Sunday, July 17, 2011

आरक्षण भाग १७

खाजगी विद्यापीठ कायदा २००४.... 
       १६ ऑगस्ट २००४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन सन्मा. राज्यपाल मोहम्मद फजल यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन प्रिंसिपल सेक्रटरी श्री. चंद्रा अय्यंगार यांच्याकरवी अध्यादेश काढून महाराष्ट्र राज्याचा खाजगी विद्यापीठ कायदा प्रस्थापित केला.  भांडवली अर्थव्यवस्थेच्या शोषणवादाचे  प्रतिक असलेला हा कायदा खर्‍या अर्थाने आरक्षणाचा मारेकरी सिद्ध झाला आहे. वास्तविक पाहता हा कायदा का निर्माण झाला ?  १९९५ पासून संसदेत खाजगी विद्यापीठाचे घोंगडे भिजत पडलेले असताना देखील हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी २००४ साल का उजाडावे लागले? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधणे फार महत्त्वाचे आहे. त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीचा अभ्यास करणे तेवढेच संयुक्तिक आहे. प्रथमतः आपण सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊयात..
1.       महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंदोलनाचे माहेरघर होते. पुरोगामी राज्य म्हणून बिरुदावली मिरवाणार्‍या महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन उभारून आपल्या झुंजार अस्मितेचे दर्शन अख्ख्या देशाला घडवून दिले होते. शरद जोशींच्या शेतकरी संघटनंच्या आंदोलनाने अख्खा शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरला. १९८२ सालापासून आजतागायत सुरू असलेल्या गिरणी कामागारांचे आंदोलन, नामांतराचा ऐतिहासिक लढा, सरदार सरोवर प्रकल्पासाठी गेल्या ३० वर्षांपासून चाललेले आंदोलन, रिडल्स प्रकरणात आंबेडकरी जनतेने केलेले आंदोलन, स्वतंत्र विदर्भासाठी चालणारी आंदोलने, ९२ साली अयोद्धा प्रकरणात घडून आलेले जातीय आणि धार्मिक आंदोलनाचे प्रकार देखील आपण पाहीले आहेत.

2.       वर उल्लेख केलेल्या प्रत्येक आंदोलनात त्या त्या आंदोलनाचा प्राण हा त्या आंदोलनातील कार्यकर्ता होता. ९० दशकानंतर आलेल्या खुल्या अर्थव्यस्थेच्या लाटेनंतर महाराष्ट्रातील एकुण  समाजकारणाचे एनजीओकारणात रुपांतरण झाले. प्रत्येक आंदोलनाला लाभलेल्या कार्यकर्त्याला आपल्या महत्त्वाकांक्षा शमवण्यासाठी आणि त्यासोबतच आपली नेतृत्वक्षमतेची भूक भागवण्यासाठी एनजीओचा पर्याय स्विकारला गेला. एकेकाळी कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून ओळख असणार्‍या महाराष्ट्रात गल्लोगल्ली फोफावलेल्या एनजीओच्या गवतामुळे ही ओळख देखील पुसली गेली.

3.       महाराष्ट्रातले हे एनजीओकारण गेल्या काही वर्षांत गाजर गवतासारखे फोफावले आहेत. या गवतात आंदोलनांची भूमी पुरती खाऊन टाकली आहे. गेल्या दोन दशकांत मुक्त अर्थव्यवस्थेचा जो झंझावात आला त्याला त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेला असले एनजीओकरण सोयीचेच होते. शिवाय, केंद व राज्य सरकारांनी आपली यंत्रणा कुचकामी असल्याची जाहीर कबुली देण्यास याच काळात सुरुवात केली आणि आपली अनेक कल्याणकारी कामे बिनदिक्कत एनजीओंकडे सोपवली. यातून एकीकडे एनजीओ संस्कृती फोफावत असताना व्यवस्थेबद्दलचा असंतोष साकळण्याची आणि तो आंदोलनांमधून उफाळण्याची सारी प्रक्रियाच पंक्चर होत गेली. यात प्रचंड पैसा ओतणारे भांडवलदार, सत्ताधारी व 'झोळी' टाकून 'लॅपटॉपी' बनलेले कार्यकर्ते या साऱ्यांचेच हित होते.  (महाराष्ट्राचा सुस्त अजगर! - सारंग दर्शने )

4.       एव्हाना प्रस्थापित व्यवस्था ही कुचकामी असून ती काहीच उपयोगाची नाही ह्या मतापर्यंत सामान्य जनमत येउन पोहोचले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्येला शिक्षित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या अपुरी पडू लागली होती. त्याआधी काही मोजक्याच संस्थानी अगदी निस्वार्थपणे शिक्षादानाचे पवित्र कार्य कोणत्याही नफ्याच्या अपेक्षेविना चालविले होते. कालपरवापर्यंत लोकसंख्यावाढ नियंत्रण आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे विक्रम करणार्‍या बर्‍याचशा संस्थांनी आपला मोर्चा शिक्षणक्षेत्राकडे वळवला. प्रत्येक शहरात त्या त्या जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थानी शाळा उभारण्यास सुरुवात केली. हळूहळू ही लाट सर्वदूर पसरली.

5.       त्याचदरम्यान महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ अस्तित्वात आला. राज्यातील सर्वदूर भागापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार करुन शिक्षण लोकाभिमुख करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट् असलेल्या या कायद्याचा मात्र राज्यातील राजकारण्यांनी सोयीनुसार गैरवापर करत जिल्ह्या-जिल्ह्यांत विद्यापीठांचे जाळे विणले. आता ही विद्यापीठे बेकायदेशीरपणे अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करून देण्यात समर्थ ठरतायेत हे दिसताच सार्‍या बेकायदा बाबी अधिकृत करण्यासाठी घातलेला घाट म्हणजे खाजगी विद्यापीठ कायदा होय.

6.       आधी महाराष्ट्रात साखर सम्राट, सहकार सम्राट, डेअरी सम्राट अशा बिरुदावल्या मिरविण्याची पद्धत होती. पण यात आता एका नव्या बिरुदावलीचा समावेश झालाय, शिक्षणसम्राट या बिरुदावलीचा. कालपरवापर्यंत सायकलवर प्रवास करणार्‍या लोकांकडे गडगंज संपत्ती पोहोचवण्याचे अतुलनीय परंतू भ्रष्ट कार्य ह्या कायद्याने साध्य केले आहे.

7.       राज्यातील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, आर्थिक मागास, अल्पसंख्यांक यांना शिक्षणासाठी असलेला आरक्षण या घटनादत्त अधिकाराची पायमल्ली करताना वरिल समाजघटकांस केवळ पैशांअभावी आपल्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश नाकारण्याची हिम्मत निर्माण करु शकणारा फॅक्टर म्हणजेच हा कायदा.

8.       खाजगी विद्यापीठ कायद्याने खाजगी विद्यापीठे उभारणीला मंजूरी देताना केवळ ज्ञानार्जन करण्यासाठी आवश्यक असणारे कारखाने उभारावेत एवढाच संकुचिक अर्थ रुजवला.

9.       खाजगी विद्यापीठ कायदा हा कशा पद्धतीने सामान्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि एकुणच सामाजिक मागास घटकांच्या अधःपतनासाठी जन्माला घातले गेलेले अनौरस हत्यार आहे. ह्या कायद्याचे सखोल विश्लेषम करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ चे संदर्भ लक्षात घेणे अगदी महत्त्वाचे आहे. यापुढील भागात आपण त्यावर विस्तृत चर्चा करणार आहोत.




3 comments:

Anonymous said...

Very good observation.

Unknown said...

Thanx Dear reader.. Plz let me know u r name ..

Adv. Sandeep Nandeshwar said...

वैभव जी इसमें हमारी भी थोड़ी बहुत गलतिय हुई है ! हमारे लोगो ने शिक्षा तो बहुत ले ली ! पर शिक्षण संस्थओंपर कभी कब्ज़ा नहीं किया ! हमें अभी हमारी शिक्षण संस्थओंकी मूवमेंट चलानी होगी ! हमने सिर्फ राजनीती की है ! पर जिस क्षेत्र को हमने सबसे पहले काबिज करना चाहिए था ! उसपर हमने ध्यान ही नहीं दिया ! क्या आज हम अगर यह कर सकते है तो मै समझता हु की आनेवाले भविष्य के लिए हम कुछ कारगर काम कर जायेंगे ! शिक्षा क्षेत्र को काबिज करने का आन्दोलन खड़ा करो तभी हम हमारा भविष्य बना सकते है !

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons