्पनेची जडणघडण पाहीली होती. या ठिकाणी भाग २ मध्ये ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंडल आयोगाची वाटचाल नमुद केली आहे.

  1. २० डिसंबेर १९७८
    १९७८ सालच्या अखेरिस म्हणजेच डिसेंबरच्या महीन्यात तत्कालीन जनता दलाच्या मोरारजी देसाई सरकारने भारतातील सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर मागास राहीलेल्या जाती आणि जमातींचे अध्ययन आणि त्यांचे वर्गीकृत विश्लेषण करण्यासाठी एक सहा सदस्यीय आयोग नेमला. प्रस्तूत आयोगाच्या नेतृत्वाची धुरा ही तत्कालीन समाजवादी विचारवंत आणि खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. पुढे हाच आयोग आणि त्यांच्या शिफारसी ह्या अनुक्रमे मंडल कमीशन आणि मंडल रिपोर्ट म्हणून कायम चर्चेत राहीले.
  2. १ जानेवारी १९७९
    १९७९ सालाच्या पहिल्या दिवशीच मंडल आयोगाच्या नेमणुकीची तसेच त्याच्या संवैधानिक पातळीवर आवश्यक असणार्‍या बाबींच्या पूर्ततेसाठीची शासकीय अधिसुचना जारी केली गेली.
  3. डिसेंबर १९८०
    मंडल आयोगाने डिसेंबर १९८० साली तत्कालीन गृहमंत्री ज्ञानी जैल सिंग यांना आयोगाच्या अहवालाची प्रत सादर केली. या अहवालात ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी २७% आरक्षणाची शिफारस केली.
  4. १९८२१९८२ साली मंडल आयोगाचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला.
  5. १९८९
    १९८९ चे वर्ष हे खर्या अर्थाने भारतीय राजकारण आणि समाजकारणाला कलाटणी देणारे ठरले. आत्तापर्यंत केवळ सडक, बिजली पाणी, वंशवाद, घराणेशाही, भ्रष्टाचारावर निवडणुका आणि सामाजिक आंदोलने लढवली जात होती. परंतू ८९ सालच्या निवडणुकांच्या वेळी जनता दलाने मंडल आयोगाच्या शिफारसींना आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सामील करून घेतले, आणि तसा प्रचार देखील सुरू झाला. येथूनच भारतीय राजकारणात कास्ट पॉलिटिक्स उघडपणे खेळली जाऊ लागली. त्याचवेळी दुसरीकडे आडवणींची रथयात्रा आणि राममंदीराचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्याची परिणीती ही धार्मिक राजकारणात झाली.
  6. ७ ऑगस्ट १९९०
    तत्कालीन प्रधानमंत्री वी. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या अहवालाची आणि शिफारसींच्या अंमलबजावणीची घोषणा केली.
  7. ९ ऑगस्ट १९९०
    घोषणेच्या अगदी दोन दिवसानंतरच तत्कालीन उप-प्रधानमंत्री देवीलाल चौधरी यांनी विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे तडकाफडकी आपल्या उप-प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला.
  8. १० ऑगस्ट १९९०
    लगोलग तिसर्‍या दिवशी म्हणजेच १० ऑगस्ट १९९० ला मंडल आयोगाच्या ओबीसींना देण्यात येणार्‍या २७ % आरक्षणाच्या विरोधात देशभर संप, आंदोलने, निषेध मोर्च्यांचे सत्र सुरू झाले.
  9. १३ ऑगस्ट १९९०
    राष्ट्रव्यापी निषेधसत्र सुरू असतानाच मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा अध्यादेश (अधिसुचना) काढण्यात आला.
  10. १४ ऑगस्ट १९९०
    १४ ऑगस्ट १९९० रोजी आरक्षण विरोधकांचे नेते उज्जवल सिंग यांनी आरक्षण पद्धतीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
  11. १९ सप्टेंबर १९९०
    केवळ महिन्याभरातच आरक्षण विरोधाचा आगडोंब एवढा उसळला की दिल्ली विदयापीठाच्या दोन तरूणांनी आत्मदहनाचा मार्ग स्विकारला. या दोन तरूणांची नावेः- एस. एस . चौहान आणि राजीव गोस्वामी. यातील एस.एस.चौहान हा युवक तात्काळ मृत्यू पावला आणि राजीव गोस्वामी हा गंभीररीत्या भाजला गेला.
  12. १७ जानेवारी १९९१
    १९९१ सोलच्या जानेवारी महिन्यात ओबीसी आरक्षणावर विधायक पावले उचलताना तत्कालीम केंद्र सरकारने मागासवर्गांची एक सूची तयार केली.
  13. ८ ऑगस्ट १९९१
    ८ ऑगस्ट १९९१  रोजी समाजवादी नेते आणि सध्याचे लोजपा चे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी तत्कालीन केंद्र सरकारवर मंडल आयोगाच्या शिफारसींची योग्य स्वरूपत अंमलबजावणी करत नसल्याप्रकरणी ताशेरे ओढले. आणि दिल्ली येथील जंतर मंतर वर निषेध प्रदर्शन केले.
  14. २५ सप्टेंबर १९९१
    २५ सप्टेंबर १९९१ रोजी पटना येथे आरक्षण विरोधक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात चार आंदोलकांचा दूर्दैवी मृत्यू झाला.
  15. २५ सप्टेंबर १९९१
    साऊथ दिल्ली मध्ये आरक्षण विरोधी विद्यार्थ्यांच्या मोर्च्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू.
  16. २५ सप्टेंबर १९९१नरसिंह राव सरकारने १९९१ सालच्या सप्टेंबर मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास जातींची ओळख आणि नोंद केली. आरक्षणाची मर्यादा वाढवून ५९.५% एवढी केली गेली. यात सवर्णांमधील आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचा देखील समावेश करण्यात आला.
  17. १ ऑक्टोंबर १९९१
    १ ऑक्टोंबर १९९१ रोजी सन्मा. सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकार कडून आर्ठिक आधारावर दिल्या जाणार्‍या आरक्षणावर स्पष्टिकरण मागवले.
  18. २ ऑक्टोंबर १९९१
    २ ऑक्टोंबर १९९१ रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये आरक्षण समर्थक आणि विरोधकांच्या गटांमध्ये हाणामार्‍या झाल्या. गुजरात मध्ये शैक्षणिक संस्थाने बंद केली गेली.
  19. १० ऑक्टोंबर १९९१
    इंदौर मधल्या राजवाडा चौक परिसरात शिवलाल यादव या तरूणाने आत्मदहनाचा अयशस्वी प्रयत्न केला.
  20. ३० ऑक्टोंबर १९९१
    ३० ऑक्टोंबर १९९१ रोजी सन्मा. सुप्रीम कोर्टाने मंडल आयोगावरील सुनावणीवर उत्तर देताना संविधान पीठाने नऊ न्यायाधीशांच्या बेंचकडे हे प्रकरण पुढील सुनावाई साठी सुपूर्द केले.
  21. १७ नोव्हेंबर १९९१
    राजस्थान
    , उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उडीसा या चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा आरक्षण विरोधाने उग्र रुप धारण केले. उत्तरप्रदेश मध्ये शेकडो आंदोलकांना अटक करण्यात आली. तर गोरखपूरमध्ये विरोधक आंदोलकांनी सोळा बसेस पेटवून दिल्या.
  22. १९ नोव्हेंबर १९९१ उत्तरप्रदेश आणि सोबतच्या चार राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराचे लोण अवघ्या दोन दिवसांत राजधानीपर्यंत पसरले. दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात पोलिस आणि विद्यार्थ्यांमधली आजवरची सगळ्यात मोठी झडप झाली. या गदारोळात थोडेथोडके नव्हे तर चक्क ५० लाखाहून अधिक जखमी झाले. यात गंभीररित्या जखमींची संख्या अधिक होती.  
  23. १६ नोव्हेंबर १९९२९१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गदारोळाच्या ठिक वर्षभरानंतर १६ नोव्हेंबर १९९२ सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात मंडल आयोगाचा अहवाल आणि अहवालात सुचविलेल्या शिफारसींना पूर्णपणे योग्य ठरविले. यासोबतच आरक्षणाची सीमा ही जास्तीत जास्त ५०%  ठेवून मागास जाती- जमाती आणि इतर मागासवर्गातील विकसित घटकांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
  24. ८ सप्टेंबर १९९३
    केंद्र सरकाने इतर मागासवर्गीयांना २७%  आरक्षण देण्याची अधिसुचना जाहिर केली.
  25. २० सप्टेंबर १९९३
    सरकारची अधिसुचना जाहीर होताच २० सप्टेंबर १९९३ रोजी राजीव गोस्वामी ने पुन्हा एकदा याविरोधात आत्मदहनाचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी ठिकाण होते क्रांती चौक.
  26. २० सप्टेंबर १९९३
    १९९१ नंतर आरक्षण विरोधात थांबलेले लोण पुन्हा एकदा पसरले. २० सप्टेंबर १९९३ रोजी इलाहाबाद येथील इंजीनिअरींग ची विद्यार्थीनी  मीनाक्षी हिने आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात आत्महत्या केली.
  27. २० फेब्रुवारी १९९४
    २० फेब्रुवारी १९९४ रोजी ओबीसी आरक्षणाचं पहिलं फळ दिसलं. मंडल आयोगाच्या शिफारसींनुसार वी राजशेखर हा नोकरी मिळवणारा पहिला तरूण ठरला. वी राजशेखर ने तत्कालीन समाज कल्याण मंत्री सीताराम केसरी यांच्याकडून नियुक्ती पत्र स्विकारलं.
  28. १ मे १९९४
    १ मे १९९४ रोजी गुजरात दिनाचे औचित्य साधून गुजरात सरकारने राज्य सरकारच्या नोकर्‍यांमध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींप्रमाणे आरक्षण लागू केले.  
  29. २ सप्टेंबर १९९४मसूरी येथे झालेल्या आरक्षण विरोधी आंदोलनात आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या हाणामारीत दोन महिलांसह ६ जण मृत्यूमुखी पावले. आणि ५० जण गंभीर जखमी झाले.
  30. १३ सप्टेंबर १९९४
    उत्तर प्रदेशातील तत्कालीन सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्याद्वारे पुकारलेल्या संपात हिंसाचार घडून आला. यात पाच जणांना जीवाला मुकावे लागले. 
  31. १५ सप्टेंबर १९९४
    बरेली महाविद्यालयाच्या उदित प्रताप सिंग या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ह्या घटनेनंतर मात्र मंडल आयोगावरची रणधुमाळी शांत झाली. २४ फेब्रुवारी २००४ रोजी आरक्षण विरोधी आंदोलनाचा म्होरक्या राजीव गोस्वामीचे दीर्घ आजारानंतर निधन झाले.

Monday, May 23, 2011

आरक्षण – भाग १


                आपल्या भारत देशाला लागलेली जातीव्यवस्थेची किड हाच या समृद्ध अशा महान देशाला लागलेला कलंक आहे. पूर्वापार प्रचलित असलेल्या जाचक व जुलूमी अशा वर्णव्यवस्थेचं अनौरस अपत्य म्हणजेच जाती व्यवस्था. ह्या जाती व्यवस्थेचं समुळ उच्चाटन करण्यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी अपार कष्ट सोसले. भारतातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या महापुरूषांनी अनेक अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, सामाजिक दुर्गूण, समाजव्यवस्थेला पांगळी करणार्‍या किडीचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रचंड यशस्वी असे प्रयत्न केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान निर्मितीची वेळ आली तेव्हा विधवा विवाह, बाल विवाहबंदी, स्त्री-पुरूष समानता, अस्पृश्यता, जातीयवाद आणि सर्व प्रकारच्या तत्सम विषमवृत्तीला आळा बसावा या उदात्त हेतूने या वृत्तीविरोधातल्या सर्व कायद्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये अंतर्भूत केले. शतकानुशतके जातीयतेच्या गुलामगिरीत खितपत पडल्याने आणि सामाजिक व आर्थिक अवनतीमुळे शुद्रातिशुद्रांची जी भयावह स्थिती झाली होती त्यावर एकच उपाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दृष्टिपथास पडत होता आणि ते म्हणजे समान प्रतिनिधीत्व.

       महाराष्ट्रात १९०२ साली म्हणजेच ब्रिटीशशासित भारतात कोल्हापूर संस्थानच्या क्रांतीकारी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्य प्रशासनात मागासवर्गांना ५०
%  आरक्षण मंजूर करताना त्याची योग्य अंमलबजावणी देखील केली. विसाव्या शतकाच्या आरंभात १९०२ साली शाहू महाराजांनी मागास वर्गांना सर्व प्रकारच्या नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्यासाठीचा एक अध्यादेश जारी केला, भारतातील हा आरक्षणासंबंधी जाहीर झालेला पहिलाच सरकारी अध्यादेश होय. देशात आरक्षण जरी दिले गेले असले तरी त्याचे वितरण मात्र अजूनही नीटसे होऊ शकले नाहीये. मुळात कोणत्या जातींना कोणत्या प्रदेशानुसार आरक्षण दिले जावे हाच सर्वाच मोठा तिढा आहे. अस्पृश्यतेबद्दल असलेली धारणा आणि त्याची दाहकता ही प्रदेशानुरूप बदललेली दिसते. उदा. धोबी समाजातील लोक हे उत्तर प्रदेशात अस्पृश्य म्हणून गणले जातात तर महाराष्ट्रात मात्र एक सेवक वर्ग म्हणून कायम पाहीले गेले आहे. असे असले तरी त्यांना कनिष्ठ दर्जाचीच वागणूक मिळत राहीलीये. काही ठिकाणी अस्पृश्यता ही व्यावसायिक आधारांवर ठरविलेली दिसते.

      
सध्याच्या काळात देशात चालत असलेल्या आरक्षण प्रणालीवर नजर टाकली तर असे लक्षात येईल की आरक्षण ही काय स्वातंत्र्योत्तर काळात बाबासाहेबांनी जन्माला घातलेली कंसेप्ट नाही. तसा बर्‍याच जणांचा हाच गैरसमज आहे. म्हणून या ठिकाणी भारतातल्या आरक्षण पद्धतीची जी जडणघडण झालीये तीचा घटनाक्रम पाहूया..
1.       १८८२ – ब्रिटीश सरकारने हंटर आयोगाची नेमणुक केली. क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांनी विनाशुल्क आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासोबतच इंग्रज सरकारच्या तत्कालीन प्रशासनात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या नोकर्‍यांमध्ये उचित आरक्षण आणि समान प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली.
2.       १८९१- सन १८९१ मध्ये त्रावणकोर संस्थानातल्या सार्वजनिक प्रशासन विभागात परप्रांतीयांच्या भर्तीविरोधात आंदोलन करताना सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली.
3.       १९०२- महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानात छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्य प्रशासनात मागासवर्गांना ५०%  आरक्षण मंजूर करताना आरक्षणासंबंधीचा पहीला सरकारी अध्यादेश काढला. परंतू  बडोदा आणि म्हैसूर संस्थानात कोल्हापूर संस्थानच्या आधीच आरक्षण लागू करण्यात आले होते. (परंतू  बडोदा आणि म्हैसूर संस्थानातील अंमलाचे ठराविक वर्ष माहीत नाही. माहीती मिळताच वर्ष, वेळ अपडेट केले जाईल.)
4.       ९०८ – इंग्रजांनी प्रथमच जातीय आणि अल्पसंख्यांक समुदायांसाठी आरक्षण लागू केले.
5.       १९०९ – भारत सरकार अधिनियमात सन १९०९ साली आरक्षण पद्धती अंतर्भूत केली गेली.
6.       १९१९- मॉंटेग्यू आणि चेम्सफोर्ड अहवालाची अंमलबजावणी सुरू.
7.       १९२१- मद्रास प्रांताने जातीनिहाय आरक्षणासंबंधीचे अध्यादेश जाहीर करताना पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर केले.
        १. अनुसूचित जाती आणि जमातींना   
        २. ब्राम्हण वर्ग                                        १६
        ३. गैर ब्राम्हण                                         ४४ 
        ४. मुस्लिम                                             १६  
        ५.
ANGLO INDIAN/ Christian            १६
8.        १९३५- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रस ने पुणे कराराला अनुसरून ठराव संमत केला. वास्तविक पाहता पुणे करार हा स्वतःच एक अभ्यासाचा आणि वाद-विवादाचा विषय आहे.
9.       १९३५- भारत सरकार आधिनियम १९३५ मध्ये पुन्हा एकदा आरक्षणासंबंधीची तरतूद करण्यात आली.
10.     १९४२- १९४२ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया डिप्रेस्ट क्लासेस मिशनची स्थापना केली. भारतातील अनुसूचित जातींना सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले.
11.    १९४६- १९४६ सालच्या ब्रिटीश कॅबिनेट मिशनच्या अनेक शिफारसींनुसार योग्य प्रमाणात आणि समान गुणोत्तर राखून आरक्षण सागू करण्याचा प्रस्ताव दिला.
12.    १९४७- भारताला स्वातंत्र्य मिळताच १९४७ साली संविधान समितीची स्थापना करण्यात आली. संविधान समितीतील अत्यांत महत्त्वाच्या अशा मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली.
13.    १९४७-१९४९ – या दोन वर्षांच्या कालखंडात संविधान सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडून आली.
14.    १९४९- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्विकारले गेले.
15.    १९५०- २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू होऊन जगाच्या नकाशावर भारत अक सोर्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आले. 
16.    भारतीय संविधानाने धर्म, जात, लिंग, जन्म ठिकाण, वंश आधारीत भेदभाव नाकारताना सर्वांना विकासासाठी समान संधी मिशवुन देण्यासाठी विशेष अशा कलमांचा अंतर्भाव केला आहे.
17.    १९५३-  काका कालेलकर आयोगाची स्थापना. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासवर्गांच्या अकुण परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता. या आयोगाच्या अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींसाठी सुचविण्यात आलेल्या सार्‍या शिफारसी स्विकारल्या गेल्या तर, ओबीसींसाठी करण्यात आलेल्या सार्‍या शिफारसी नाकारण्यात आल्या.
18.    १९५६- काका कालेलकर कमिटीच्या रिपोर्टनुसार संविधानातील अनुसुचींमध्ये संशोधन केले गेले.
19.    १९७६- तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा संविधानातील अनुसुचींमध्ये संशोधन केले गेले.
20.    १९७९- १९७९ सालापर्यंत तत्कालीन भारत सरकारकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची आकडेवारी आणि एकुण परिस्थितीचा लेखाजोखा उपलब्ध नव्हता. यासाठी बहुचर्चित आणि विवादित ठरलेल्या मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ओबीसी जातींची व्याख्या करताना १९३० साली झालेल्या जणगणनेच्या आधारे ओबीसींच्या ५२%  लोकसंख्येला १२५७ वर्गांत विभाजित केले.
21.    १९८०- १९८० साली आयोगाने आपला अहवाल सादर करताना सुचविलेल्या शिफारसींनुसार पूर्वीच्या २२%  मध्ये वाढ करताना ४९.५% पर्यंतची वाढ सुचविली. एकुणतः २००६ सालापर्यंत ओबीसी जातींची संख्या ही २२९७ अवढी झाली होती.
22.    १९९०- १९९० मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार वी. पी. सिंग सरकारने नवी आरक्षण प्रणाली सरकारी नोकर्‍यांमध्ये लागू केली. देशभरातील नानाविध विद्यार्थी संघटनांनी राष्ट्रव्यापी बंद पुकारले. दिल्ली विद्यापीठाच्या राजीव गोस्वामी नामक आंदोलकाने आत्मदहनाचा अयशस्वी प्रयोग केला.
23.    १९९१ साली नरसिंह राव सरकारने सवर्णामधील आर्थिक मागास घटकांना आरक्षण लागू केले.
24.     १९९२ साली सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरमणात दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणाला योग्य ठरविले.
25.     १९९५- ७७ व्या संविधान दुरूस्तीमध्ये  अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमातिच्या प्रगतीसाठी आरक्षण आवश्यक असल्याचा निर्वाळा देताना संविधान अनुच्छेद १६(४) (अ) चा समावेश केला.
26.    १९९८ साली भारत सरकारने देशातील विविध वर्गांची, जातींची आणि समुदायांची आर्थिक, राजकीय, सामाजिक स्तरावरील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी एका मोठ्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाची घोषणा केली. हे सर्वेक्षण नॅशनल  सॅंपल सर्वे ऑर्गनायझेशन ने केले असून ह्यात त्यांनी एक निष्कर्ष मांडला तो असा, देशातील बहुसंख्य भागात ओबीसी वर्गातील काही जातींची तुलना ही सवर्णांसोबत केली जाउ शकते. मंडल आयोगाने ह्या निष्कर्षावर ताशेरे ओढले आहेत.
27.    १२ ऑगस्ट २००५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोणतेही राज्य हे त्यांच्या राज्यातील अल्पसंख्यांक, किेवा विनाअनुदानीत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमे चालवणार्‍या महाविद्यालयांवर आरक्षणासंबंधी कोणतीही जबरदस्ती करू शकणार नाही.
28.    २००५ – २००५ साली केले गेलेल्या संविधान दुरूस्तीमध्ये खाजगी महाविद्यालयांत मागास वर्ग आणि जाती- जमातींसाठी असलेल्या आरक्षणाची व्याख्या सुनिश्चित करण्यात आली. या दुरूस्तीमुळे ऑगस्ट २००५ सालचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अनपेक्षितपणे उलथवण्यात आलं.
29.    २००६ – २००६ साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने संविधानातील कलम १६(४) (अ), १६(४) (ब) आणि कलम ३३५ च्या तरतुदींना योग्य ठरविण्यात आलं.
30.     २००६ सलापासून केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थानात ओबीसीं साठी आरक्षण सुरु करण्यात आले.
31.    २००७- मात्र २००७ साली केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थानात ओबीसीं साठी आरक्षण प्रणालीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
32.    २००८-  १० एप्रिल २००८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सरकारी अनुदानावर चालणार्‍या सर्व संस्थांनांमध्ये २७% ओबीसी कोटा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरविले. यावेळी क्रिमी लेअर निश्चित केला गेला. सोबतच खाजगी क्षेत्रांत आरक्षण हे फक्त त्यासंबंधीचा कायदा निर्माण झाल्यावरच सर्वोच्च न्यायलय त्यावर टिप्पणी करू शकेल असे नमुद केले.
33.    २,५०,०० किंवा त्यापेक्षा अधिकचे वार्षिक उत्पन्न, डॉक्टर, इंजीनियर, चार्टर्ड एकाउंटेंट, अभिनेता, सल्लागार, प्रसारमाध्यमातील उच्चपदस्थ, लेखक, नौकरशाह, कर्नल आणि त्यासमान रँक असलेले अधिकारी, उच्च न्यायालय, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्र आणि राज्य सरकारच्या अ आणि ब श्रेणीतल्या सर्व अधिकार्‍यांच्या मुलांना ह्या क्रिमी लेअर मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. याच बरोबर खासदार आणि आमदार यांच्या मुलांनाही यातून वगळले आहे. 

Saturday, May 14, 2011

युपीएससीच्या नावानं चांगभलं ............

आरक्षण ... भारतात प्रत्येक घटकाचा जिव्हाळ्याचा विषय.. आजपर्यंत आरक्षणाबद्दल समज कमी गैरसमजच जास्त आहेत. मुळात या ठिकाणी आरक्षणाचे समर्थन वा विरोध करण्यासाठीचा हा उहापोह मुळीच नाही. आजकालची जर वृत्तपत्रे किंवा कोणत्याही प्रकारची, पद्धतीची किंवा कोणत्याही भागातला. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा हा नेहमीच नकारात्मक पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलाय. मग ते महिला आरक्षण असो किंवा जातीय आरक्षण.
कालच यूपीएससीचा निकाल लागला. ट्रेन मध्ये पेपरमधली बातमी वाचत असताना एका सदगृहस्थाने अचानक जोरदार कमेंट मारली, “च्याआयला आरक्षणाच्या कुबड्या घेतल्याशिवाय यांना युपीएससी काय घंटा पास करता येणार आहे.कमेंट ऐकताच तळपायातली आग मस्तकात गेली, त्या सदगृहस्थाच्या कानाखाली जाळ काढावा असा विचार करून उठलो आणि पहिला प्रश्न केला,
  1. काय हो युपीएससी चे पेपर सोडवताना कोणत्या प्रकारची सवलत दिली जाते ते माहीत आहे का?"
  2. "का खुल्या वर्गाला कठीण प्रश्न आणि मागास वर्गाला सोपे प्रश्न असा काही फंडा युज केला जातो का ?"   दोन्ही प्रश्नांना नाही असेच उत्तर आले. नंतर मी त्यांचा यथोचित सन्मान केलाच. पण एक गोष्ट मात्र खरी की युपीएससी च्या परिक्षांमध्ये मिळणार्‍या सवलतींबाबत मात्र खुप गैरसमज पतरलेले आहेत. त्याचाच उहापोह मी इथे करणार आहे.
केंद्रिय लोकसेवा आयोगकडून घेण्यात येणार्‍या सर्वच परिक्षांमध्ये आरक्षण आणि सवलती दिल्या जातात. पण मुळात आरक्षण आणि सवलती यांची गल्लत करतो. यूपीएससी  सोबतच्या भारतातल्या सर्व सरकारी व निमसरकारी संस्थानांद्वारे दिल्या जाणार्‍या नोकर्‍यांमध्ये विशिष्ट वर्गाला, प्रवर्गाला आणि समुदायाला सवलती प्रदान केल्या जातात. ह्याच पद्धतीने कमी अधिक समान पातळीच्या सवलती सर्वच प्रवेशपरिक्षा आणि स्पर्धा परिक्षांमध्ये दिल्या जातात. यूपीएससीच्या सिविल सर्विस एक्सामिनेशन मध्ये मागासवर्गीयांना निवडीसाठी असलेल्या वयाच्या अटीत पाच वर्षांनी तर ओबीसी वर्गात मोडणार्‍यांसाठी तीन वर्षांची सुट आहे. त्याचवेळेस वयाची तीस वर्षे पूर्ण करणारा खुल्या वर्गातील कॅंडीडेट ही परीक्षा देऊ शकत नाही शिवाय फक्त चार वेळा ते ह्या प्रवेश परिक्षा देऊ शकतात. मागासवर्गीय उमेदवारांना मात्र ही अट लागू होत नाही.  इतर मागासवर्गीय आणि आदिवासी उमेदवार सात वेळा प्रयत्न करू शकतात.
दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मागासवर्गीय, आदिवासी आणि इतर मागासवर्गांतील उमेदवारांना लोकसेवा आयोग आणि तत्सम परिक्षांना बसण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांपेक्षा अधिक संधी देण्यात येतात. यावर सुप्रीम कोर्टाने युपीएससीला काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारताना ओबीसी कॅटेगरीतल्या उमेदवारांना ह्या परिक्षा सात वेळा अटेंप्ट करण्याची सवलत का मिळावी? युपीएससीने सुप्रीम कोर्टाला अजून कोणत्याही प्रकारचे उत्तर पाठवलेले नाही. वास्तविक पाहता हायकोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना दिलेल्या निर्णयात असे म्हटले आहे की, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गांना अधिक संधी व सवलती देण्यात काहीच गैर नाही. भारतीय संविधान कलम १६ (४) अन्वये समाजातील प्रत्येक घटकाला स्वतःचा विकास करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व संधीचं योग्य प्रमाणात वितरण होणं आवश्यक आहे.
वरकरणी पाहता ही समुळ व्यवस्था समाजातील मागासवर्गीय, दलित, आदिवासी, इतर मागास जाती आणि जमाती यांच्या एकुण प्रगतीसाठी उपलब्ध असलेलं एक परफेक्ट साधन असल्याचं दिसतं, कारण त्यांना खुल्या वर्गाच्या तुलनेत अधिक सोयीसवलती उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपली भारतीय शासनप्रणाली उदारतेचे धोरण स्विकरते. परंतू, असे असतानाही काही प्रश्न निश्चितच अनुत्तरीत राहीले आहेत. ते खालीलप्रमाणे ...
  1. खरचं ही व्यवस्था त्यांच्यासाठी हितवर्धक ठरलीये का?
  2. वय आणि अटेंप्ट मध्ये मिळणार्‍या सोयी-सवलतींमुळे खरचं काही आमुलाग्र बदल घडून आलाय का ?
  3. शिवाय जर ह्या सवलती नाकारल्या गेल्या तर मागासवर्गांचे काय आणि कसे नुकसान होईल ?
याची चर्चा करणे अधिक संयुक्तिक ठरेल असे मला वाटते.
जर मागासवर्गाना कोणत्याही प्रकारच्या सवलती उपलब्ध करून दिल्याच गेल्या नाहीत किंवा त्या नाकारल्या गेल्या तरी त्या विशिष्ट समुदायातून निवडून येणार्‍या उमेदवारांच्या संख्येवर विशेष असा फरक मात्र पडणार नाहीये. आणि हे जळजळीत सत्य आहे. उदाहरण घ्यायचं झालचं तर, जर ह्या वर्षी जवळपास १००० च्या आसपास विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरीही संवैधानिक तरतुदींप्रमाणे ठराविक गुणोत्तरानुसार जागा ह्या प्रत्येक वर्ग आणि प्रवर्गासाठी, जाती आणि जमातीसाठी निश्चित केलेल्या असतात. आणि त्या त्या जातींसाठी आरक्षित असलेली रिक्त पदे भरताना उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांने कितव्या अटेंप्ट मध्ये परिक्षा पास केली हे लक्षात घेतलं जात नाही. पण जेव्हा सरळ नियुक्तीची वेळ येते तेव्हा जागा ह्या अत्यंत कमी असल्यामुळे ज्यांची योग्यता असामान्य, प्रभावी कार्यकुशलता आणि त्यांनी दिलेला परफॉर्मंस पाहूनच नियुक्ती केली जाते. आणि जरी मागासवर्गाना वय आणि अटेंप्ट मध्ये असलेली सुट जरी बंद केली तरी विशेष असा काहीच फरक पडणार नाही.पण, आणि पण ...
         
वय आणि अटेंप्ट मध्ये मिळणार्‍या सुटमुळे एक नुकसान मात्र जरूर होतंयं. कारण वयाच्या ३३ किंवा ३५ व्या वर्षात सिविल सर्विसेस मध्ये येणार्‍या ह्या उमेदवारांना कमी सर्विस कालावधी पूर्ण करून रिटायर्ड व्हावे लागते. त्याची परिणीती केंद्रीय शासनप्रणालीच्या उच्च पदांवर पोहोचणे जवळपास असंभवच होउन जाते. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल तो असा की, सर्विस मध्ये येण्यासाठी वयाचे बंधन नाही (३५ पर्ंत) पण वयाची ६० वर्षे पूर्ण झाली की सेवानिवृत्ती सर्वांसाठी समानच असते. एखादा दलित समाजातील व्यक्ती ही वयाच्या पस्तीशीत सर्विस मध्ये येत असेल तर जेमतेम २५ वर्षांच्या कालावधीत उच्च पद गाठणं अशक्यप्रायच. पण खुल्या वर्गातील उमेदवाराकडे सरासरी ३० वर्षे राहतात.

              
प्रशासन व्यवस्थेमध्ये निवृत्तीच्या आधीची पाच वर्षे ही खुप महत्त्व पूर्ण मानली जातात. ह्याच काळात अनेक बढत्या दिल्या जातात. अनेक जबाबदारीची पदे सोपविली जातात. पण केवळ सर्विसचा कालावधी कमी म्हणून सिनीयोरीटीचा फरक नि्र्माण होतो. जर प्रशासनातील उच्च पदे काबीज करायची असतील तर मागासवर्गीय तरूणांनी तरुण वयातच आपले ध्येय्य गाठली पाहीजेत. वरवर चांगल्या दिसणार्‍या ह्या संधी कशा नुकसानकारक बनू शकतात ह्याचे हे एक उत्तम उदाहरण.
एकटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोडले तर आरक्षण आणि ते राबवण्यासाठीची सायंटिफिक मेथडॉलडीवर कुणीही विशेष असे चिंतन केलेले नाही. वास्तविक पाहता जर आपण भारतातील जातीव्यवस्था आणि तिचे आजचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात असलेले स्वरूप, त्याचबरोबर मागासवर्गाकडे अभिजन समाजाचा बघण्याचा दृष्टिकोण पाहीला तर आरक्षण हाच एकमेव पर्याय दिसतो. १४ जुलै २०१० ला राज्यसभेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे आयआयटी सारख्या उच्च शिक्षण संस्थानात १४९३ ओबीसी, १२६५ दलित, ६५९ आदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आयआयटी एंट्रंस सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी युपीएससी सहज पास करू शकतात. वरील आकडा हा केवळ आयआयटी पुरताच मर्यादित आहे, अतून बाकीचे संस्थाने बाकी आहेत. आत्ता हे सगळ्यांना मान्य करावेच लागेल की गुणवत्ता ही जात किवा धर्म पाहून येत नसते. फक्त काही संधी द्या सामाजिक पातळीवर समाजानेच अपंग ठरविलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्या. टॅलेंट खुप आहे. शिवाय कोणत्याही क्षेत्रात उच्चपदांवर होणारी नियुक्ती परफॉर्मंस वरच अवलंबून असते.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण आत्तापर्यंत केवळ एका बाजूचाच विचार केला मात्र दुसी बाजू ही सुद्धा तेवढीच तपासणे गरजेचे आहे. एससी, एसटी आणि ओबीसी कॅटेगरीतल्या उमेदवारांना असलेल्या सुटमुळे ते सर्विस मध्ये जरा उशीराच दाखल होतात. परंतू जोपर्यंत अधिक वयाचे उमेदवार हे लहान वयाच्या उमेदवारांवर वरचढ ठरत असल्याचा कोणताही सर्वे समोर येत नाही तोपर्यंत आपण ठराविक असा कोणताही निष्कर्ष कोढू शकत नाही. येथे हा मुद्दा सुद्धा रिसर्चसाठीचा एक स्वतंत्र मुद्दा बनू शकतो.
आत्तापर्यंतच्या प्रशासकीय इतिहासात भारतातील केवळ दोनच राज्याचे मुख्य सचिव पदापर्यंत दलित कॅंडिडेट पोहोचू शकले आहेत. उत्तर प्रदेश मध्ये कांशीराम सत्तेवर असताना माताराम  आणि राजस्थान मध्ये नायर शयद. यांपैकी नायर शयद यांची नियुक्ती ही अंतर्त राजकारणानुसार झाली होती. राजस्थान मध्ये बसपाचा वाढणारा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने केली गेलेली एक चाणाक्ष तडजोड होती. ब्युरोक्रेसी मध्ये वरिष्ठ पदांवर पोहोचण्याकरीता राजकीय समर्थन किंवा आशिर्वाद असणे फार महत्त्वाचे असते. आत्ता भारतातील कोणता असा पत्र आहे जो या देशातील मागासवर्गातून आलेल्या अधिकार्‍याला उच्च पद देईल. आणि असे ही नाही कग सगळेच सिनीयोरीटीच्या विळख्यात अडकलेत. बरेच जण वयाच्या २५ व्या वर्षीच किवा २२व्या वर्षीच सर्विस मध्ये आलेले आहेत. पण केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आज समानता नावाचं गाजर आपल्याला नेहमी दाखवलं जातं.
संविधानाने सर्वाना समान संधी उपलबअद करून देताना आपले उदार तत्व पाळले. पण ते ज्यांनी पाळावयाचे आहे ते सर्व आपली नैतिकत गमावून बसलेत. आजमितीला आपण जर अभ्यासले तर अक गोष्ट सहज आठळून येईल की भारताची ब्युरोक्रेसी ही भ्रष्टाचाराच्या दलदलीत पूर्ण बरबटलीये.  आदर्श प्रकरणात सगळ्यात प्रशासकीय आधिकारीच आढळून आले आहेत. सर्वात जास्त लाचखोरी देखील याच विभागात चालते. दलित आदिवासींच्या जमीनी कवडीमोल भावावर विकत घेऊन भांडवली व्यवस्थेचे इमले उभारण्यासाठी मजत करणारे आणि त्यासाठीचा मास्टर प्लान तयार करणारे देखील हेच.
प्रस्तूत लिखाण वाचताना वाचकाचा मी कट्टर आरक्षण विरोधी आहे असा समज होउ शकतो. पण तसे नाही याउलट मी आरक्षणाता खंदा समर्थकच आहे. त्याची छोटीशी कारणमीमांसा येथेच करत आहे. युपीएससी सारख्या परित्रांमध्ये मिळणार्‍या सवलती निश्चितच न्याय्य आणि स्वागतार्ह आहेत. (वरिल मुद्दे लक्षात घेउन देखील स्वागतार्हच आहेत) प्रस्तूत सवलती ह्या मागासवर्गीयांना मिळालेले एक वरदानच आहे. खरा भारतच हा खेड्यांमध्ये राहतो. भारतातील जवळपास खेड्यातील ७०%  जनता ही मागासवर्गात मोडते. ग्रामीण पार्श्वभूमी  आणि बेताची आर्थिक परिस्थिती असेलल्या सर्वच उमेदवारांसाठी ह्या सवलती खुपच उपकारक आहेत. बव्हंशी घरात कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्याने सिविल सर्विसेस च्या परिक्षांबाबतची जागरूकता ही फार उशीरा येते. बर्‍याचशा केसेसमध्ये पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षा नावाचा प्रकार विद्यार्थ्यांना माहीत पडतो. दुसर्या बाजूला मागासवर्गातील ८० % विद्यार्थी हे काम करून शिकत असल्याने अभ्यासाकडे जरा दूर्लक्षच होते. त्याची परीणीती पदविका अभ्यासक्रम जसा तसा पूर्ण करून घेतल्याने स्पर्धा परीक्षेच्या दर्जाची तयारी होऊ शकत नाही. मग मिळेल ती सामान्य नोकरी करून उदरनिर्वाह चालवावा लागतो, नोकरी करता करता परीक्षेची तयारी करावी लागते. बर्‍याचदा अनेक विद्यार्थी वैतागून परिक्षेचा नादच सोडून देतात. तरी देखील ज्यांच्या ठायी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रखर महत्त्वाकांक्षा असते ते हे सर्व अडथळे पार करून यशस्वी होतातच. जेव्हा समाजातील कायम दुर्लक्षित राहीलेला आणि आर्थिक विवंचनेत जगणार्‍या वर्गातून कोणी या सेवेत दाखल होतो तेव्हा निश्चितच ह्या आरक्षण पद्धतीने त्यांना मुख्य प्रवाहात आणताना त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा सन्मान केला जातो.------------ वैभव  छाया ---------------

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons