Saturday, March 3, 2012

LOG - IN



       सोशल नेटवर्किंग म्हणजे काय रे भाऊ ? असा प्रश्न विचारणारा तरुण शोधणे किंवा तसा तो सापडणे हे जवळपास अशक्य काम. साधारणतः दहा वर्षांआधी ई-मेल्स, डाटा-शेअरिंग, डॉक्युमेंटेशन, माहीती गोळा करणे, उपग्रह नियंत्रित करणे, मोठमोठी संकेतस्थळे चालवणे इत्यादी कामात वापरात येणार्‍या आंतरजालाचे रुपांतरण हे पर्सन टू पर्सन इंटरकनेक्टिविटी वाढवण्याच्या क्रांतिकारी बदलात होईल याचा साधा अंदाज देखील कोणी बांधला नव्हता. इंटरनेट ने समाजजीवनात जो क्रांतिकारी बदल घडवून आणलाय त्या बदलाला एका स्पष्ट व्याख्येत बसवणे निश्चितच सोपे नाही. द ग्लोब (१९९५) ’, जिओसिटीज (१९९४) आणि ट्रायपॉड.कॉम पासून सुरू झालेला प्रवास फेसबुक, ट्विटर व गुगलप्लस पर्यंत येउन पोहोचलाय. राजरोसपणे नवनव्या कल्पना जन्म घेत असतात. त्यातील काही आश्चर्यकारकरित्या यशस्वी होतात तर काही काळाच्या उदरात गडप होउन जातात. ह्याच इंटरनेटचे अपत्य असलेल्या सोशल नेटवर्किंगने जगात नायकविरहीत क्रांती घडवून आणली आहे. अशा या सोशल नेटवर्किंगची उत्पत्ती आणि व्यूत्पत्ती पाहणे खरे तर खूपच रोमांचकारी ठरणार आहे. तर चला या विस्मयकारक जगाच्या सफरीला सुरूवात करण्यासाठी साईन इन करुयात.



१९७० साली अमेरिकेतील एका प्रसिद्ध नियतकालिकने आर्थर सी क्लार्क यांची मुलाखत प्रसिद्ध केली होती. त्यात असे म्हटले होते, “Satellites would one day bring the accumulated knowledge of the world to your fingertips". आज प्राथमिक अवस्थेत असलेले सारे उपग्रह एक दिवस निश्चितच विकासाच्या सार्‍या व्याख्या बदलवून टाकतील.  फोटोकॉपीअर, टेलिफोन, टेलिव्हीजन, संगणक ते वर्ल्ड वाईड वेब हा सारा प्रवास आर्थर क्लार्क यांची भविष्यवाणी खरी ठरवत गेला. १९९० साली विकसित झालेल्या वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना आजच्या संगणकयुगाला कारणीभूत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोणत्याही बैजिक क्रिया करणारा संगणक वर्ल्ड वाईड वेब च्या मदतीने संपर्कक्रांती घडवून आणू शकतो ह्यावर १९९२ सालापासूनच संशोधन सुरू झाले. त्याचेच फलित असलेल्या आणि १९९५ साली प्रायोगिक तत्वांवर सुरू करण्यात आलेल्या द ग्लोब,  जिओसिटीज आणि ट्रायपॉड. कॉम ह्या कम्युनिटी वेबसाईट्स अमेरिकेतील लोकांना चॅटरुमच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यासाठी तय्यार करण्यात आल्या होत्या. पण त्या अल्पायुषीच ठरल्या. आपण हवे तर या तिन्ही साईट्सना सोशल नेटवर्किंगची फर्स्ट जनरेशन म्हणूया. पण सेकंड जनरेशने मात्र कमाल केली. १९९७ साली आलेल्या सिक्स डिग्री.कॉम, २००० साली आलेल्या मार्केटआऊटक्लब. कॉम व फ्रेंडस्टर (२००२) सारख्या साईट्स इंटरनेटचे अविभाज्य अंग बनले. पाश्चिमात्य राष्ट्रांत एव्हाना सर्वच सोशन नेटवर्किंगच्या आहारी गेले होते. १९९८ साली लॅरी पेज व सर्गी ब्रिन यांनी जन्माला घातलेलं गुगल नावाचं बाळ २००२ सालापर्यंत चांगलंच सदृढ झालं होतं. दुसर्‍या बाजूला १९९५ साली स्थापन झालेलं याहूचं सर्च इंजिन, नॅपस्टर सारखं म्यूझिक सर्च इंजिन, जस्ट वन क्लिक, २००१ साली आलेलं विकीपीडीया सारखे इंटरनेट एनसाक्लोपीडीया ( माहितीकोश) अख्या अमेरिका व युरोप खंडात गाजत होते. भारतात आत्ता कुठे सायबर कॅफे, कलर स्क्रिन कंम्प्यूटर ची ओळख होउ लागली होती. शाळांशाळांतून मासिक २० रु. शुल्क आकारून संगणक प्रशिक्षण देण्यास सुरूवात झाली होती. अमेरिका व युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा होता.


२००४ सालचा फेब्रुवारीचा महिना, भारतात केंद्रिय निवडणूकांची धामधूम सुरू होती. घोषणा दान केल्या जाव्यात तशा घोषित होत होत्या. त्या घोषणांमध्ये झालेली महत्त्वपूर्ण घोषणा होती ती भारतात इंटरनेटच्या वापरासंबंधी असलेले सर्व जाचक नियम, अटी ट्राय (TRAI) ने शिथील केले होते. इंडिया शाईनिंग चा तो मौसम होता. त्याच वेळेस अमेरिका एका नव्या पर्वाच्या सूर्योदयाची साक्षीदार होत होती. वेबस्पेस आणि ब्राउजर वॉरचं वादळ कोर्टरुममध्ये जाऊन शमलं होतं. वेबस्पेस टेक्नॉलॉजी देखील प्रगत झाली होती. २००४ साली आलेल्या ऑर्कूट आणि फेसबुक ने सोनेसा (सोशल नेटवर्किंग साईट्स) च्या कक्षाच रुंदावून टाकल्या. त्यात भर घातली ती यू ट्यूब (२००५) आणि ट्विटर (२००६) ने. आज सोनेसा चं जग हे केवळ इंटरनेट वरिल उपरोल्लिखित साईट्स किंवा इ-मेल्स पुरतंच मर्यादित राहीलं नसून ते आत्ता बल्क एसएमएस, वेब होस्टींग, ब्लॉगर, ब्लॉगस्पॉट, गुगल बझ, गुगल प्लस, इ-बडी, अँड्रॉईड अप्लिकेशन्स, व्हिडीओ अपलोडिंग आणि डाउनलोटींग च्या ही पुढे गेले आहे. रोजरोज नवनवीन संकल्पनांचा यात समावेश होतो आहे. वास्तविक पाहता संगणक साक्षर असणारे सार्‍याच वयोगटातील लोकांध्ये सोनेसाची वाढती लोकप्रियता हा अनेक शोधसंस्थांच्या अभ्यासाचा विषय बनला आहे. अनेक शोधसंस्थांनी अहवाल देखील सादर केले आहेत. जागतिकीकरणाने जग एकदम जवळ आले. नवनव्या शोधांमुळे जीवन सुखमय झाले असले तरी महानगरांतील एकाकी आयुष्याची पोकळी भरून काढण्यासाठी सोनेसाचा सगळ्यात जस्त वापर होतो आहे. अमेरिकन लाइफ प्रोजेक्ट द्वारा केलेल्या सर्वेक्षणात सोनेसा वर आढळणार्‍या युजर्समध्ये वयाची पन्नाशी पार केलेल्या व्यक्ती ह्या सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे.


मनोरंजनाच्या हेतूने सुरू केल्या गेलेल्या या सोनेसा मनोरंजनाचे पर्याय ते माध्यमहिन समाजाचा आरसा असे झालेले रुपांतरण हा २१ व्या शतकातला सर्वात मह्त्वाचा टप्पा आहे. इंटरनेटने त्याच्या विकसित होण्याबरोबरच मानवी कळपापासून सुरूवात करणार्‍या कॉमन मॅनला एका आभासी जगतातील कम्यूनिटी पर्सन बनवलं. आकाशाला भिडणारे आयएसडी कॉल्सचे रेट चुटकीसरशी खाली आणण्यासाठी देखील ह्या सोनेसाच्या स्काईप आणि जी टॉक सारख्या सुविधा जबाबदार ठरल्या होत्या. हेच इव्हाल्यूशन नवं रिव्हॉल्यूशन घेउन आल्या. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर असलेली भांडवलवाद्यांच्या मक्तेदारीने सामान्य नागरिकांचा मत प्रदर्शित करण्याचा अधिकारच हिरावून घेतलेला होता. कुठेतरी मनात धुसफूस होतीच. अचानकपणे अवतरलेल्या या सोनेसांनी एका अनिर्बंध मुक्तपीठाच्या शोधात असलेल्या सामान्य वर्गाला त्यांचं हक्काचं विचारपीठ मिळवून दिलंय. नो सेन्सॉरशिप, नथिंग, नथिंग
जस्ट साईन इन अँड फ्लाय हाय ...

(वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये साईन इन ह्या सदरात प्रकाशित झालेला आहे . ) 

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons