Friday, March 16, 2012

LOG - IN Part – 4


हॅप्पी बर्थडे टू यू फेसबुक  
जगभर पसरलेल्या नेटीझन्सना इंटरलिंक करत सोशल नेटवर्किंगचे सारे परिप्रेक्ष बदलवून टाकणार्‍या फेसबुकने या ४ फेब्रुवारीला वयाची आठ यशस्वी वर्षे पूर्ण केली. २००४ साली हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थीदशेत असताना मार्क झुकरबर्गने आपले मित्र डस्टीन, ख्रिस हजेस  आणि सॅवेरिन सोबत विद्यापीठातच ही साईट सुरू केली. आजमितीला तब्बल ८५ कोटी युजर्स असणार्‍या फेसबुकने लोकप्रियतेसोबतच व्यापार जगाताची अनेक शिखरे अल्पावधीतच पादक्रांत केली आहेत. चॅटिंग, इ-मेल्स, डाटा शेअरिंग एवढंच काय ते सोनेसाचं कार्यक्षेत्र. पण फेसबुकने वर्चुअल जगाच्या सार्‍या  कक्षाच रुंदावून टाकल्या. जास्मीन रेवोल्यूशन असो किंवा भारतातील अण्णाप्रणित क्रांति.. फेसबुकने मने जोडण्याचे विस्मयकारक कार्य केले आहे. एफबी यूजर्सची संख्या पाहता भविष्यात एफबी एक वर्चुअल राष्ट्र म्हणून घोषित झालं तर तो निश्चितच आश्चर्याचा धक्का नसेल.
हॅकींग एक्पर्ट असणार्‍या मार्क आणि त्याच्या साथीदारांनी २००३ साली हार्वर्ड सर्व्हरमधील रेस्ट्रिक्टेड एरियात हॅकिंग करून नवा कोड तयार केला. हा कोड वेबसाईटवर डेव्हलप करून त्यात अनेक फोटोज अपलोड केले. सुरूवातीला त्याने त्याला फेसमॅश नाव दिले. फेसमॅश सुरू झाल्याच्या अवघ्या चार तासात साडेचारशे व्हिजीटर्स आणि २२,००० इमेजव्हिव्ह्ज आल्या. ही बाब हार्वर्ड प्रशासनाच्या लक्षात येताच मार्कवर कॉपीराईट उल्लंघनाचे आरोप निश्चित करत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. कालांतराने विद्यापीठाने हे आरोप मागे घेतले. फेसमॅशच्या यशाने प्रेरित झालेल्या मार्कने जानेवारी २००४ मध्ये सोशल स्टडीटूल साठी दफेसबुक.कॉम हे नवीन पोर्टल कॉमेंट्सच्या सेक्शनसहित चालू केले. पाहता पाहता हार्वर्डचे विद्यार्थी त्यावर नोट्स शेअर करू लागले. आणि इथूनच खरी सुरूवात झाली फेसबुकच्या वेगवान प्रवासाला. अमेरिकेतील विद्यापीठांत नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थी कर्मचाऱ्यांची नावे फेसबुक नावाच्या एका कागदावर लिहीण्याची परंपरा आहे. यावरूनच मार्कने 'फेसबुक' हे नाव निश्चित केले.
हार्वर्ड विद्यापीठापुरते मर्यादीत असलेले दफेसबुक.कॉम मार्च २००४ पर्यंत कॅनडा आणि अमेरिकेतील इतर विद्यापीठापर्यंत पोहोचले. जून २००४ मध्ये पेपाल कडून पहिली गुंतवणुक मिळताच या सोशलस्टडी टूलचे अर्थकारण सुरू झाले. लगोलग मार्कने दफेसबुक.कॉमची हायस्कूल आवृत्ती तयार केली. अपेक्षेप्रमाणे ती देखील लोकप्रिय झाली. २००६ सालच्या सुरूवातीलाच मार्कने पुढचं पाउल टाकत अॅपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या मातब्बर आयटी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांसाठी फेसबुकचे जाळे खुले केले. तोवर फेसबुक.कॉम हे फेसबुक.कॉम बनले होते. ही पायरी देखील अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाली. २६ सप्टेंबर २००६ साली फेसबुकने आपले दरवाजे सार्‍या जगासाठी खुले केले आणि सुरूवात झाली एका नव्या वर्चुअल विश्वाच्या निर्मितीची.
सुरूवातीला फेसबुकच्या प्रगतीला सिलिकॉन व्हॅलीने फारसे मनावर घेतले नाही. २००७ साली फेसबुकची किंमत १५ मिलिअन डॉलरवर पोहोचली तेव्हा मात्र याहु, गुगल, मायक्रोसॉफ्टने एफबीचा धसका घेतला. फेसबुकच्या उत्पन्नाचे एकमात्र साधन म्हणजे जाहीराती. आणि ह्या जाहीरातीतून येणारा नफ्याची टक्केवारी ही प्रतिवर्षी १८८% एवढी मोठी आहे. फेसबुकच्या वाढत्या लोकप्रियतेचा सर्वात जास्त फटका बसला तो गुगलला. नेटीझन्स हे गुगलपेक्षा अधिक काळ फेसबुकवर राहणे पसंत करतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. फेसबुकचे आज जगातील १५ देशांत कार्यालये असून  ३५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
फेसबुकच्या अफाट व वेगवान लोकप्रियतेची अनेक कारणे आहेत. पण महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुकचा संस्थापक सीईओ मार्क झुकरबर्गची व्यावसायिक दूरदृष्टी. फेसबुक.कॉम हे आज अख्ख्या जगात एफबी या नावाने लोकप्रिय आहे. नेटिझन्सना एड्रेसबारमध्ये एफबी टाकताच फेसबुकवर जाता यावे यासाठी मार्कने तब्बल ८.५ मिलिअन डॉलर मोजून अमेरिकन फार्मब्युरो फेडरेशनच्या मालकीचा असलेला एफबी.कॉम (fb.com) डोमेन विकत घेतला. आता फक्त एफबी टाईप केले तरी सरळ फेसबुकच्या मुखपृष्ठावर जाता येते. एफबीवर नवीन खाते उघडताना इतर साईट्स सारखी भरमसाठ माहीती द्यावी लागत नाही. लागतो तो फक्त एक इ-मेल आईडी. फेसबुकचा लुकही अगदी सिंपल आहे. निळ्या रंगाचा योग्य वापर करून तयार केलेले टूलबार, साधा पण आकर्षक फाँट, विशिष्ट साच्यात बसवलेले कॉलम्स, कस्टमर ओरिएंटेड जाहीराती, गेमिंग एप्लिकेशन्स, बर्डथे रिमांईंडर, ग्रुप, पेजेस बनवता येण्याची सुविधा हे निश्चितच फेसबुकला ऑर्कुटपेक्षा वेगळे बनवते. ऑर्कुट एकेकाळी भारत, ब्राझील सारख्या विकसनशील देशांत पॉप्यूलर होती. परंतू त्यावरील थीम आणि त्यांचा भडकपणाच ऑर्कुटवरून मन उडण्यासाठी कारणीभूत असल्याचे अनेक नेटीझन्स मोकळेपणाने सांगतात.
एफबीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे त्याचं स्टेटस आणि कॉंमेटचं सेक्शन. बस जे मनात आहे ते लिहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला त्यावर मनसोक्त व्यक्त होउद्या. काही ग्रुपवर टाकलेल्या पोस्ट्सना हजारो कॉमेंट्स आलेल्या सहज दिसून येतात. फोटो शेअरिंग, लिंक शेअरिंग, टाईमलाईन वर प्रतिक्रिया देत असताना एफबी युजर्स हे कधी काउंटर रिएक्शन मध्ये मग्न होऊन जातात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. आणि ह्यातून जडते ते कधीही न सुटणारे फेसबुकचे व्यसन. फार्मविले, माफिया वॉर सारख्या गेम्सने तर अनेकांना वेड लावले होते. वर्चूअल शेतीची आयडीयाच एकदम भन्नाटपणे सादर केली गेली होती. एफबीचा वाढता पसारा आणि आगामी काळात होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता मार्कने फेसबुकच्या आठव्या वाढदिवशी पहिल्यावहिल्या आयपीओची घोषणा केली आहे. तज्ञांच्या मते हा आत्तापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणार आहे. जस्ट फॉर फन साठी तयार झालेलं एफबीनं जगभरातील नेटीझन्सना गेल्या वर्षात भरभरून दिलं. काळानुसार एफबी नवनव्या आयडीयासहीत अपग्रेड होत राहणार.. सोबत आपणही अपग्रेड होत राहूया.  फेसबुकला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..  

(पुढील भागासाठी येथे क्लिक करा ) 
(वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये प्रकाशित झालेला आहे . )  

No comments:

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons